डिचोली: सरकारी योजना लाभार्थ्यांपर्यंत पोचविण्यास कामचुकारपणा करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर यापुढे कडक कारवाई करण्यात येईल. वेळप्रसंगी त्यांना निलंबितही करण्यास मागे पुढे पाहणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देतानाच, पंचायतींनी अशा कामचुकार कर्मचाऱ्यांवर नजर ठेवावी अशी सूचना केली.
कारापूर-सर्वण पंचायतीच्या नूतन पंचायतघराचे लोकार्पण केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. ‘स्वयंपूर्ण गोवा’ हे स्वप्न पूर्ण करायचे असल्यास प्रत्येक घटकाने आपली जबाबदारी ओळखून काम करावे. दिव्यांग आणि अन्य गरजवंतांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचे कर्तव्य असूनदेखील काही कर्मचारी याबाबतीत गंभीर नाहीत. त्यामुळे काही गरजवंत या योजनांपासून वंचित राहतात, अशी खंत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी व्यक्त केली.
सुमारे ६५ लाख रुपये खर्च करून कारापूर - सर्वण पंचायतीसाठी सुसज्ज इमारत बांधण्यात आली आहे. मंगळवारी एका शानदार सोहळ्यात आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी या इमारतीचे लोकार्पण केले. या सोहळ्याप्रसंगी गटविकास अधिकारी ओंकार मांद्रेकर, जिल्हा पंचायत सदस्य महेश सावंत, सरपंच तन्वी सावंत, उपसरपंच दिव्या नाईक आणि माजी सरपंच अपर्णा राणे सरदेसाई उपस्थित होते. यावेळी अपर्णा राणे सरदेसाई यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रशिला परब मातोणकर यांनी सूत्रसंचालन केले.
शेती हा किफायतशीर व्यवसाय आहे. शेतकऱ्यांनी शेतजमिनी पडीक ठेवू नये. सरकारी योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी स्वयंपूर्ण गोव्यासाठी शेती व्यवसायात उतरावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. मुबलक पाणी उपलब्ध असूनदेखील शेतीबाबत अनास्था दिसून येत आहे. शेती लागवडीखाली आणत नसाल, तर कालव्यातून होणारे पाणी बंद करावे लागेल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
सरकारच्या माध्यमातून कारापूर - सर्वण पंचायत क्षेत्रात विविध विकासकामे करण्यात येत आहेत. रस्ते आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत, असे प्रेमेंद्र शेट यांनी सांगून कारापूर येथील ‘कोळम’ तळ्याचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याची योजना आहे. तसेच क्रीडा मैदानासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असल्याचे प्रेमेंद्र शेट यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.