अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाच्या मराठा संकुलाच्या उद्घाटन सोहळ्यात बोलताना मराठा समाजाचे बांधव असलेल्या मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाचे गोव्याच्या जडणघडणीचा इतिहास मोठा आहे असे जाहीर वक्तव्य केले होते. याच्यावर भाष्य करताना सुभाष वेलिंगकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेर करून मुख्यमंत्र्यांनी मराठीवर अन्याय केल्याची टीका केली आहे. या पोस्टवर बऱ्याच मराठा सदस्यांनी हरकत घेतली आहे. मराठा समाजात मराठीचे समर्थक आहेत आणि कोकणीचे ही आहेत.भाषावादाचा संदर्भ मराठ्यांशी लावणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. वेलिंगकर सर, मराठी व मराठा हे वेगळे विषय असून नाहक दिनाची असंगत सांगड घालून मराठ्यांच्या आनंदावर विरजण घालू नका असा सल्ला मराठ्यांनी वेलिंगकर सराना सोशल मीडियावर दिला आहे. ∙∙∙
राज्यात पर्यटन घसरत चालले आहे, अशी चर्चा सध्या चहाच्या टपरीपासून पंचायतींच्या कट्ट्यांपर्यंत रंगू लागली आहे. ‘पर्यटक येत नाहीत’, असा आक्रोश सगळीकडे ऐकू येतो. लोक म्हणतात, पर्यटक सुट्टी घालवायला येतात; धाडस करायला नाही. पण रस्त्यांवर उतरल्यावर खड्डे, सुरू असलेली कामे, वळणावळणावरची धूळ आणि त्यावरची वाहतूक कोंडी पाहून ‘साहसी पर्यटन’ सुरू झाल्यासारखे वाटते. गर्दी काही ठरावीक ठिकाणीच उसळते; बाकी ठिकाणी शांतता. नियोजन कुठे हरवले, असा सवाल लोक विचारू लागले आहेत. एकंदर, पर्यटन घसरले याचे खापर कुणावर फोडायचे, यावर फारसा संभ्रम उरलेला नाही. आता प्रश्न इतकाच, राज्य सरकार स्वतः जबाबदारी घेऊन व्यवस्था सुधारेल का? की पुढील हंगामातही अशीच चर्चा होणार? ∙∙∙
राज्यात सध्या रेतीची चोरटी वाहतूक जोरात सुरू आहे. मध्यरात्रीच्या सुमारास रेतीचे उत्खनन केले जाते आणि पहाटे ही रेती वाहतूक केली जाते. फोंडा आणि म्हार्दोळ पोलिस स्थानकाच्या हद्दीत हा रेती उपसा सुरू आहे. वास्तविक बंदर कप्तानने यासंबंधीची दखल घ्यायला हवी होती, पण बंदर कप्तानचे कर्मचारी डोळेझाक करीत असल्याने रेती माफियांचे फावले आहे, म्हणूनच रेतीमाफिया सध्या जोरात आहेत, मात्र न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होत आहे, त्याचे काय? इतर तपासणी यंत्रणा सुस्त आहे, त्यामुळे रेती माफियांचा मुक्त संचार आहे. ∙∙∙
‘आप’चे ॲड. अमित पालेकर यांना गोवा प्रमुख प्रदावरून मुक्त केल्यास आता पाच दिवस पूर्ण झाले आहेत. मागील काही दिवसांपासून ‘आप’मध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष वाढला असून पक्षांतर्गत धूसफूस वाढू लागली आहे. पक्षाचे दोन्ही आमदार अस्वस्थ आहेत. त्यांना पुन्हा जिंकून येण्याची खात्री नाही. काँग्रेस पुढच्या काळात सासष्टीत आक्रमक भूमिका घेईल. याची त्यांना भीती आहे. त्यामुळे `आप`च्या पक्षश्रेष्ठींना `ग्राऊंड रियाॅलिटी` माहिती नाही, असे ते म्हणतात. पक्षातील ही वाढती धूसफूस कधीतरी स्फोटक रूप घेणार असून नेमका या स्फोटाला वाचा कोण फोडतो? हे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे... ∙∙∙
