Som Yag Yadnya 2023
Som Yag Yadnya 2023  Dainik Gomantak
गोवा

Som Yag Yadnya 2023: गोमंतकीयांनी 'या' कारणांसाठी सोमयागात सहभागी व्हावं!

दैनिक गोमन्तक

Som Yag Yadnya Festival 2023 Goa

दुर्मीळ व दुर्लभ असलेला सोमयाग फक्त पाहण्यासाठी जावे. तो समजून घ्यावा. त्यांचा आनंद घ्यावा. परमार्थाच्या हेतूने केला जाणार्‍या या सोमयागामध्ये सर्व गोमंतकीयांनी सहभागी व्हावे.

सोमयागामध्ये सोमरसाचे हवन करायचे असते. ‘सोम’ ही वनस्पती आहे. हिमालय व इतर काही पर्वतरांगांध्ये ही वेल सापडते. चंद्राप्रमाणे वागणारी वेल म्हणून तिला सोमवल्ली असे म्हणतात. अमावास्येला एकही पान नसलेली या वेलीला शुक्ल प्रतिपदेला पान फुटायला सुरुवात होते.

पौर्णिमेपर्यंत ही वेल पानांनी बहरते. पौर्णिमेचे चांदणे त्यावर पडून गेले की, कृष्ण प्रतिपदेपासून पाने गळायला सुरुवात होते व अमावास्येला या वेलीवर एकही पान नसते. वेल थोडीशी करड्या, हिरवट रंगाची असते व पाने हिरवी असतात.

वेदकाळातही ही वनस्पती अतिशय दुर्मीळ, दुर्लभ होती. सोमयाग करण्यासाठी डोंगरावर जाणार्‍या लोकांकडून गायी, म्हशी, बैल, घोडा, सोने असे देऊन ती विकत घ्यावी लागे. प्रातिनिधिक स्वरूपात त्याची झलक आजही सोमयागात पाहायला मिळते. ही वनस्पती वाजत गाजत यज्ञस्थळी आणली जात होती.

सद्य:स्थितीत वेदकाळातील या मूळ वनस्पतीच्या उपजातीय वेली उपलब्ध आहेत. सोमयागाच्या माध्यमातून पर्यावरणाचे संतुलन राखण्यामध्ये, शुद्धिकरणामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका असलेली ही सोमवल्ली काळाच्या ओघात लुप्तप्राय झाली आहे.

तरीही काही ठिकाणी त्याचे मुद्दाम संवर्धन केले जाते. उलट काळाच्या ओघात या सोमवल्लीला, सोमयागाला व सोमयागींना विकृत पद्धतीने मांडण्याची अहमहमिका विद्वानांमध्ये सुरू झाली. सोमरस म्हणजे दारू आणि सोमपान म्हणजे दारू पिणे असा चुकीचा समज मुद्दाम रूढ करण्यात आला. तसा तो नाही.

सोमयाग करण्यासाठी वेदांचे ज्ञान, अभ्यास आणि प्रशिक्षण असलेलेच ब्राह्मण लागतात, ज्यांना ‘ऋत्विज’ असे म्हटले जाते. ऋग्वेद जाणणार्‍या ऋत्विजांच्या प्रमुखाला ‘होता’, असे म्हणतात ज्याच्या हाताखाली ‘प्रस्तोता’, ‘प्रतिहर्ता’ आणि ‘सुब्रह्मण्य’ हे तिघे असतात.

यजुर्वेद जाणणार्‍या ऋत्विजांच्या प्रमुखाला ‘अध्वर्यु’, असे म्हणतात, ज्याच्या हाताखाली ‘प्रतिप्रस्थाता’, ‘नेष्टा’ आणि ‘उन्नेता’ हे तिघे असतात. सामवेद जाणणार्‍या ऋत्विजांच्या प्रमुखाला ‘उद्गाता’, असे म्हणतात, ज्याच्या हाताखाली ‘मैत्रावरुण’, ‘आच्छावक’ आणि ‘प्रावस्तुत’ हे तिघे असतात. अथर्ववेद जाणणार्‍या ऋत्विजांच्या प्रमुखाला ‘ब्रह्मा’ असे म्हणतात, त्याच्या हाताखाली ‘ब्राह्मच्छंसी’, ‘आग्नीध्र’ आणि ‘पोता’ हे तिघे असतात.

