पेडणे तालुक्यातील धारगळ येथे होणार असलेल्या सनबर्न आयोजनाबाबत स्थानिक पातळीवर मोठा वाद निर्माण झाला आहे. एकीकडे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी या आयोजनाला तीव्र विरोध दर्शवला असून दुसरीकडे स्थानिक पंचायतीने त्याला मंजुरी दिली आहे. यामुळे दोन्ही गटांमध्ये तीव्र मतभेद उद्भवले आहेत. सनबर्नमुळे स्थानिक संस्कृती आणि पर्यावरणावर विपरीत परिणाम होईल असा दावा विरोधक करत आहेत. तसेच यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याचे मत देखील व्यक्त करीत आहेत. सनबर्नमुळे पर्यटन वाढेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असा युक्तिवाद समर्थक करत आहेत. तसेच या आयोजनामुळे रोजगार निर्मिती होईल, असेही ते म्हणत आहेत. आमदार आर्लेकर सनबर्नला विरोध करत असून त्यांची ही भूमिका संशयास्पद असल्याचे सांगून सनबर्न विरोधकांना समर्थक बनविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे, तरीही आम्ही विरोधक ठाम आहे असा इशारा म्हणे विरोधक अजूनही देत आहेत. त्यामुळे समर्थक कमजोर पडू लागल्याची चर्चा पेडणेत रंगू लागली आहे. ∙∙∙
सध्या बाणावलीत ‘पे पार्किंग’ जागेवरून वाद निर्माण झाला आहे. बाणावली समुद्र किनाऱ्याजवळ पार्किंगसाठी ठेवलेली जागा पर्यटन विकास महामंडळ एका खासगी कंपनीला ६० वर्षांच्या भाडेपट्टीवर देणार अशी भीती स्थानिकांना असल्याने दोन दिवसांपूर्वी झालेल्या खास ग्रामसभेत स्थानिकांनी या नियोजीत प्रस्तावाला विरोध केला होता. सध्या बाणावलीत हा वाद गाजत असताना स्थानिक आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी अजून त्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. यामुळे व्हेंझींची भूमिका या प्रकल्पाबद्दल काय असेल याबद्दल सर्वांना उत्सुकता लागून राहिलेली आहे. ∙∙∙
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या मडगावात पार्क केलेल्या गाडीचा आरसा फोडण्याची घटना घडली. या प्रकरणात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा हात असावा अशी शक्यता चोडणकर यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणात फातोर्डा पोलिस स्थानकात तक्रारही दाखल झाली आहे. मात्र, हा गुन्हा अदखलपात्र असल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्यामुळे संबंधितांना अटक होणे शक्य नाही. त्यामुळे आता काँग्रेस यावर काय भूमिका घेणार याची सर्वांना उत्सुकता लागलेली आहे. सध्या गोव्यातील काँग्रेसची स्थिती म्हणजे विभागलेले घर अशी झाली आहे. अशा परिस्थितीत बजरंग दलाच्या या कथित हल्ल्याच्या विरोधात काँग्रेस एकत्रित येऊन आवाज उठविणार का? की पुन्हा त्यांचे ‘ये रे माझ्या मागल्या’च झालेले असेल? ∙∙∙
मडगाव पालिकेला लाखोंचा गंडा घालणारा योगेश शेटकर हा अखेर पोलिसांना सापडला खरा. मात्र, पोलिसांना त्याने हडप केलेले पैसे जप्त करण्यात नाकीनऊ येत आहेत. योगेशला पकडल्याचा पोलिस कितीही आव आणू देत, परंतु तो शरण आला होता असे पोलिसही खासगीत मान्य करतात. मात्र, उघडपणे बोलण्याची सोय नाही. वरिष्ठ पोलिसांना तसा सरळ आदेशच आहे. ‘तेरीभी चूप मेरीभी चूप’ असा हा सारा मामला आहे. म्हणतात ना... ‘समझने वाले को इशारा काफी है!’ ∙∙∙
आपल्या देशातही आता ‘लिव्ह इन रिलेशनशीप’ पद्धत रूढ झाली आहे. केवळ महिला व पुरुषच नव्हे, तर राजकीय पक्षात ही ‘लिव्ह इन रिलेशनशीप’ पद्धत आली आहे. लोकसभेच्या निवडणुकीवेळी देशातील बहुतांश पक्ष ‘इंडी अलायन्स’ नावाने भाजपाला निवडणुकीत हरवण्यासाठी एकत्र जमले होते. त्यावेळी मतदार म्हणत होते, गोव्यात आम आदमी व काँग्रेसची ‘लिव्ह इन रिलेशनशीप’ सुरू झाली होती. त्या निवडणुकीत सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन मोदींना हटविण्याचा विडा उचलला होता. आम आदमी पक्षाचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी लहान तोंडी मोठा घास घेत काँग्रेस पक्षावर टीका केली आणि काँग्रेसने आपशी असलेली ‘लिव्ह इन रिलेशनशीप’ तोडली. ∙∙∙
आजच्या युगात, सोशल मीडियामुळे नवीन माहिती वेगाने पसरते. आज एका विषयावर लक्ष केंद्रित करणे कठीण झाले आहे. प्रत्येक विषयाला विरोधी प्रतिक्रिया मिळते, ज्यामुळे चर्चा अधिक प्रखर होते हे आपण रोज पाहतो. भूतानी प्रकल्प, कॅश फॉर जॉब, सनबर्न या सर्व विषयांनी काही काळ चर्चेत स्थान मिळवले. नवीन विषय समोर येताच जुने विषय मंदावण्याची शक्यता असते आणि ते विषय मंदावल्याचे दिसूनही आले. आता राज्यातील एका आमदाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि आता पुन्हा हा विषय सर्व विषयांवरून लक्ष्य विचलित करणार आहे. त्यामुळे हा घटनाक्रम पाहिला, तर हे पूर्वनियोजित तर नाही ना? अशी चर्चा राज्यात सुरू झाली आहे. ∙∙∙
एका आमदाराचा मॉर्फ केलेला आक्षेपार्ह व्हिडिओ पोलिसांतील तक्रारीनंतरही समाज माध्यमांत व्हायरल झाल्याने उत्तर गोव्यात खळबळ उडाली. विशेष बाब म्हणजे संशयित पोलिसांच्या ताब्यात असताना ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. याप्रकरणी पोलिसांनी तक्रारदाराचे नाव उघड केले नव्हते. मात्र, या व्हिडिओमुळे तो लोकप्रतिनिधी नेमका कोण, हे आता अनेकांना समजले! पोलिसांनी केवळ उत्तर गोव्यातील आमदार असे प्रसिद्धी पत्रकातून सांगितले होते. मात्र, ती पीडित व्यक्ती बार्देश तालुक्यातील हे उघड झाले. विशेष म्हणजे हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर अनेकजण तो पाहण्यासाठी एकमेकांजवळ या व्हिडिओची लिंक किंवा व्हिडिओ मागत होते, हेही तितकेच विशेष. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.