शार्क टँक इंडियाच्या चौथ्या सीझनचा (Shark Tank India-4) 10 वा एपिसोड हा एक खास 'कॅम्पस एपिसोड' होता, ज्यामध्ये तरुणांच्या व्यावसायिक कल्पना आणि आवड स्टेजवर दाखवण्यात आली. या भागात, 19 वर्षीय द्युमना मदन आणि शिवोम सूद यांनी त्यांच्या प्रोजेक्ट क्ले कंपनीद्वारे शार्क इंडियाचे लक्ष वेधून घेतले. दोघांनीही मोठ्या आत्मविश्वासाने आणि अनोख्या व्यवसाय कल्पनेने उपस्थितीतांना प्रभावित केले. शार्क इंडियात असे अनेक स्पर्धक जिद्दीच्या, संयमाच्या आणि अनोख्या कल्पनेवर त्यांनी बजावलेल्या कामगिरीच्या कहाण्या सर्वांना प्रेरणा देतात. चला तर मग द्युमनाच्या प्रवासाची आणि तिने सुरु केलेल्या स्टार्टअपच्या कहाणीविषयी जाणून घेऊया...
स्टार्टअप (Startup) पीडियाने द्युम्नाची खास बातचित केली. या बातचितीमध्ये द्युमनाने आपल्या दैनंदिन कामातील अनुभव तसेच, तिने या स्टार्टअपची सुरुवात कशी केली याविषयी सांगितले आहे. द्युमना म्हणाली की, 'मी आणि माझे सह-संस्थापक दिवसातून किमान 16 तास काम करतो. माझे सह-संस्थापक आपला संपूर्ण वेळ स्टार्टअपला देतात, ज्यामुळे मला कॉलेजसाठी अतिरिक्त दोन तास वेळ काढता येतो.'
वयाच्या 15व्या वर्षी द्युमनाने भारतातील समर स्कूलसाठी मोफत पर्यायी सेवा देण्याच्या उद्देशाने ग्लोबल स्टार्टअप म्हणून 'प्रोजेक्ट क्ले'ची 2020 मध्ये स्थापना केली. पुढच्या चार वर्षात खूप काही घडले. द्युमना मसुरीतील वुडस्टॉक बोर्डिंग स्कूलमध्ये गेली. तिथेच तिची भेट शिवोम सूदशी झाली जो नंतर प्रोजेक्ट क्लेचा सह-संस्थापक बनला. अंकुर वारीकू यांच्याकडून या दोघांना 2.25 लाख रुपयांचे अनुदान मिळाले. या अनुदानाच्या माध्यमातूनच त्यांनी 'प्रोजेक्ट क्ले'ची सुरुवात केली.
मूळची गोव्याचे (Goa) असलेली द्युमना मदन अशा कुटुंबात वाढली, जिथून तिला उद्योजकता, नावीन्य आणि नव्याने काही तरी सुरु करण्याचे बाळकडू मिळाले. तिची आई फॅशन डिझायनर असून तिच्या वडिलांचा कारखाना आहे. मी स्वतःचे काहीतरी सुरु करण्याच्या माझ्या इच्छेबद्दल माझ्या पालकांना कधीही शंका नव्हती. ते फक्त प्रोत्साहन देत आहेत, असे द्युमनाने स्टार्टअप पीडियाशी बोलताना सांगितले.
द्युमनाने पुढे बोलताना सांगितले की, "आम्ही 2020 मध्ये प्रोजेक्ट क्ले ची सुरुवात केली. विद्यार्थ्यांना एकत्र करायला सुरुवात केली, तेव्हा माझ्या वडिलांना माहित होते की मी काहीतरी करत आहे.'' प्रोजेक्ट क्ले आकार घेण्यापूर्वी द्युमना आणि तिच्या भावाने घरगुती बेकरी व्यवसायातून 8 लाखांची कमाई केली होती.
द्युमनाने मोठ्या व्हिजनसह प्रोजेक्ट क्लेची स्थापना करुन उंच गगनभरारी घेण्याचे स्वप्न पाहिले. द्युमनाने जगभरातील 1,000+ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ईमेल पाठवण्यास सुरुवात केली आणि त्यांना भारतीय विद्यार्थ्यांना मोफत शिकवण्याची विनंती केली, परंतु 20 जणांनीच तिची विनंती स्वीकारली. 2020 मध्ये प्रोजेक्ट क्लेच्या मोफत समर स्कूलमध्ये 800 विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले. पुढच्या वर्षी, त्याच कार्यक्रमात जगभरातील 30+ देशांमधून 4,000 विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. प्रोजेक्ट क्लेच्या माध्यमातून करिअर कॉन्सिलिंग केले जाते. विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय विद्यापीठे, पात्रता आणि शिष्यवृत्तीच्या बाबतीत त्यांचे पर्याय समजून देण्यास प्रोजेक्ट क्ले मदत करते.
प्रोजेक्ट क्ले ही परदेशात अभ्यास करणारी एक स्टार्टअप आहे. हे स्टार्टअप शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नातील विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या सध्याच्या विद्यार्थ्यांशी जोडते. हे विद्यार्थी इच्छुकांसाठी मार्गदर्शक म्हणून काम करतात.
परदेशात अभ्यास करण्यासाठी बनवलेल्या या स्टार्टअपने शार्क टँक इंडिया चौथ्या हंंगामात भाग घेतला आणि सर्वांचे मन जिंकले. अनुपम मित्तल, विनीता सिंग, पीयूष बन्सल आणि नमिता थापर यांनी द्युम्ना आणि शिवोमचे स्वप्न आणि त्यांच्या दृढनिश्चयाची प्रशंसा केली. त्यांनी 10 टक्के इक्विटीच्या बदल्यात 15 लाख रुपये मागितले आणि नमिता थापरकडून तीच डील त्यांना मिळाली.
2024 मध्ये, प्रोजेक्ट क्लेचे जूनमध्ये 22,900 रुपये, जुलैमध्ये 41,800 रुपये, ऑगस्टमध्ये 90,600 रुपये आणि सप्टेंबरमध्ये 1,05,000 रुपये उत्पन्न होते. आर्थिक वर्ष 25 मध्ये या स्टार्टअपचा महसूल 37 लाख रुपयांवर पोहोचण्याचा अंदाज आहे, तर आर्थिक वर्ष 26 मध्ये 10 पट वाढून 3.7 कोटी रुपयांचा आकडा गाठण्याची योजना आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.