Sudin Dhavalikar Dainik Gomantak
गोवा

सुदिन ढवळीकर यांचा ‘अश्वमेध’ कोण रोखणार?

मडकईत लवूंचा ‘एल्गार’ भिंगीही रिंगणात : तिरंगी लढत शक्य

दैनिक गोमन्तक

फोंडा : मडकई मतदारसंघ हा मगोपचा बालकिल्ला म्हणून गणला जातो. मगोपचे प्राबल्य असलेल्या या मतदारसंघात सुदिन यांचा विजयाचा वारू रोखण्याच्या उद्देशाने कॉंग्रेसतर्फे त्यांचे एकेकाळचे मित्र लवू मामलेदार यांनी एल्गार पुकारला आहे,तर एकेकाळचे समर्थक सुदेश भिंगी भाजपच्या तिकीटावर लढणार आहेत.आरजी तसेच आपही रिंगणात असले तरी लढत तिरंगीच होण्याची चिन्हे आहेत. (Sudin Dhavalikar News Updates)

1963 च्या पहिल्या निवडणुकीपासून ते 2017 पर्यंत 1994 चा अपवाद वगळता मडकई हा मगोपच्या (MGP) नावावर जमा झाला आहे.1994 मध्ये मात्र मगोपची व भाजपची युती असल्यामुळे व मगोपने मडकई भाजपला दिल्यामुळे भाजपचे श्रीपाद नाईक हे विजयी झाले होते. खरे म्हणजे त्यावेळी हा मतदारसंघ मगोपलाच मिळणार होता. पण मगोपतील ‘अंतर्गत’ राजकारणामुळे हा मतदारसंघ भाजपला सोडण्यात आला होता. त्यामुळे मगोपचे बहुसंख्य कार्यकर्ते नाराजही झाले होते. पण कॉंग्रेसचे उमेदवार तथा माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचा पराभव करण्याकरिता नंतर भाजप-मगोपमध्ये दिलजमाई झाली होती.

मात्र पुढच्या निवडणुकीत भाजप (BJP) व मगोप वेगळे झाले. आणि मगो भाजप व कॉंग्रेस अशा झालेल्या तिरंगी लढतीत मगोचे सुदिन ढवळीकर हे प्रथमच निवडून आले. त्यावेळी त्यांचे मताधिक्क्य जरी फक्त सहाशे मतांचे असले तरी पुढच्या निवडणुकीत हे मताधिक्क्य वाढत गेले. आणि 2017 साली तर सुदिनांनी 15000 चा मतांनी एकहाती विजय मिळवला होता. त्यावेळी कॉंग्रेसतर्फे उर्मिला नाईक तर भाजपतर्फे प्रदीप शेट रिंगणात होते. आणि दोघांनाही आपल्या अनामत रक्कमा सुध्दा वाचवता आल्या नव्हत्या. आता यावेळी सुदिनांच्या विरोधात भाजपतर्फे सुदेश भिंगी,तर कॉंग्रेसतर्फे माजी आमदार लवू मामलेदार हे रिंगणात उतरले आहेत.

भाजपतर्फे वाडी तळावलीचे माजी उपसरपंच सुदेश भिंगी यांना उमेदवारी देण्यात आली असून ते ही पूर्वी मगोपमध्येच होते. त्यांना सुदिन ढवळीकरांचे (Sudin Dhavalikar) समर्थक म्हणून ओळखले जात होते. पण 2020 मध्ये झालेल्या जि.पं. निवडणुकीत मडकई मतदारसंघात येणाऱ्या कवळे जिल्हा पंचायतीत मगोपने गणपत नाईक यांना उमेदवारी दिल्यामुळे सुदेश हे सुदिन यांच्यापासून दूर गेले. त्यावेळी अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या भिंगींनी 4000 च्या आसपास मते मिळवली होती. नंतर त्यांनी भाजप मध्ये प्रवेश करून सुदिनांना आव्हान दिले होते. आता या आव्हानाचे रुपांतर भाजपच्या उमेदवारीत झाले आहे.

गेल्या काही महिन्यात माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांच्या उमेदवारीबाबत ही चर्चा सुरु होती. त्यांचा ‘चाय पे चर्चा’ हा या मतदारसंघातला कार्यक्रम बराच लोकप्रिय झाला होता. पण आता रवींना भाजपने फोंड्यातून उमेदवारी दिल्यामुळे या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. सुदिनांना लढत देण्याकरिता तुल्यबळ असा उमेदवार रिंगणात उतरविणे आवश्यक आहे, असा सूर ढवळीकर विरोधकांकडून व्यक्त होत होता. रवी नाईक हा एक त्यावेळी पर्याय होता. पण आता हा पर्याय राहिला नसल्यामुळे सुदेश व लवू यांच्या पर्यायावर सुदिन विरोधकांना विचार करावा लागेल.

सध्या सुदिन यांनी मडकईत आपला प्रचार सुरु केला असला तरी त्यांना इतरत्रही लक्ष द्यावे लागते. त्याप्रमाणे त्यांनी प्रियोळ, मांद्रे, पेडणेत बैठका घेऊन वातावरण निर्मिती सुरु केली आहे. आपतर्फे गुरुदास नाईक तर रिव्होल्युशनरी गोवन्स तर्फे प्रेमानंद गावडे हे रिंगणात उतरणार आहेत. पण त्यांचा निवडणुकीच्या निकालावर विशेष परिणाम होईल, असे सध्या दिसत नाही. त्यामुळे सुदिन यांची विजयी परंपरा खंडित ण्यात राष्ट्रीय पक्ष यशस्वी होतात,का हे बघावे लागेल.

मडकईकडे राष्ट्रीय पक्षांचे दुर्लक्ष भोवणार ?

आतापर्यंत सुदिन यांच्या प्रभावामुळे वा श्रेष्ठींच्या त्रयस्थ वृत्तीमुळे म्हणा, या मतदारसंघाकडे दोन्हीही राष्ट्रीय पक्षांनी म्हणावे तसे लक्ष दिलेले दिसत नाही. यामुळेच सुदेश भिंगी व लवू मामलेदारांपुढे जबरदस्त आव्हान उभे आहे. या आव्हानातून सुदेश व लवू कसे मार्ग काढतात, सुदिनांचा अश्वमेध रोखण्यात यशस्वी होतात, का याचे उत्तर येणाऱ्या काळात मिळणार आहे हे निश्चित.

भंडारी मते लवूंना तारणार का ?

'बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा' असा एकेकाळी दोस्तीचा सूर आळवणारे सुदिन व लवू हे दोन दोस्त आता मडकईत एकामेकांना ‘भिडणार’ आहेत. लवू हे फोंड्याचे माजी आमदार असले तरी त्यांचा मडकईत विशेष असा संपर्क नाही. त्याचबरोबर कॉंग्रेसने या मतदारसंघाकडे अक्षम्य असे दुर्लक्ष केले आहे. त्याचा परिणाम लवूंना भोगावा लागू शकतो. मात्र मडकई मतदारसंघात असलेली भंडारी समाजाची ‘एक गठ्ठा मते’ लवूंच्या मदतीला धावून येतात की काय, हे बघावे लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT