Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; ‘स्मार्ट बस’ अचानक गायब!

Khari Kujbuj Political Satire: आज, ८ मे रोजी कला अकादमीच्या नूतनीकरणात झालेल्या घोटाळ्याची तपासणी करणाऱ्या ‘टास्क फोर्स’ची महत्त्वाची बैठक होत आहे.

Sameer Panditrao

‘स्मार्ट बस’ अचानक गायब!

स्मार्ट सिटीमधून धावणाऱ्या ‘स्मार्ट’ बसेस काही दिवसांपासून अलर्ट मोडमध्ये गेल्यात की काय, अशी चर्चा सुरू आहे. गोवा कदंब महामंडळाने स्मार्ट बसेसचा ताबा घेतला, मार्गही ठरवले... पण अचानक काही बसेस गायब झाल्या. प्रवासी बससाठी उभे आणि बस मात्र कुठेच नाही, ना पूर्वसूचना, ना बोर्ड, ना माफी. याहून मजेशीर गोष्ट म्हणजे, संतप्त प्रवासी संपर्क करतात, पण कदंब महामंडळचे जबाबदार अधिकारी फोन उचलतील तर बोलणे होईल ना! अधिकारी इतके ‘बिझी’ की प्रवाशांना ‘बस आज नाही’ इतके सांगण्यासही वेळ नाही. माहितीच्या युगात माहिती न देणं हेच सगळ्यात मोठं गैरवर्तन मानलं जातं आणि याला प्रवाशांनी कदंब महामंडळाला जबाबदार ठरवले आहे. आता त्यांचे चुकले का? याचे उत्तर महामंडळाने दिले तरच बरे होईल, नाही का? ∙∙∙

कला अकादमीचा ‘हा’ अधिकारी कोण?

आज, ८ मे रोजी कला अकादमीच्या नूतनीकरणात झालेल्या घोटाळ्याची तपासणी करणाऱ्या ‘टास्क फोर्स’ची महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीत विविध तज्ज्ञांनी तयार केलेल्या अहवालावर चर्चाही होईल. ‘टास्क फोर्स’चे काम चालू असताना टास्क फोर्सचे अध्यक्ष विजय केंकरे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यात वितुष्ट घडवून आणण्याचाही प्रयत्न कला अकादमीच्या एका जबाबदार अधिकाऱ्यांकडून केला गेला. विजय केंकरे यांनी ‘मी मुख्यमंत्र्यांना एक्सपोज करेन’ अशी धमकी दिल्याची हुल या अधिकाऱ्याने धूर्तपणे उठवली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून चौकशी केल्यानंतर या अधिकाऱ्याचेच पितळ उघडे पडले. कोणताही अधिकार नसताना हा अधिकारी ‘टास्क फोर्स’च्या बैठकीलाही आगाऊपणे येऊन बसतो. त्याला हा अधिकार कोणी दिला, हे कोणालाही ठाऊक नसले तरी मास्टर दीनानाथ मंगेशकर कलामंदिराच्या तांत्रिक विभागाशी त्याचा संबंध असल्यामुळे त्याचा आगाऊपणा खपून जातो. ∙∙∙

राजकारण नको..!

शिरगावमधील चेंगराचेंगरी ही अत्यंत दुर्दैवी तेवढीच अंगावर शहारे आणणारी दुर्घटना होती. या चेंगराचेंगरीत सहा भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अजूनही या दुर्घटनेची भयानकता डोळ्यांसमोर आहे. काही दिवसांनी ही दुर्घटना कदाचित विस्मृतीत जाईल. मात्र यापुढे दर जत्रोत्सवावेळी या दुर्घटनेची भयानकता जाणवणार आहे. सरकारने सत्यशोधन समिती नियुक्त करून या दुर्घटनेची चौकशीचे आदेश दिलेत. चौकशीनंतर दुर्घटना नेमकी कशी घडली, ते स्पष्ट होईल. तूर्त या दुर्घटनेचा बाऊ करून काहींनी राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. श्री लईराई देवस्थानच्या माजी अध्यक्षांनी तर दुर्घटनेचे खापर विद्यमान देवस्थान समितीवर फोडलेय. हा प्रकार म्हणजे आगीत तेल ओतण्याचा प्रकार नव्हे का?,अशी विचारणा होतेय. ∙∙∙

प्रसन्न मुद्रेतील मुख्यमंत्री

पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे भारतीय सेनादलांनी उद्धस्त केले. यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बुधवारी प्रसन्न मुद्रेत होते. पत्रकार परिषद झाल्यावर आणखी काही विचारायचे आहे का, असेही त्यांनी थांबून विचारले. त्यांनी केंद्र सरकारने केलेल्या कारवाईची वारेमाप स्तुती केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती देश सुरक्षित आहे, हे सांगण्यासाठी त्यांनी शब्दांची कंजुषी केली नाही. मंत्रिमंडळ बैठकीतही या कारवाईची स्तुती केली गेली हे सांगण्यासही ते विसरले नाहीत. भारताने करून दाखवले ही झलक त्यांच्या चेहऱ्यावर बुधवारी दिसून आली. शिरगावच्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री माध्यमांना हसऱ्या चेहऱ्याने सामोरे जाताना दिसले नव्हते, मात्र पाकिस्तानवरील कारवाईनंतर त्यांची कळी खुलल्याचे दिसून आले. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire

सौंदर्यीकरण पूर्ण होणार तरी कधी?

मडगावांत विविध भागातील सौंदर्यीकरणाच्या अनेक योजना आखल्या गेल्या पण त्या पूर्ण झाल्या की काय त्याचे उत्तर मिळत नाही. बरे या योजना संपूर्ण मडगावसाठी नागहीत तर विशिष्ट भागासाठी आहेत व त्यावर कोट्यवधीच्या खर्चाची अंदाजपत्रके असल्याचे मडगाववाले म्हणतात. परवा अशा अनेक योजनाचा शुभारंभ झाला. आके वीजखाते जंक्शन ते रेल्वे स्टेशन आके बाजू दरम्यानच्या वर्तुळाकार रस्त्याच्या योजनेचा शुभारंभ होऊन कित्येक वर्षे उलटली पण अजून ते काम अर्धवट आहे. तेथे पदपथ बांधले गेले पण या कामाचे उद्‍घाटन होण्यापूर्वीच त्यावरील पेव्हर्स उखडून गेले आहेत व त्यावर काटेरी झुडपे व वेली वाढल्या आहेत. रेल्वे स्टेशन पुलाजवळच्या भागात तर सगळा गोंधळच आहे. तेथील गाडे ही एक वेगळीच समस्या आहे. हे असे असतानाच तेथून मालभाट पर्यंतच्या रस्त्याचे काम केले गेले आहे. ही कामे लोकांच्या सोयीसाठी की कंत्राटदाराची व्यवस्था करण्यासाठी असा प्रश्नही त्यातून उपस्थित होत आहे. ∙∙∙

प्रियोळवर दावा अन् धाकधूक

प्रियोळ मतदारसंघावर ‘मगो’ चा कायम दावा राहिला आहे. दोनदा ‘मगो’ चे उमेदवार दीपक ढवळीकर हे निवडून आल्यानंतर मागच्या दोन खेपा गोविंद गावडे यांनी बाजी मारली होती. गेल्या निवडणुकीत सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक संदीप निगळ्ये हे निवडणुकीला उभे राहिले त्यामुळे ‘मगो’ची मते घटली, असा दावा ‘मगो’ पक्षातर्फे करण्यात येत आहे. निदान यावेळेला तरी प्रियोळची जागा ‘मगो’ने जिंकावी, अशी प्रियोळ मतदारसंघातील मगो कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यासाठी मतदारांच्या गाठीभेटी आणि संपर्क मोहीम ‘मगो’च्या कार्यकर्त्यांनी जोरात चालवली आहे. शिवाय येत्या विधानसभा निवडणुकीत मतांची फाटाफूट होण्यापासून रोखण्याची तयारी ‘मगो’ पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे, मात्र युती हवी असल्यास प्रियोळ आणि मांद्रेवर भाजपचा दावा असेल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यामुळे ‘मगो’ कार्यकर्त्यांच्या मनात धाकधूक आहे. तरीही पाहू, निवडणुकीला दोन वर्षे आहेत, त्यामुळे पुढे काय घडेल, ते आत्ताच सांगणे नलगे... ∙∙∙

न काढलेल्या आदेशाची चर्चा

केप्याचे गट विकास अधिकारी ३० एप्रिल रोजी निवृत्त झाल्यानंतर ते कार्यालय चर्चेत आले आहे. त्या कार्यालयातील मुख्य लिपिकाने काणकोणच्या गट विकास अधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्राला आदेश संबोधून कुणीतरी मस्करी केली. त्याचा मनस्ताप मात्र मुख्य लिपिकाला सहन करावा लागला. गट विकास अधिकारी निवृत्त झाल्यानंतर कार्मिक खात्याच्या आदेशानुसार काणकोणच्या गट विकास अधिकाऱ्याने कामकाज हाताळायचे असते. तशी विनंती काणकोणच्या गट विकास अधिकाऱ्यांना केल्यावर त्यांनी तो कार्मिक खात्याचा आदेश मागितला. मुख्‍य सचिवांनी शासकीय नियमांनुसार तो आदेश त्यांना सादर केला. त्यासोबत लिहिलेले पत्र हे आदेश असे संबोधून मुख्य लिपिकाने गट विकास अधिकाऱ्याला आदेश बजावला असे एका माजी अधिकाऱ्याने पसरवले आणि मुख्य लिपिकास बुधवारी दिवसभर फोन कॉल्सना उत्तरे देण्याची वेळ आली. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT