Dog Dainik Gomantak
गोवा

भटक्या कुत्र्यांबाबत कडक धोरणाची गरज; गोवा ॲनिमल वेलफेअर ट्रस्टच्या सुरेश काकोडकरांची मागणी

Goa Animal Welfare Trust: भटक्या कुत्र्यांसंदर्भात सरकार गंभीर असले तरी सरकारने ही जबाबदारी पंचायत व नगरपालिकांवर टाकली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

भटक्या कुत्र्यांसंदर्भात सरकार गंभीर असले तरी सरकारने ही जबाबदारी पंचायत व नगरपालिकांवर टाकली आहे. मात्र, पंचायत व नगरपालिका याबाबतीत गंभीर नसल्याचे दिसून येते. भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पंचायत व नगरपालिकांनी कडक धोरण अवलंबिण्याची गरज असल्याचे गोवा ॲनिमल वेलफेअर ट्रस्टच्या सुरेश काकोडकर यांनी सांगितले.

ज्यांच्याकडे बंदी घातलेले कुत्रे आहेत त्याची नोंद नगरपालिका, पंचायतीकडे असणे महत्त्वाचे आहे. शिवाय वरील जातीचे कुत्रे पाळणाऱ्या मालकांवरही मोठी जबाबदारी असते. या कुत्र्यांची काळजी घेणे आवश्यक असते. काही कुत्रे केवळ आपल्या मालकांनाच ओळखतात. मात्र, तिथे दुसरी व्यक्ती आली तर ते त्याच्यावर तुटून पडतात, तेव्हा अशा कुत्र्यांना बांधून ठेवणे महत्त्वाचे असते, असेही काकोडकर यांनी सांगितले.

हणजूण येथील कुत्र्याच्या चाव्याने एका मुलाचा मृत्यू झाला. यासंदर्भात काकोडकर यांनी सांगितले की यात नेमकी चूक कुणाची हे सांगणे कठीण आहे. राज्य सरकारकडून कुत्र्यांच्या २३ आक्रमक जातींवर बंदी घातलेली आहे. त्यात पीटबूल, रॉटवेलर, टेरिएर, मास्तिफ्स, वुल्फ डॉग्स व त्यांच्या मिश्र जातींचा समावेश आहे. पाळीव कुत्रे आक्रमक असतात; पण भटके कुत्रे त्या मानाने शांत असतात. केवळ त्यांच्यावर दगड फेकला किंवा त्यांची छेड काढली तरच ते आक्रमक होऊन चावा घेतात. न्यायालयाच्या आदेशानुसार कुत्र्यांना मारता येत नाही. पण त्यांची संख्या कमी करण्यासाठी नसबंदी हा एक उपाय आहे. शिवाय सरकारने जास्तीत जास्त निवारा केंद्रे तयार करणे गरजेचे आहे. कुत्र्यांना जेव्हा कच्चे मांस खाण्यास देतात तेव्हा नंतर ते अशा प्रकारच्या मांसासाठी माणसांनाही चावतात.

नसबंदीनंतर कुत्र्यांची आक्रमकता होते कमी

अनेक नागरिक घरी कुत्रे हे सुरक्षेसाठी पाळतात; परंतु काही कुत्र्यांची आक्रमकता ही अतिशय भयानक असते. अशा आक्रमक कुत्र्यांपासून ईजा पोहोचण्याचा अधिक धोका असतो. त्यामुळे ही आक्रमकता कमी करण्यासाठी त्यांची नसबंदी करणे गरजेचे असते. असे केल्यास त्यांच्या आक्रमकतेत काहीअंशी का होईना घट होते, असे डॉ. केणी यांनी सांगितले.

भटके कुत्रेही घातक

राज्यात वाढत्या शहरीकरणामुळे मोकळ्या ठिकाणी अन्नपदार्थ सर्रास टाकले जात असल्याने भटक्या कुत्र्यांची संख्या लक्षणीय आहे. अशा श्‍वानांच्या संख्येत घट होणे गरजेचे आहे. भटक्या कुत्र्यांची नसबंदी करणे गरजेचे आहे. राज्यातील ग्रामीण भागातदेखील मोठ्या प्रमाणात भटकी कुत्री आढळून येतात. जी वाहने चालविताना आडवी येतात, रस्त्याने एकटे फिरत असलेल्या नागरिकांच्या मागे लागतात, त्यामुळे पाळीव कुत्र्यांपेक्षा भटक्या कुत्र्यांमुळे ईजा होण्याच्या घटना अधिक घडतात.

गोव्यामध्ये आढळतात हिंस्त्र पीटबुल, रॉटवेलर्स

पाळीव कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे मृत्यूच्या वाढत्या घटना चिंतेचे कारण बनले आहे. नुकताच, हणजूण येथे एका ९ वर्षीय मुलावर हिंस्त्र व आक्रमक स्वभावाच्या विदेशी पीटबुल जातीच्या कुत्र्याने हल्ला चढवत, त्याच्या शरीराचे लचके तोडले. यात गंभीर जखमी झाल्याने या कोवळ्या मुलाचा उपचाराअंती मृत्यू झाला.

