Francisco Sardinha: दिव्यांगांना मदत आणि त्यांचे परावलंबित्व कमी व्हावे म्हणून केंद्र व राज्य सरकार विविध योजना राबवत असते. तसेच, खासदार निधीतून दिव्यांगांना दुचाकीला दोन चाके जोडून गाडी दिली जाते. यासाठी निधीची विशेष तदतूद करण्यात आली आहे.
दरम्यान, दक्षिण गोव्यात खासदार फ्रान्सिस सार्दिन यांच्या खासदार निधीतून चार गाड्या दिव्यांगांना देण्यात आल्या.
पण, या कार्यक्रमावेळी घडलेल्या एक प्रसंगाची चर्चा सध्या सर्व गोव्यात होत आहे. केवळ दहा मिनिटे एक दिव्यांग लाभार्थी या कार्यक्रमासाठी उशीरा आल्याने खासदार संतापले शिवाय त्याला गाडी न देताच माघारी देखील धाडले.
दक्षिण गोव्यात खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी खासदार निधीतून चार गाड्या दिव्यांगाना वितरित करण्याचा कार्यक्रम बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केला होता. सर्व लाभार्थ्यांना कार्यक्रमासाठी पावणे अकरा वाजता बोलवले होते.
दरम्यान, एक लाभार्थी या कार्यक्रमासाठी उशीरा आला. नियोजित वेळेत न आल्याने खासदार सार्दिन यांचा पारा चढला आणि त्याला गाडी देण्यास नकार दिला.
तुम्हाला वेळेत यायला काय होते? असे सार्दिन यांनी त्याला सुनावले. तसेच, रविवारच्या कार्यक्रमात येऊन गाडी घ्या असे सार्दिन यांनी त्याला सांगितले.
...म्हणून उशीर झाला
बुधवारी पावणे अकरा वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरम्यान, काही कारणास्तव या कार्यक्रमाला उशीर झाल्याचे त्याने सांगितले. मात्र, संतापलेल्या खासदार सार्दिन यांनी त्याला खडेबोल सुनावले.
या कार्यक्रमासाठी शिरोडा, फोंडा व इतर ठिकाणच्या लाभार्थ्यांना बोलविण्यात आले होते. दिव्यांगाला शेवटपर्यंत गाडी दिली जाईल या आशेने तो थांबला होता पण, त्याला रिकाम्या हातीच परतावे लागले.
दरम्यान, दिव्यांगांचा जाहीर कार्यक्रमात अपमान केल्याने विविध कार्यक्रमस्थळी अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.