अधिष्ठात्या देवतांचे आवाहन वगैरे करण्याचे कार्य ‘होता’ करतो. यज्ञकुंड, वेदी, मंडप वगैरे यांचे मोजमाप, विधींचा क्रम व त्यांची सर्व तांत्रिक बाजू पाहण्याची जबाबदारी ‘अध्वर्यु’ची असते. आवाहन करून बोलावलेल्या देवतांची गायनातून स्तुती करण्याची जबाबदारी ‘उद्गाता’ची असते. सोमयागात होता, अध्वर्यु आणि उद्गाता यांचे सर्व कार्य व्यवस्थित चालले आहे की नाही, कुठे काही अडत तर नाही ना, यावर लक्ष देणे, मार्गदरशन करणे, संरक्षण करणे हे कार्य ‘ब्रह्मा’ करतो.

सोमयागामध्ये लागणारी पात्रासाधने, त्यांची मोजमापे हासुद्धा खूप रंजक आणि माहिती करून घेण्यासारखा विषय आहे. यज्ञकुंड, वेदी यांच्या मोजमापासाठी वैदिक काळातील प्रमेये आजही आपण भूमितीत शिकतो. मंडप किती उंच असावा, याचेही विशिष्ट मोजमाप असते.

यज्ञामध्ये तूप पेट घेईल इतपत तापवले जाते व त्यात शेळीचे थंड दूध घातले जाते, त्यानंतर जी अग्निज्वाला भडकते ती खूप उंच (जवळपास 40 फूट) जाते, त्याचा स्पर्श होऊन मंडप पेटू नये इतक्या उंच तो आच्छादित करावा लागतो. या विधीला ‘प्रवर्ग्य’, असे म्हणतात आणि तो खूपच प्रेक्षणीय असतो.

सोमयाग पूर्ण झाल्यानंतर यजमान दांपत्य सरोवरामध्ये स्नान करतात त्याला ‘अववृत स्नान’ असे म्हणतात. या स्नानाला सोमयागामध्ये फार महत्त्व आहे.

म्हापशाला दि. 5 रोजीपासून होणार्‍या सोमयागामध्ये हा ‘प्रवर्ग्य’ विधी पाहण्यासाठी मुद्दाम जावे, इतका तो प्रेक्षणीय असतो. सामान्यत: आपण पूजा अर्चा म्हटले की, फुले फळे घेऊन जातो. पण, सोमयागामध्ये फक्त हवन आणि हवन असते.

त्यामुळे, तिथे दुर्मीळ व दुर्लभ असलेला सोमयाग फक्त पाहण्यासाठी जावे. तो समजून घ्यावा. त्यांचा आनंद घ्यावा. त्याच्यामागे पर्यावरण संतुलनाचे, निसर्गचक्राच्या संरक्षणाचे महत्त्व समजून त्याचा अनुभव घ्यावा. परमार्थाच्या हेतूने केला जाणार्‍या या सोमयागामध्ये सर्व गोमंतकीयांनी सहभागी व्हावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karnataka Sex Scandal Case : कर्नाटकातील सेक्स स्कँडल प्रकरणाचा गोव्यावर परिणाम नाही : सदानंद तानावडे

Goa Today's Live News: इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर किमान 10-15 राज्यातील सरकार कोसळतील - पवन खेरा

India Canada Relations: जस्टिन ट्रुडोचे पुन्हा बरळले, आम्ही खलिस्तानसोबत आहोत; भारतासोबतच्या संबंधांवर काय म्हणाले?

Loksabha Election : प्रचारासाठी पायाला भिंगरी, जनसामान्‍यांना भेटीची आस; पल्‍लवी धेंपे यांचा प्रचार

Margao News : मतदानाला प्रेरित करण्‍यास पॅरा ग्‍लायडर्सचा वापर : आश्‍वीन चंद्रू

SCROLL FOR NEXT