जिल्हा पंचायत निवडणुकीत गोवा फॉरवर्ड पक्षाला ९ पैकी फक्त एकच जागा जिंकणे शक्य झाले असले, तरी या निवडणुकीमुळे गोवा फॉरवर्ड खऱ्या अर्थाने संपूर्ण गोव्यात पोचला असे म्हणण्यास हरकत नाही. त्यामुळे या पक्षाची पुढील भूमिका काय? या बद्दल सर्वांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी विजय सरदेसाई कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना भेटले. त्यामुळे राजकीय चर्चाना पुन्हा ऊत येणे साहजिकच होते. येणाऱ्या २०२७ मध्ये विजयचे आणि गोवा फॉरवर्डचे नक्की प्लॅनिंग काय असेल, याबद्दल सर्वांना उत्सुकता लागून राहिलीच आहे. विजय आपला न्यू इयर प्लॅन काय? हे जाहीर करणार का? असाही प्रश्न आता लोक विचारू लागले आहेत. ∙∙∙
भंडारी समाजात सद्यस्थितीला आपापली वेगळी चूल मांडत दोन समित्या कार्यरत आहेत. दोन्ही समित्या एकमकांविरोधात अनेकदा शड्डू ठोकताना दिसतात. परंतु, आज देव श्री रूद्रेश्वर रथोत्सव वर्षपूर्ती सोहळ्याच्या पत्रकार परिषदेत वेगळे चित्र पाहायला मिळाले. या समितीत भाजपचे ज्येष्ठ नेते दयानंद मांद्रेकर, भाजप उपाध्यक्ष दीपक नाईक, आपचे ॲड. अमित पालेकर, काँग्रेसचे अमरनाथ पणजीकर आहेत. या सर्व नेत्यांसहित भंडारी समाजाच्या पुढाऱ्यांनी एकत्रितपणे पत्रकार परिषद घेतली. समाजाच्या उत्कर्षासाठी राजकीय, वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून ते एकमताने भंडारी समाज म्हणून विचार मांडताना दिसले. गट-तट बाजूला ठेवून समाजाची एकजूट करण्याचे विचार ते मांडत होते. काँग्रेसचे अमरनाथ पणजीकर यांनी तर पत्रकार परिषदेपूर्वी खुर्च्या देखील स्वतः मांडल्या. ना पक्षीयपदाचा अभिमान केवळ समाजाप्रती कर्तव्य यातून दिसत होते. एकंदरीत येत्या काळात भंडारी समाजातील वाद मिटवून निश्चित काहीतरी बरे होईल, असेच जाणवते.∙∙∙
हल्लीच झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत अपक्ष उमेदवारी दाखल करून प्रस्थापितांना जेरीस आणलेल्या अपक्ष उमेदवार भिका केरकर आणि त्यांचे समर्थक केतन भाटीकर यांनी आपली ‘पॉवर'' दाखवून दिली आहे. या निवडणुकीत कुर्टी मतदारसंघात खुद्द मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांना येऊन प्रचार करावा लागला, त्यासाठी सभांचे आयोजन करण्यात आले, यातूनच भिका आणि केतन यांची पॉवर दिसून येते. अपक्ष उमेदवारी दाखल केलेले भिका केरकर हे कुर्टी-खांडेपार पंचायतीचे माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान पंचसदस्य आहे. जबरदस्त लोकसंपर्क असल्याने तसेच केतन भाटीकर यांचे समर्थन लाभल्याने भिका केरकर केरकर हे विजय प्राप्त करू शकले नाहीत, मात्र अपक्ष असूनही मतांची टक्केवारी वाढवली, हे नक्की. ∙∙∙
युनिटी मॉलच्या नावाने सध्या राज्यात ‘कन्फ्युजन’ निर्माण झाले आहे. स्थानिक म्हणतात, परवानगीच नाही आणि सरकार म्हणते, सगळ्या परवानग्या आहेत. या दोघांमध्ये सामान्य माणूस म्हणतोय, मग खोटे कोण बोलतंय आणि खरं कोण सांगणार? आता सत्र न्यायालयात काय होणार, याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत. मात्र चर्चा रंगतेय, ती येथे काम सुरू आहे, त्याबाबतची. आता खरे कोण, खोटे कोण? हे न्यायालयच ठरवेल. तोपर्यंत युनिटी मॉलपेक्षा युनिटी ऑफ ‘कन्फ्युजन’ मात्र राज्यभर पसरलेलीच राहणार, अशीच चर्चा सध्या रंगतेय. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.