Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: गोव्याच्या राजकारणात घडतंय काय ? कोणाला न सांगता रमेश तवडकरांची थेट दिल्लीवारी

गोवा विधानसभेचे अध्यक्ष रमेश तवडकर दिल्ली भेटीवरून परतल्यानंतर ज्येष्ठ मंत्री पातळीवर त्यांच्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होतेय.

दैनिक गोमन्तक

Goa Politics: गोवा विधानसभेचे अध्यक्ष रमेश तवडकर दिल्ली भेटीवरून परतल्यानंतर ज्येष्ठ मंत्री पातळीवर त्यांच्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होतेय. गोव्यातील मंत्र्यांना विश्‍वासात न घेता नवी दिल्लीत जाऊन नितीन गडकरींसह अनेक ज्येष्ठ मंत्र्यांची भेट घेतली. मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांच्याकडून थेट निधीची मागणी करणारे ते पहिले भाजप नेते.

सार्वजनिक बांधकाम खात्यासह आरोग्य व इतर खात्यांकडून आपल्याला काणकोणच्या विकासासाठी निधी मिळावा यासाठी तवडकर यांनी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे अनेक मंत्री संतापले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी नोंदविल्या. दुसऱ्या बाजूला सभापती म्हणून त्यांनी काही काळासाठी मुख्यमंत्र्यांकडून पोलिस एस्कोर्ट्स मागून घेतला होता.

विधानसभा अधिवेशन संपल्यानंतर काही काळ वाहतूक कोंडी होत असल्याने हा एस्कोर्ट्स चालू रहावा, अशी मनधरणी त्यांनी केली. परंतु त्याचा विपरितच परिणाम होत असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या कानावर आले आहे. तवडकरांचे दिल्लीत वजन वाढले असून, ते नजीकच्या काळात गोव्यात सर्वोच्च पद मिळवू शकतात, अशी चर्चा तवडकरांच्या निकटवर्तीयांमध्ये सुरू झाली आहे. ही बाब प्रमोद सावंतांच्या कानावर आल्यानंतर तेही अस्वस्थ झाले.

दिल्लीदरबारी वजनधारी

भाजपचे प्रवक्ते सावियो रॉड्रिग्स हे पक्षासाठी डोकेदुखी जरूर ठरले होते. परंतु त्यांना या पदावरून काढण्यासाठी पक्षाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांना संपूर्ण प्रवक्ते मंडळच बरखास्त करावे लागले. परंतु सावियो यांना त्याची फारशी फिकीर नाही. कारण आपले दिल्लीपर्यंत वजन असल्याचे सावियोने आपल्या मित्रमंडळींमध्ये सांगितले आहे.

वास्तविक सावियो यांना प्रवक्तेपद द्या, असे दिल्लीहूनही पक्षाला सांगितले नव्हते. परंतु सावियोंचे दिल्लीतील वजन पाहूनच त्यांना हे काम मिळाले. त्यापूर्वी सावियो यांना दिल्लीवरूनच थेट वेळ्ळीची उमेदवारी मिळाली होती. इतकेच नव्हे तर स्मृती इराणीसारख्या नेत्या सर्व महत्त्वाच्या सभा सोडून सावियोंच्या प्रचारासाठी वेळ्ळीत गेल्या होत्या.

सावियोंची तेथे अनामत रक्कम जप्त झाली. त्यानंतर सावियोंना कॅथलिक मते मिळत नसल्याचे सिद्ध झाले. सध्या तर ते विजय सरदेसाईंना निकट गेल्याचीही चर्चा होती. फातोर्डातील विजय सरदेसाई यांच्या कार्निव्हलला सावियो यांनी जाहीर पाठिंबा दिला होता. त्यामुळे दामू नाईकांना मिरच्या झोंबल्या

सायबांची खंत

गोव्यातील वाढते रस्ते अपघात आणि त्यात जात असलेले मानवी बळी याबद्दल प्रत्येकजण चिंता व्यक्त करत असताना सरकारी यंत्रणा मात्र एकमेकांवर जबाबदारी ढकलताना दिसत आहे. वाहतूक पोलिस अधिक्षकांनी तर वाहतूक व साबांखाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून स्वत: नामानिराळे राहण्याची चालविलेली धडपड केविलवाणी ठरली आहे.

