मुद्दा धार्मिक भावनेशी संबधित असो किंवा पर्यटन किंवा स्थानिकांच्या नोकरीचा, गोव्यात नेहमीच हे विषय चर्चेचे ठरतात. गेल्या सहा दिवसांत गोव्यात यासंबधित घडलेल्या तीन वेगवेगळ्या घटनांमुळे वाद झाला, ज्याचे पडसाद राज्यभर उमटले.
गेल्या रविवारी श्रेया धारगळकर या महिलेने फेसबुकवर प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओमुळे फातर्पात वादंग झाला. त्यानंतर कोकण रेल्वेचा पर्यटन प्लॅन ते फार्मा कंपन्यांच्या नोकरभरतीचा मुद्या यामुळे गेले पाच दिवस गाजले.
श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण प्रकरण
फातर्पा येथील गोमंतकीयांचे आराध्य दैवत श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीणबाबत श्रेया धारगळकरने एक व्हिडिओ प्रसारित केला. या व्हिडिओच्या माध्यमातून संस्थान व महाजनांची बदनामी केल्याचा आरोप स्थानिक करत मोठ्या प्रमाणावर जमावाने कुंकळ्ळी पोलिस स्थानकावर मोर्चा काढला. संतप्त जमावाने श्रेयाच्या अटकेची मागणी केली. अनेक नाट्यमय घडमोडीनंतर तणावपूर्ण वातावरणात श्रेया धारगळकर आणि नमिता फातर्पेकर यांना अटक करण्यात आली.
न्यायालयाने दोघींना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली, पण दुसऱ्या दिवशी त्यांना सशर्त जामीन देखील मंजूर झाला.
श्रेयाला पुन्हा अटक
केपे न्यायलयाने जामीन मंजूर केल्यानंतर ताबडतोब डिचोली पोलिसांनी अटक केली. शिरगावचे श्री लईराई देवस्थान व धोंड भक्तांबद्दल तिने अपमानास्पद विधान केले होते. दरम्यान, श्रेयाला चार जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
कोकण रेल्वेचा पर्यटन प्लॅनही वादात
कोकण रेल्वेच्या योजनेनुसार गोव्यात करमळी रेल्वेस्थानकावर ‘लेक व्ह्यू रेस्टॉरंट्स’ उभारले जाणार आहे. तर, मडगाव स्थानकासह इतर महत्त्वाच्या स्थानकांवर ‘रेंट-अ-बाईक’ सुविधा सुरू केली जाणार आहे. मडगावसह राज्यातील तीन इतर स्थानकांवर ही सेवा सुरु केली जाणार असल्याची माहिती कोकण रेल्वेचे नवीन मुख्य सरव्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी दिली.
‘रेंट-अ-बाईक’ सेवा चालवण्यासाठी ऑपरेटर शोधण्यासाठी निविदा जारी केलेल्या आहेत.
कोकण रेल्वेच्या या प्रस्तावित योजनेला गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई आणि तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी कडाडून विरोध केला.
निविदा रद्द करुन या प्लॅन माघारी न घेतल्याचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा सरदेसाई यांनी दिला.
फार्मा कंपनीची नोकरभरती पुणे आणि मुंबईत
गोव्यातील औषध निर्मिती क्षेत्रातील कंपनी इंडोको रिमेडीजने मुंबईतील बोईसर येथे मुलखती आयोजित केल्या. नोकरभरतीत गोमन्तकीयांना डावलले जात असल्याचा आरोप विजय सरदेसाई यांच्या पाठोपाठ मनोज परब यांनी केला. मुख्यमंत्री सावंत यांनी तात्काळ हस्तक्षेप करावा अशी मागणी त्यांनी केली.
अखेर, कंपनीने वादात सापडलेली नोकरभरतीची जाहिरात मागे घेत मुलाखती रद्द केल्या.
इंडोको पाठोपाठ इनक्युब इथिकल या कंपनीने कोरेगाव पार्क, पुणे येथे मुलाखती आयोजिक केल्याची जाहिरात समोर आली. यावरुन टीका झाल्यानंतर या मुलाखती देखील रद्द करण्यात आल्या.
विजय सरदेसाई यांनी याप्रकणी मुख्य सचिवांना पत्र लिहून गोमन्तकीयांना खासगी नोकरीत 80 टक्के आरक्षणाची मागणी केली. तसेच, यासाठी ठोस धोरण तयार करण्याची गरज देखील व्यक्त केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.