चिपळूण: मुंबई - गोवा महामार्गावर चिपळूण येथील परशुराम घाटात संरक्षक भिंत कोसळल्याने धोका निर्माण झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून महामार्गावरून एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोकणात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे संरक्षक भिंतीचा भराव खचला.
समोर आलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी परशुराम घाटातील संरक्षक भिंत कोसळल्याने मुंबई- गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. महामार्गावरुन सध्या एकेरी वाहतूक सुरु ठेवण्यात आली आहे. परशुराम घाटात पुन्हा एकदा संरक्षक भिंत कोसळल्याने रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
परशुराम घाटातील संरक्षक भिंत कोसळल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मिडियाद्वारे मत व्यक्त करत सरकारवर टीका केली आहे. पुन्हा विकास वाहून गेला, अशा प्रकारची प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली आहे.
गेल्या एक दशकाहून अधिककाळ मुंबई -गोवा महामार्गाचे काम रखलडले आहे. याच रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या कोकणवासीयांना खड्डे, निकृष्ट मार्ग यासारख्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशात परशुराम घाटातील संरक्षक भिंत कोसळल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
संरक्षक भिंत कोसळली तिथून जवळच पेढे गावाची वसाहत आहे. पण, सुदैवाने मातीचा भराव लोकवस्तीत न गेल्याने मोठा अनर्थ टळला. पण, रस्ता सिमेंटचा असल्याने खचला नाही. सध्या या भागातील वाहतूक एकेरी मार्गाने वळविण्यात आली असून, महामार्ग पूर्ववत होण्याबाबत अद्याप ठोस माहिती समोर आलेली नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.