Protest Against Bhutani Infra Project | Sancoale Against Mega Project Dainik Gomantak
गोवा

Bhutani Project: 'भूतानी'विरुद्ध गोमंतकीयांची एकजूट! आंदोलनातून देणार इशारा; उपोषणाला राज्यातून वाढता प्रतिसाद

Bhutani Infra Project Sancoale: सांकवाळ येथील भूतानी मेगा प्रकल्पाविरोधात माजी सरपंच प्रेमानंद नाईक यांनी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला राजकीय नेते, बिगर सरकारी संघटना, तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Sancoale Against Mega Project Bhutani Infra

पणजी: सांकवाळ येथील भूतानी मेगा प्रकल्पाविरोधात माजी सरपंच प्रेमानंद नाईक यांनी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला राजकीय नेते, बिगर सरकारी संघटना, तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळत आहे. नाईक यांच्या उपोषणाला राज्यभरातून पाठिंबा मिळावा, यासाठी ‘सांकवाळ अगेन्स्ट मेगा प्रोजेक्ट’ या सांकवाळमधील ग्रामस्थांच्या संघटनेने राज्यातील जनतेला हाक दिली आहे.

आंदोलनात राज्यातील जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन या संघटनेने केले आहे. ‘सांकवाळ अगेन्स्ट मेगा प्रोजेक्ट’ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी पणजीतील आझाद मैदानावर पत्रकार परिषद घेऊन गोव्यातील जनतेला हे जाहीर आवाहन केले. याप्रसंगी पंचसदस्य मॉरेलिओ कार्व्हालो, पीटर डिसोझा, रमाकांत नाईक, दामोदर नाईक, प्रवीणा नाईक, दामोदर डी. नाईक, रामा काणकोणकर यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.

कार्व्हालो म्हणाले की, पंचायतीने या प्रकल्पाला ज्या बांधकामास परवानगी दिली आहे, त्याविरोधात माजी सरपंच प्रेमानंद नाईक हे गेली सहा दिवसांपासून उपोषण करीत आहेत. त्यांचे आरोग्य बिघडले आहे, तरीही त्यांनी अद्याप माघार घेतलेली नाही.

रविवारी नाईक यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे. आतापर्यंत अनेक राजकीय नेते, बिगर सरकारी संघटनांचे सदस्य आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी नाईक यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दर्शविला आहे. पंचायतीने भूतानी मेगा प्रकल्पाला दिलेला परवाना मागे घेतल्यास मी त्वरित उपोषण सोडू, असे नाईक यांचे म्हणणे आहे.

सांकवाळ या छोट्या गावात ३५ हजार चौ. मी. खासगी वनजागेत ६५० फ्लॅट आणि व्हिलाज बांधण्याचा भूतानीचा प्रस्तावित प्रकल्प आहे. काणकोणकर म्हणाले की, प्रेमानंद नाईक यांच्या उपोषणाचा उद्या सातवा दिवस आहे. समाजमाध्यमांतूनही त्यांच्या उपोषणास पाठिंबा मिळत आहे. टॅक्सी व्यावसायिक, शेतकरी, शिक्षक, यांना आम्ही उद्या सांकवाळ येथे गावात एकत्रित येण्याचे आवाहन करीत आहोत.

शांततापूर्ण निदर्शने

प्रेमानंद नाईक यांचे बिघडलेले आरोग्य पाहता त्यांनी ते उपोषण मागे घ्यावे, यासाठी आमदार, खासदारांनी विनंती केली आहे. तरीही त्यांनी माघार न घेण्याचे ठरविले आहे. गोव्यातील सर्व लोकांनी सांकवाळ येथे रविवारी दुपारी ३ वाजता पंचायतीजवळ येऊन त्यांना पाठिंबा दर्शवावा. राजकीय पक्षांनीही एकत्रित यावे आणि शांततेत आंदोलन करून सत्ताधारी पंचायत सदस्यांना बांधकाम परवाना मागे घेण्याची विनंती करूया, असे आवाहन पंचसदस्य कार्वाल्हो यांनी केले.

समाज कार्यकर्त्यांचा सांकवाळात ओघ

भूतानी प्रकल्पाविरोधात सलग सहा दिवस उपोषणाला बसलेले सांकवाळचे माजी सरपंच प्रेमानंद नाईक यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांचा सांकवाळकडे ओघ वाढला होता. शनिवारी पीटर डिसोझा, प्रतिमा कुतिन्हो, ओलेन्सियो सिमॉईस, संजय बर्डे, जुने गोवे, बायंगिणी येथील सेंट पेद्रो चर्चचे फादर कॉनेलो ब्रिटो फर्नांडिस, कॅन काब्राल, रामा काणकोणकर, शंकर पोळजी, तारा केरकर तसेच स्थानिक रहिवाशांनी नाईक यांची भेट घेऊन त्यांचे मनोबल वाढविले.

‘भूतानी’विरोधात कॉंग्रेसची दक्षता खात्याकडे तक्रार

सांकवाळ येथील भूतानी प्रकल्पाला बेकायदेशीर बांधकाम परवाना दिल्याप्रकरणी ग्रामसेवक ऑर्विले वेल्स आणि पंचायत संचालक सिद्धी हळर्णकर यांच्याविरोधात कॉंग्रेसचे उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांनी दक्षता खात्याकडे तक्रार केली आहे. त्यांनी एका पत्रकाद्वारे, ग्रामसेवक वेल्स यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. वेल्स यांनी पंचायतीचे सचिव म्हणून स्वतःला भासवून बेकायदेशीर बांधकाम परवानग्या जारी केल्याचा दावा पत्रकात केला आहे. याप्रकरणी दक्षता खात्याने कारवाई करण्याची मागणीही कवठणकर यांनी केली आहे.

वेल्स यांच्या मालमत्तेची चौकशी करा!

वेल्स यांनी पंचायत सचिवाची खोटी ओळख सादर करून भूतानी प्रकल्पासाठी परवानग्या जारी केल्या असून, हे प्रकार पंचायतीच्या सदस्यांनी नाकारले होते. वेल्स यांची मालमत्ता आणि आर्थिक व्यवहार त्याच्या उत्पन्नाच्या प्रमाणात तपासण्याची गरज असल्याचा उल्लेखही कवठणकर यांनी पत्रात केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: अनिर्बंध खनिज व्यवसायामुळे शेती व्यवसायावर संक्रात; मयेतील ग्रामस्थ भडकले

Margao Crime: मडगाव अपहरण प्रकरणाला जुन्या वादाची किनार! ‘रुबेन’ अद्याप फरारच

Goa News: गोव्याने कॅन्सरविरोधात सरसावल्या बाह्या! स्क्रीनिंग अभियानाला गती; 1057 जणांची कर्करोग तपासणी

Diwali 2024: गोव्याची दिवाळी एकदम खास्सम खास! घरबसल्या बनवा विविध प्रकारचे पोहे

Saligao Theft: घरमालकाच्या मोबाईलवरून 'ऑनलाईन' चोरी! गोव्यातील अजब प्रकार; संशयिताच्या कर्नाटकमध्ये आवळल्या मुसक्या

SCROLL FOR NEXT