खरे तर या वाढत्या अपघातांना हे तिन्ही विभागच कारणीभूत आहेत. त्यांनी समन्वयाने पावले उचलली, तर अपघात होणारच नाहीत, पण वाहतूक पोलिस व वाहतूक खाते केवळ चलन देऊन तिजोरी भरण्याचे काम तेवढे करतात, असे आरोप लोक करतात. सायबाने इतरांना दोष न देता वाहतूक पोलिस घोळक्याने जमून तालांव का देतात, याचा शोध घ्यावा, असेही लोक बोलतात.

पाॅवरफुल पर्यटनमंत्री

राज्यात दरवर्षी कार्निव्हल महोत्सवाला राजधानी पणजीतून सुरुवात होते. मात्र यावर्षी पर्यटनमंत्री असलेल्या रोहन खंवटे यांनी ती पर्वरी मतदारसंघातून सुरू करून त्यांनी आपली सरकारात असलेली ‘पाॅवर’ दाखवून दिली आहे. गेली अनेकवर्षे सुरू असलेल्या परंपरेला तडा गेला आहे.

ते राज्याचे पर्यटनमंत्री आहेत त्यामुळे त्यांना पाहताना फक्त आपल्या पर्वरी मतदारसंघाच्या हिताचेच फक्त न पाहता राज्याच्या हिताचे पाहण्याची गरज आहे. सध्या भाजप सरकार हे मुख्यमंत्री तसेच त्यांचे उजवे डावे असलेले मंत्री माविन गुदिन्हो व रोहन खंवटे हेच त्रिकूट चालवतात अशी चर्चा आहे.

पर्यटनमंत्री हे मंत्रिमंडळातील पाॅवरफुल मंत्री म्हणून पाहिले जाते. त्यांच्याकडे असलेल्या खात्यामार्फत किनारपट्टी परिसरातील अतिक्रमणे हटवण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत मात्र हे किती दिवस शक्य आहे की ‘येरे माझ्या मागल्या’ म्हणीप्रमाणे काही दिवसांनी पुन्हा तेच चित्र दिसणार आहे. न्यायालयाने यापूर्वी आदेश दिले आहेत त्याची अंमलबजावणी का गेली नाही व अचानाक त्यांनी केलेली ही कारवाई काही तरी सांगून जाते अशी उलटसुलट चर्चा आहे.

मंत्री श्रीपाद नाईक राजीनामा देणार का?

म्‍हादईप्रश्‍‍नी गोव्‍याची कायदेशीर बाजू कमकुवत आहे. कळसा-भांडुराचे पाणी वळविण्‍यासाठी कर्नाटकने तयार केलेल्‍या नव्‍या ‘डीपीआर’ला केंद्राने तत्‍काळ मंजुरी दिली आहे. प्रत्‍यक्षात काम सुरू करण्‍यासाठी आता गरज आहे ती केवळ पर्यावरणीय दाखल्‍याची. तो मिळू नये म्‍हणून राज्‍य सरकार कोणते प्रयत्‍न करेल, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

त्‍याचवेळी सत्तेतील सर्व नेते मूग गिळून गप्‍प असल्‍याने सोशल मीडियावर खिल्‍ली उडवली जात आहे. श्रीपाद नाईक यांनी म्‍हादईप्रश्‍‍नी केंद्र सरकार गोव्‍याच्‍या विरोधात गेले तर आपण राजीनामा देऊ, असे म्‍हटले होते. अमित शहा यांनी बेळगावात कर्नाटकची भलावणी केल्‍यापासून नाईक गप्‍पच आहेत. ते राजीनामा कधी देणार, असा प्रश्‍‍न अनेकजण विचारू लागले आहेत.

नगरसेवकांवर भरोसा नाय का?

मडगाव येथे नगरपालिका जो कार्निवल साजरा करत आहे, त्यात सर्व नगरसेवकांना सामील करून घेतले असले तरी या सर्व नगरसेवकांवर कमिटीचा विश्र्वास आहे का? असे वाटण्याचे कारण म्हणजे यावेळी खेळ सादर करण्यासाठी नगरसेवकांना घातलेल्या अटी.

पूर्वी नगरसेवकांना खेळ सादर करण्यासाठी आगावू पैसे दिले जायचे. पण आत्ता म्हणे कमिटीचे लोक जाऊन हे खेळ पाहणार. मग त्याचा फोटो काढणार आणि मगच पैसे देणार असे ठरले आहे. कमिटीचा नगरसेवकांवर भरोसा नाय का?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

Raechelle Banno: 'IFFI ला माझ्या चित्रपटाने सुरुवात झाली हे पाहून आनंद झाला'; बेटर मॅनच्या अभिनेत्रीने भूमिकेच्या दबावाबद्द्ल मांडले मत

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

SCROLL FOR NEXT