पीटबुल ही प्रजाती हल्ला करण्यासाठी कुप्रसिद्ध आहे. हा कुत्रा सामान्य कुत्र्यांपेक्षा जास्त बलवान असतो. त्यांच्याकडे शक्तिशाली तसेच मजबूत जबडा असतो. ते लवकर आक्रमक होतात व हल्ला करू शकतात. त्यांना राग आल्यावर नियंत्रण ठेवता येत नाही. पिटबुल अनियंत्रित असतात व त्यांना लगेच राग येतो व ते इतरांचा चावा घेतात. तसेच रॉटवेलर्स ही प्रजातीदेखील पीटबुलप्रमाणे अत्यंत धोकादायक आहे. या कुत्र्याकडेदेखील शक्तिशाली जबाडा असतो. रॉटवेलर्सला हाताळण्यासाठी संबंधित मालकाने प्रशिक्षण घेतलेले असायला हवे.

पीटबूल जातीच्‍या कुत्र्याने हणजूण येथे एका ९ वर्षीय मुलावर हल्‍ला करून त्‍याचा जीव घेण्‍याची घटना घडल्‍यामुळे संपूर्ण राज्‍य हादरून गेले असून अशा आक्रमक जातीच्‍या कुत्र्यांवर बंदी आणण्‍याची मागणी पुन्‍हा एकदा होऊ लागली आहे. वास्‍तविक गावात कुठल्‍या प्रकारचे आणि किती कुत्रे आहेत याची नोंद नगरपालिका आणि स्‍थानिक पंचायती यांच्‍याकडे असणे आवश्‍‍यक असते. मात्र, कुत्र्यांचे मालक कुत्र्यांची नोंदणीच करत नाहीत. त्‍यामुळे आक्रमक जातीचे कुत्रे कुणाकडे आहेत याची कुठलीही नोंद मडगाव पालिका किंवा सासष्‍टीतील अन्‍य पंचायतींकडे उपलब्‍ध नाही.

मडगावचे माजी नगराध्‍यक्ष आणि शॅडाे काैन्‍सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्‍हाे यांनी यासंदर्भात सांगितले की, मडगाव आणि सासष्‍टीत असे आक्रमक जातीचे कुत्रे बऱ्याच मोठ्या प्रमाणात पाळलेले आहेत. मात्र, त्‍यांची माहिती देण्‍यास कुठलाही मालक पुढे येत नाही. वास्‍तविक आम्‍ही दहा वर्षांपूर्वी ‘मिशन रेबिज’ ही माेहीम हाती घेतली होती. त्‍यावेळी कुत्र्यांची नाेंदणी सक्‍तीची करा, अशी सूचना केली होती. मात्र, आमच्‍या सूचनांना त्‍यावेळी केराची टाेपली दाखविण्‍यात आली होती.

भटक्‍या कुत्र्यांचे पुनर्वसन करण्‍याच्‍या चळवळीत सक्रिय असलेले आणि यापूर्वी पाळीव प्राण्‍यांचे सुश्रुषा केंद्र चालविणाऱ्या ग्रेस कारे यांनीही अशी नाेंदणी आवश्‍‍यक असल्‍याचे सांगितले. त्‍या म्‍हणाल्‍या, कालचेच उदाहरण घेता येईल. हा कुत्रा घरात असताना त्‍याने त्‍या मुलावर हल्‍ला केला. त्‍यामुळे हल्‍ला करणारा कुत्रा कुणाचा हे कळू शकले. रस्‍त्‍यावर जर असा हल्‍ला झाला असता तर कुत्र्याचा मालक कसा शोधला गेला असता, असा सवाल त्‍यांनी केला.

कारे म्‍हणाल्‍या, या अशा हल्‍ला प्रकरणाकडे गंभीरतेने पाहण्‍याची गरज आहे. मागच्‍या वर्षी अशाचप्रकारे एका कुत्र्याने हल्‍ला केल्‍याने काहीजण जखमी हाेण्‍याची घटना घडली होती. मात्र, त्‍या घटनेचा तपास फारशा गंभीरतेने झाला नाही. कुत्र्यांचा मालक एक बडा अधिकारी असल्‍याने हे प्रकरण दाबले गेले. भविष्‍यात अशा घटनांवर नियंत्रण आणायचे असेल तर ही नोंदणी सक्‍तीची केली पाहिजे. हे कुत्रे प्रशिक्षित आहेत का, त्‍यांना हाताळण्‍यासाठी त्‍यांचे मालक प्रशिक्षित आहेत, का सर्वांची नोंद ठेवण्‍याची गरज आहे.

योजनांची अंमलबजावणी गरजेची

गोवा सरकारची गोवा लहान प्राणी बचाव व्यवस्थापन योजना आहे. या योजनेत अनेक नवे बदले केले आहेत. मात्र, या योजनेला स्थानिक सरकारी संस्थांकडून किंवा खासगी संस्थांकडून योग्य प्रतिसाद लाभलेला नाही. या योजनेचा लाभ केवळ ५१ संस्था घेतात, असे सरकारी आकडे सांगतात.

गोव्यात १९१ पंचायती व १४ नगरपालिका आहेत. त्यातील केवळ ४३ पंचायती व ८ नगरपालिका या योजनेचा लाभ घेत आहेत. आणखी एका आकडेवारीवरून गोव्यात १,५८,२७९ कुत्रे आहेत, त्यातील ८६,९७६ पाळीव तर ७१,३०३ भटके कुत्रे आहेत. त्यातील १२ हजार कुत्र्यांवर नसबंदी केली आहे.

पशुसंवर्धन व पशुचिकित्सा खाते कुत्र्याची नसबंदी किंवा इतर शस्त्रक्रिया करीत नसते. मात्र, हे खाते हे काम करणाऱ्या संस्थांना अनुदान देत असते, अशी माहिती खात्यातील एका अधिकाऱ्याने दिली. अशा संस्थांकडून अनुदानासाठी अर्ज येतात तेव्हा लगेच आम्ही रक्कम त्या संस्थेला देतो, अशी माहितीही या अधिकाऱ्याने दिली.

हल्लीच झालेल्या विधानसभा अधिवेशनात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर आळा घालण्यासाठी सरकारतर्फे ठोस पावले उचलली जातील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले होते. त्यासाठी दोन-तीन महिन्यांत योजना तयार करून तिची अंमलबजावणी केली जाईल, असे त्यांनी विधानसभेत सांगितले होते.

विविध जातींचे कुत्रे पाळणे अनेकांच्‍या आवडीचा विषय. कुत्रे पाळायला हरकत नाही; परंतु लोकांचे जीव धोक्‍यात येणार असतील तर प्राधान्‍य कुणाला? माणूस की कुत्र्याला? राज्‍यात पाळीव असो वा भटके कुत्रे, त्‍यांची संख्‍या वाढत आहे. सोबत त्‍यांच्‍यापासून होणारा उपद्रव वाढला आहे. सद्यस्‍थितीत श्‍‍वान हाताळणीचे कोणतेही धोरण नाही. परिणामी रस्‍त्‍यांवरून चालणेही अवघड बनले आहे. केंद्र सरकारने २३ हिंसक श्‍‍वान जातींवर घातलेल्‍या बंदीची राज्‍यात अंमलबजावणी कधी होणार?

केंद्र सरकारने धोकादायक असे २३ प्रकारचे कुत्रे पाळण्यावर बंदी घातली असली तरी त्याची राज्यात अंमलबजावणी झालेलीच नाही. राज्याचे पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय खाते केवळ भटक्या कुत्र्यांची समस्या निकालात काढणे एवढेच आपले कर्तव्य असल्यागतसारखी वागत आहे. केंद्राच्या बंदी आदेशानंतर त्याच्या अंमलबजावणीसाठी राज्याच्या पातळीवर कोणतीही तयारी झालेली नाही. पिटबुल प्रकारच्या कुत्र्याने यापूर्वी माणसांवर हल्ले करण्याच्या घटना घडूनही या बंदीच्या अंमलबजावणीकडे खात्याने कानाडोळा केलेला आहे, असे दिसून येते. विधानसभेत भटक्या कुत्र्यांसदर्भात चर्चा झाल्यानंतर धोरण ठरवू, असे उत्तर या खात्याने मंत्र्यांना चर्चेला उत्तर देण्यासाठी पाठवले होते. त्यानंतर असे धोरण पूर्वीपासूनच अस्तित्वात असल्याचे विधानसभेत उघड झाल्यानंतर हे खाते तोंडघशी पडले होते. यावरून कुत्रा समस्येकडे हे खाते किती किरकोळपणे पाहते हे दिसून आले होते.

आताही कुत्रे माणसांवर हल्ले करत असतानाही पाळीव कुत्र्यांसदर्भात नियम तयार करण्यात आलेले नाहीत. कुत्रा पाळायचा असल्यास त्याची खात्याकडे नोंदणी करणे, त्याला नियमितपणे रेबिजविरोधी लस देणे आदी गोष्टी कुत्र्याच्या मालकाला बंधनकारक केल्या गेलेल्या नाहीत, अशीही माहिती मिळाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद

Waste Management Projects: कुडचिरेवासियांच्या आंदोलनाला यश; प्रस्तावित बांधकाम कचरा निर्मूलन प्रक्रिया प्रकल्प होणार रद्द!

Goa Crime: दिवसाढवळ्या अपहरणाचा थरार! व्यवसायिकाला लुटण्याच्या मनसुब्यावर स्थानिकांनी फिरवले पाणी

Kala Academy: चूक मान्य करा, कामाला लागा!

Goa Accident: गोव्यात नऊ महिन्यात 209 अपघात, तरीही 10 टक्क्यांची घट; 'हे' आहे मुख्‍य कारणं

SCROLL FOR NEXT