Khari Kujbuj  Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: भाजपचा तो ‘बाब्‍या’?

Khari Kujbuj Political Satire: गोवा शिपयार्ड या संरक्षण मंत्रालयाच्या अख्यत्यारीतील जहाज बांधणी उद्योगांत स्थानिकांना रोजगार देण्याचा मुद्दा वारंवार चर्चेत येतो. स्व. मनोहर पर्रीकर संरक्षणमंत्री असताना शिपयार्डला मोठे कंत्राट दिले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

रोजगारासाठीची एकी

गोवा शिपयार्ड या संरक्षण मंत्रालयाच्या अख्यत्यारीतील जहाज बांधणी उद्योगांत स्थानिकांना रोजगार देण्याचा मुद्दा वारंवार चर्चेत येतो. स्व. मनोहर पर्रीकर संरक्षणमंत्री असताना शिपयार्डला मोठे कंत्राट दिले होते. तेव्हा शिपयार्डचा विस्तार झाला. याचा लाभ स्थानिकांना किती हा संशोधनाचा विषय आहे. आता या मोठ्या कंपनीत स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी मुरगावातील तिन्ही आमदार एकवटलेत. मंत्री गुदिन्हो, आमदार आमोणकर व साळकर यांनी तिथे जाऊन स्थानिकांनाच रोजगार द्या, अशी मागणी केलीय. यातून काय निष्पन्न होते, त्याकडे अनेकांची नजर आहे. स्थानिकांसाठी आमदारांनी एकत्र येऊन एक आदर्श निर्माण केल्याची चर्चा मात्र यानिमित्ताने रंगलीय. परंतु प्रश्‍न आहे तो या आस्थापनात आमदारांना कुशाग्र युवक हवेत, की स्वतःचे पाठिराखे?∙∙∙

भाजपचा तो ‘बाब्‍या’?

भाजपच्‍या ओबीसी विभागाचा माजी पदाधिकारी पराग रायकर याच्‍या विरोधात सध्‍या काणकोण पोलिसांत तक्रार नोंदवली गेली आहे. काणकाेणच्‍या एका युवतीला सार्वजनिक बांधकाम खात्‍यात नाेकरी मिळवून देण्‍याचे आमिष पराग रायकर आणि अन्‍य दोघांनी १५ लाख रुपये घेतल्‍याची ही तक्रार आहे. हल्‍लीच मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोव्‍यात सरकारी नोकऱ्या विकल्‍या जात नाहीत, असे स्‍पष्‍ट केले होते. सरकारी नोकरीच्‍या नावाने पैसे घेणाऱ्या पूजा नाईक हिला आपणच पकडून दिले, असे मुख्‍यमंत्र्यांनी स्‍पष्‍ट केले होते. त्‍यामुळे आता मुख्‍यमंत्री पराग रायकर यांच्‍या बाबतीत काय निर्णय घेणार, याकडे लोकांचे लक्ष लागून राहिलेले आहे. अन्‍यथा दुसऱ्याचे ते ‘कार्टे’ आणि भाजपचा जो कोण आहे तो ‘बाब्‍या’ असा प्रकार होऊ नये, म्‍हणजे मिळवली.∙∙∙

हॉटेलांवरील कारवाई

हॉटेल्स व रेस्टॉरंटविरोधात सध्या धडक मोहीम सुरू आहे. गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे परवाने नसलेल्यांना नोटिसा बजावल्या जात आहेत. या कारवाईविषयी पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांना विचारल्यावर यामुळे तुम्ही आनंदी व्हायला हवे, असे त्यांनी म्हटले आहे. हॉटेलांवरील कारवाईमुळे पत्रकारांनी आनंदी व्हावे, असे त्यांना का वाटते हे त्यांचे त्यांनाच ठाऊक. काशिनाथ शेटये यांनी तक्रार करेपर्यंत मंडळ काय करत होते, याची विचारणा मंत्री म्हणून ते मंडळाला करणार आहेत का, याचे उत्तर कोणाकडे नाही. कारवाई झाली की ती माझ्यामुळे असे दाखवणारी प्रवृत्ती बळावली आहे. कारवाई न झाल्याची जबाबदारीही स्वीकारली गेली पाहिजे. कुटबण मच्छीमारी धक्का स्वच्छतेबाबत सिक्वेरा कठोर झाले होते, तशीच भूमिका हॉटेल रेस्टॉरंटबाबत ते दाखवतील काय, अशी विचारणा होऊ लागली आहे. ∙∙

