stray dog Dainik Gomantak
गोवा

Stray Dogs : फोंड्यात भटक्या कुत्र्यांची दहशत; महिन्याकाठी सव्वाशे लोकांना कुत्र्यांचा चावा!

भटक्या श्‍वानांच्या संख्येत वाढ, दुचाकीस्वारांसह, पादचाऱ्यांवर हल्ला

दैनिक गोमन्तक

राज्यात कुत्र्यांनी हैदोस घातला असून मंदिरांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फोंड्यात तर दर महिन्याला किमान सव्वाशे लोकांना भटक्या कुत्र्यांकडून चावे घेतले जात असल्याचे धक्कादायक सत्य उघड झाले आहे.

गेल्या पाच महिन्यांचा आढावा घेतला, तर एकूण 633 जणांना कुत्र्यांनी चावे घेऊन जखमी केले असल्याचे स्पष्ट झाले आहे. महिन्याकाठी सव्वाशे लोकांना फोंड्यातील आयडी उपजिल्हा इस्पितळात उपचारासाठी धाव घ्यावी लागत असून खाजगी दवाखान्यात उपचार घेणाऱ्यांची संख्या धरली तर हा आकडा आणखी वाढू शकतो.

फोंड्यात सध्या भटक्या कुत्र्यांची संख्या बेसुमार वाढली असल्याने या कुत्र्यांचा त्रास स्थानिकांना होत आहे. रात्रीच्यावेळी तर दुचाकीस्वार किंवा एखादा एकटा पादचारी रस्त्यावरून जाऊ शकत नाही, एवढी दहशत या कुत्र्यांनी माजवली आहे.

रात्रीच्यावेळी कामावर जाणाऱ्या आणि कामावरून परत येणाऱ्यांच्या पाठीशी हे कुत्रे लागत असल्याने दुचाकीस्वारांना जोरात वाहन चालवावे लागते. कुत्रे भुंकतात म्हणून थांबलो, तर चावण्याची भीती असते, मात्र या प्रकारामुळे दुचाकीस्वारांना अपघात होत असल्याने ‘भीक नको, पण कुत्रा आवर’ असे म्हणण्याची पाळी दुचाकीस्वारांवर आली आहे.

राज्यात 80 हजारांहून अधिक बेवारस कुत्री

श्‍वानप्रेम भोवते...

फोंडा तालुक्यात तर रस्त्यावर श्‍वानप्रेम उतू चालले आहे. काही प्राणिमित्र भटक्या कुत्र्यांना तयार जेवण घालतात, तर काहीजण बिस्किट आदी पदार्थ टाकतात. काही श्‍वानप्रेमी तर बेवारशी कुत्र्यांना हुडकून काढून त्यांना हे जेवण खाऊ घालतात.

त्यात मांसाचा समावेश असल्याने हे कुत्रे माणसाच्या मांसाला चटावल्याचे स्पष्ट झाले असून आता सरकारनेच या श्‍वानप्रेमींवर कारवाई करण्याची मागणी कुत्र्यांनी चावा घेतलेल्या लोकांकडून होत आहे.

संख्या बेसुमार वाढली

राज्यात 80 हजार बेवारस कुत्री असल्याचे एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात आढळले आहे. लोकांच्या मागे धावणे, चावा घेणे, रात्रीच्यावेळी भुंकून लोकांची झोपमोड करणे असे प्रकार होत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो.

कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी कुत्र्यांचे निर्बिजीकरण प्रभावीपणे करण्याची आवश्‍यकता आहे.

गेल्या पाच महिन्यांत 633 जणांना चावा

जानेवारी - ११४

फेब्रुवारी - १३०

मार्च- १३०

एप्रिल - १२५

मे - १३४

प्रतिक्रिया अशा...

भटक्या कुत्र्यांवर आता सरकारनेच कडक कारवाई करण्याची गरज आहे. कुत्र्यांना पूर्वी ठार मारले जायचे, पण प्राणिमित्रांमुळे कुत्र्यांना अभय मिळाले, पण लोकांना आता हे कुत्रे सळो की पळो करून सोडतात, त्यामुळे सरकारनेच काय ती कारवाई करावी.

सूरज दिगंबर नाईक (नागझर - कुर्टी)

भटक्या कुत्र्यांमुळे राज्यात सध्या मोठी समस्या निर्माण झाली आहे. या कुत्र्यांना आता आवरण्याची गरज आहे, अन्यथा हे कुत्रे माणसांनाच फाडून खातील, असा धोका आहे. सरकारने कुत्र्यांवर कारवाई करण्यासाठी ठोस निर्णय घ्यावा.

रामदास जीवा गावकर (तिस्क - उसगाव)

फोंडा उपजिल्हा इस्पितळात कुत्रे व इतर जनावरांनी चावे घेतल्याची प्रकरणे वाढली आहेत. इस्पितळ अशा रुग्णांवर उपचार करते, पण प्रत्येकाने खबरदारी घेण्याची आवश्‍यकता आहे.

राज्यात रेबिजचे रुग्ण नाहीत, पण कुत्र्यांनी चावे घेण्याचे प्रकार आहेत. कुत्रा चावल्यानंतर संबंधित रुग्णाने जखम आधी स्वच्छ धुऊन इस्पितळात जाऊन निर्धारित इंजेक्शने घेणे गरजेचे आहे.

डॉ. जयश्री मडकईकर (अधीक्षक, फोंडा आयडी उपजिल्हा इस्पितळ)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद

Waste Management Projects: कुडचिरेवासियांच्या आंदोलनाला यश; प्रस्तावित बांधकाम कचरा निर्मूलन प्रक्रिया प्रकल्प होणार रद्द!

Goa Crime: दिवसाढवळ्या अपहरणाचा थरार! व्यवसायिकाला लुटण्याच्या मनसुब्यावर स्थानिकांनी फिरवले पाणी

Kala Academy: चूक मान्य करा, कामाला लागा!

Goa Accident: गोव्यात नऊ महिन्यात 209 अपघात, तरीही 10 टक्क्यांची घट; 'हे' आहे मुख्‍य कारणं

SCROLL FOR NEXT