Goa Politics: लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने उत्तर गोव्यातून मलाच उमेदवारी दिली पाहिजे. या जागेसाठी मी प्रबळ दावेदार आहे. कारण श्रीपाद नाईक उत्तर गोव्यातून चार आमदारही निवडून आणू शकतील असे वाटत नाही. 2012 मध्ये पर्वरीत गोविंद पर्वतकरांना उमेदवारी देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, पण त्यांना ते निवडून आणू शकले नाहीत.
तरीही पक्षाने श्रीपाद नाईक यांना उमेदवारी दिली तर त्यांच्याबरोबर नक्कीच राहीन. मात्र प्रदेशाध्यक्षपदासाठी तरी माझ्या नावाचा विचार झाला पाहिजे. राज्य व केंद्रस्तरावर काम करण्याची धमक माझ्यात आहे, असे रोखठोक मत माजी पर्यटनमंत्री तथा भाजपचे उपाध्यक्ष दिलीप परुळेकर यांनी व्यक्त केले.
गोमन्तक टीव्हीच्या ‘सडेतोड नायक'' कार्यक्रमात संपादक-संचालक राजू नायक यांनी आज सोमवारी परुळेकर यांची मुलाखत घेतली. यावेळी राज्यातील भाजपच्या बदललेल्या राजकारणावर तसेच साळगाव मतदारसंघातील राजकीय घडामोडींवरही त्यांनी प्रकाश टाकला. ते म्हणाले, श्रीपाद नाईक यांचे नाव सोडून दुसऱ्या नावाचा लोकसभेसाठी विचार झाला तर मलाच प्राधान्य मिळायला हवे.
परुळेकर यांनी सांगितले की, केवळ आमदार असतानाच राजकारण करता येते असे नाही तर पक्षातही व संस्थेतही राहूनही ते करता येते. 2017 मध्ये आपण विधानसभेची निवडणूक का हरलो हे सर्व गोमंतकीयांना आणि माझ्या मतदारसंघातील जनतेला माहीत आहे. त्यानंतरही मी समाजकारण करीत राहिलो. 2022 मध्ये माझे पुनरागमन होईल असे पक्षातील वरिष्ठ नेते सांगत होते. परंतु काही कारणाने मला त्यावेळी तिकीट नाकारली. पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून मी गप्प बसलो. त्यावेळी पक्षाने सांगितल्यानुसार हळदोणा, थिवी, मांद्रे मतदारसंघांतील बूथवर मला पाठविले, तेथे गेलो.
समाजाकडे कणखर नेतृत्वाचा अभाव
जिंकून येणाऱ्यास उमेदवारी दिली जाते आणि निष्ठावंतांचा वापर करून घेतला जातोय काय? या प्रश्नाला उत्तर देताना परुळेकर म्हणाले, मी भाजपशी प्रामाणिक आहे. परंतु निवडून येणाऱ्यास उमेदवारी द्यावी हे मान्य केले तरी 2022 मध्ये भाजपच्या सर्व नेत्यांनी फोर्स लावूनही आपल्या उमेदवारास (जयेश साळगावकर यांचे नाव न घेता) निवडून आणण्याचा प्रयत्न केला, पण तो उमेदवार निवडून आला नाही.
जर पक्ष निवडून येणाऱ्या उमेदवारालाच उमेदवारी देतो असे मानले तर २०२२ मध्ये तो उमेदवार निवडून का आला नाही? असा आपला प्रश्न आहे. भाजप सरकारमध्ये भंडारी समाजाचे अस्तित्व नगण्य झाले हे मान्य. भंडारी समाजाकडे कणखर नेतृत्वाचा अभाव आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
600 जणांना दिल्या सरकारी नोकऱ्या
1999 पासून साळगाव मतदारसंघात भाजपला पुढे आणण्यासाठी मी प्रयत्न केले. २००७ मध्ये डॉ. विली डिसोझा यांना पराभूत करून ‘जायंट किलर’ ठरलो. सकारात्मक काम करणाऱ्या आणि पक्षाबरोबर एकनिष्ठ असलेल्या नेत्याबरोबर साळगाव मतदारसंघ राहील असा मला विश्वास वाटतो. आमदार किंवा मंत्री असतानाही मी माझ्या मतदारसंघातील पंचायतींच्या कारभारात कधीच ढवळाढवळ केली नाही आणि यापुढेही करणार नाही, असे परुळेकर यांनी सांगितले. 2012 ते 2017 या पाच वर्षांच्या काळात साळगाव मतदारसंघात 600 जणांना सरकारी नोकऱ्या दिल्या, असेही ते म्हणाले.
तेव्हा फडणवीस यांनी दिले होते आश्वासन
2022 मध्ये तुम्ही बंडखोरी करू नये म्हणून भाजपचे गोवा राज्य निवडणूक प्रमुख देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला भाजप प्रदेशाध्यक्ष करण्याचे आश्वासन दिले होते का? असा प्रश्न विचारला असता परुळेकर म्हणाले की, 2002 मध्येच फडणवीस यांनी साळगाव मतदारसंघ पिंजून काढला होता. 2007 मध्ये भाजपला चांगले वातावरण असल्याचे सांगितले होते. तेव्हापासून मला ते ओळखतात. 2022 मध्ये मला उमेदवारी नाकारली तेव्हा थेट त्यांना असे का म्हणून विचारले होते. तेव्हा ‘‘तुम्ही बहुजन समाजातील आहात. तुम्ही बंडखोरी करू नका. योग्य वेळी योग्य पाऊल उचलले जाईल’’ असे फडणवीस म्हणाले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.