थिवीतील गाऱ्हाणे

थिवी मतदारसंघातील प्रस्तावित विद्यापीठ प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. ग्रामसभेत या प्रकल्पाला लाल कंदील दाखवल्यानंतर आता देवालाही साकडे घालण्यात आले आहे. मत्स्योद्योगमंत्री नीळकंठ हळर्णकर हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांनी या प्रकल्पाचे समर्थन केलेले आहे. माजी आमदार किरण कांदोळकर हे प्रकल्पाच्या विरोधात आहेत. त्यांनी तर विधानसभा निवडणूक लढवण्याचीही घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर लोकांसोबत येण्याची बुद्धी देवानेच मंत्र्याला द्यावी, असे गाऱ्हाणे घालण्यात आले आहे. लोक मंत्री हळर्णकर यांना भेटून हे सांगू शकत नाहीत का, अशी विचारणा या निमित्ताने केली जात आहे. मंत्र्याला देवामार्फत निरोप दिल्याची खुमासदार चर्चा मात्र होते आहे. ∙∙∙

जवळ कोण? पक्ष की परिषद?

अखिल भारतीय कोंकणी परिषदेच्‍या ३३व्‍या अधिवेशनाचे स्‍वागताध्‍यक्ष प्रशांत नाईक हे सध्‍या एका वेगळ्याच धर्म संकटात सापडले आहेत, असे वाटते. याचे कारण म्‍हणजे, राेमी कोकणीवाल्‍यांनी सुरू केलेले आंदोलन. काही दिवसांपूर्वी हे आंदोलन चालविणाऱ्या ग्‍लोबल कोकणी फोरमचे पदाधिकारी गाेवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांना निवेदन देण्‍यास गेले असता, सरदेसाई यांनी आपला पाठिंबा रोमीला व्‍यक्‍त केला होता. याच गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस असलेले प्रशांत नाईक हे कोकणी परिषदेच्‍या या अधिवेशनाचे स्‍वागताध्‍यक्ष असल्‍याने आता त्‍यांची भूमिका काय? प्रशांत नाईक यांना पक्ष जवळचा की परिषद?, याचे उत्तर ते देतील काय? ∙∙∙

नाराज सुदिनराव...

मगोचे केतन भाटीकर यांनी भाजपाचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतल्यापासून मगो पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर जरा नाराज आहेत. ढवळी येथील दिवाळी बाजारच्या उद्‍घाटनावेळी पत्रकारांशी बोलताना सुदिनरावांनी आपली नाराजी उघड केली. केतन भाटीकर यांनी मुख्यमंत्र्यांची नोकऱ्यांसाठी भेट घेणे गैर असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. नोकऱ्या मंत्री, आमदार वाटत नाहीत, असेही ते बोलून गेले. केतन भाटीकर यांच्या मुख्यमंत्र्यांशी भेटीमुळे फोंड्यात चर्चेला उधाण आले आहे. ते म्हणजे भाटीकर यांना भाजपची विधानसभेसाठी तिकीट दिली जाते की काय...आता खरे खोटे देव जाणे, पण भाटीकर यांचे ‘गॉडफादर’ मात्र नाराज आहेत, हे मात्र पक्के...! ∙∙∙

विश्वनाथ दळवी ‘अलर्ट’?

‘भाटीकर भाजपचे उमेदवार ?’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या ‘खरी कुजबूज’ने फोंड्यात बरीच खळबळ उडवली. भाजपच्या उमेदवारी करता फोंड्यात सध्या अनेक इच्छुक असून त्यामुळेच या ‘खरी कुजबूज’ बाबत शहरात चर्चेला उधाण आले. फोंड्याचे नगरसेवक तथा गटाध्यक्ष विश्वनाथ दळवी हेही सध्या भाजपच्या उमेदवारीचे एक प्रमुख दावेदार असून ते त्या दिशेने कार्यही करत आहेत. त्यामुळेच या ‘खरी कुजबूज’वरून त्यांच्या गोटात विविध तरंग उठल्याचे दिसून आले. भाटीकरांच्या उमेदवारीबाबत शहरात सुरू असलेली चर्चा प्रत्यक्षात ‘उतरो न उतरो’ आपण ‘अलर्ट’ होणे गरजेचे आहे, असा विचार दळवींनी केला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. आणि याच करता त्यांनी प्लॅन ‘ए’ बरोबर प्लॅन ‘बी’ आखण्याचे ठरवल्याची चर्चा सध्या सुरू आहे. दूध गरम लागले की, ताकही कसे आपण फुंकून पितो, तसा हा प्रकार, या गेम प्लॅन बाबत असू शकतो. या प्लॅनबाबत अजून निश्चित समजले नसले तरी ‘गोमन्तक’मध्ये प्रसिद्ध होणारा राजकीय मजकूर ‘सुपरहिट’ तसेच जागृती करणारा ठरत आहे, एवढं मात्र निश्‍चित. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT