Pilgao: सफर गोव्याची! म्हादई समुद्राला मिळण्यापूर्वी लागणारे, छोटेसे टुमदार 'पिळगाव'

Pilgao Village Goa: मुलगी लग्न होऊन जरी सासरी गेली, तरी माहेरच्या गावची आठवण ती सहसा विसरू शकत नाही. वर्षे लोटली तरी नव्या स्मृतीखाली जुन्या आठवणी पैठणीसारख्या जिवंत राहातात.
Pilgao Village Goa
Pilgao Village GoaDainik Gomantak
Published on
Updated on

मुलगी लग्न होऊन जरी सासरी गेली, तरी माहेरच्या गावची आठवण ती सहसा विसरू शकत नाही. वर्षे लोटली तरी नव्या स्मृतीखाली जुन्या आठवणी पैठणीसारख्या जिवंत राहातात. मी जरी आता कवळेकर असले तरी मी पिळगावची अन् तिथल्या मातीच्या आठवणी मी अजून जपून ठेवल्या आहेत.

पिळगाव हा आमचा छोटासा गाव. म्हादई नदी समुद्राला मिळण्यापूर्वी आमच्या गावाला कुर्निसात करून पुढे जाते. याच कुशीत अन् तिच्या किनाऱ्यावर आमचा छोटासा गाव. गावात पाच-पन्नास कुटुंबे अन् त्यांचा संसार, वडीलधारी मंडळी पोटापाण्यासाठी जवळच्या डिचोली, जुवे, माशेल, साखळी, पणजी यांसारख्या गावांत / शहरांत जाऊन आपली कामे करून संध्याकाळी गावात. तोपर्यंत घरात, शाळेत, गावात अथवा मंदिराच्या उघड्या मंडपात आमचेच राज्य.

मला आठवतं की आम्ही परकरी वेशातल्या मुली घरासमोरच्या अंगणात संध्याकाळी लंगडी, खो-खो, धावण्याचा खेळ करीत त्यावेळी पापड, सांडगे, साबुदाण्याच्या वड्या सुकवणारी आमची आजी, मावशी आम्हाला हाकलून घालत असे, अन् मोठ्याने सांगत की, अभ्यास करा तुम्हाला बरा घोव मिळणार नाही. वय जसं वाढत गेलं, की आम्ही राधा झालो अन् आम्हाला कृष्ण भेटला.

आता हसू येतं. पिळगाव गाव छोटासा अन् लोकांची स्वप्नेही छोटीशीच, घरेही छोटी अन् दारही छोटेसेच, पण अंगण अन् देवळाचा देवस्थानचा मंडप मोठा, फिरण्यासाठी आम्ही पिळगाव धक्क्यावर जाऊन बसत असू. पूर्वी या धक्क्यावर पणजीहून एक वाफोर भक्-भक् आवाज करीत यायचा.

लोक उतरायचे अन् छोट्याशा बसने ज्याला ‘कार्रर’ अथवा ‘कामिचाव’ म्हणत त्यात बसून लोक डिचोलीला जात. कारण डिचोली हाच आमचा त्याकाळी ‘टिफीन बॉक्स’. खाण्यापिण्याच्या सर्व वस्तू तिथे मिळत. बुधवारच्या बाजाराला जाणाऱ्या पिळगावच्या गावकऱ्यांचा थाट म्हणजे पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसारखा. कारण अंतर फक्त ५-६ किमी.चालण्याची सवय असणारी मंडळी चालत जात-येत. त्यात कधी कधी आम्ही असू.

Pilgao Village Goa
Agond: सफर गोव्याची! सृष्टीसौंदर्याने नटलेला, निसर्गाचे वरदान लाभलेला ‘आगोंद'

गावात श्री शांतादुर्गा ही ग्रामदेवता, सातेरीचे देऊळ अन् पुढे श्री चामुंडेश्‍वरीचे देऊळ. या देवांच्या साक्षीने गावकऱ्यांचे जीवन / संसार फुलून आला. काही बरेवाईट झाले तर त्या हे देवाच्या कृपेने झालं, अस समजणारी लोकवस्ती या देवळांच्या आजूबाजूला होती. पण शिक्षणासाठी आम्ही चालत डिचोलीला जात असू.

Pilgao Village Goa
Viral Post: "मी गोव्यात कुठे राहू"? Reddit वर रंगली धमाल चर्चा; नेटकरी म्हणाले, 'घरीच रहा आणि पैसे वाचव..'

मायनिंग टॅपिंग धक्के बांधल्यावर तर गावात ट्रक आणि धुळीचे साम्राज्य आले. त्यावेळी मात्र आमच्या नंतरच्या पिढीने मुलांच्या भवितव्यासाठी गावापासून दूर वस्ती केली. काही पिकलेल्या केसांची लोक मात्र गावाला घट्ट धरून बसले. यामुळे आज आम्ही त्या गावात जातो, त्यावेळी नवीन पिढी आम्हाला ‘टुरिस्ट’ या नजरेने पाहते. तरीही आमचे बालपण-तरुणपण संरक्षित राखलं याचा गावाबद्दल अभिमान आहे.

पिळगाव हे माझे माहेर हे पूर्वी म्ह‌णायचे. कारण त्यावेळी आई होती,आता त्यास ‘आईचे गाव’ म्हणते कारण आता आई नाही, घर आहे, नातलग आहेत अन् पुढे तुळस.

विजया प्रमोद कुवळेकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com