उत्तर प्रदेशसह (Uttar Pradesh) गोव्यात (Goa) शिवसेनेचा (Shiv Sena) एकही उमेदवार आघाडीवर नाहीत. अनेक उमेदवारांचे यामुळे डिपॉझिटही वाचू शकणार नाही, अशी स्थिती आहे. त्यावरूनच आता भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पुन्हा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना डिवचलं आहे. गोवा आणि यूपीत 'म्याव...म्याव'चा आवाज ऐकू आला नाही, असं राणे यांनी ट्विट करत सेनेला टोला लगावला आहे. ठाकरे सरकारने गोव्यासह उत्तर प्रदेशातही प्रचारसभा घेतल्या होत्या. (Saying that Shiv Sena has no power in Goa and UP Nitesh Rane has targeted Shiv Sena)
उत्तर प्रदेशामध्ये (Uttar Pradesh) पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ यांचीच सत्ता येणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. तर गोव्यात भाजपनं आघाडी घेतली असली तरी आणखी बहुमत मिळालेलं नाही. दोन्ही राज्यांमध्ये शिवसेनेने उमेदवार उतरवले होते, पण दोन्ही ठिकाणी उमेदवार पिछाडीवरती पडले आहेत. नितेश राणे यांनी याचअनुषंगाने ट्विट करत पुन्हा म्याव...म्याव म्हणत डिवचलेलं आहे. त्यांचा रोख थेट आदित्य ठाकरे यांच्याकडे असल्याचे दिसते. पावसाळी अधिवेशनाच्यावेळी राणे यांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर ठाकरे यांना उद्देशून म्याव...म्याव म्हटल्यानं मोठा वाद निर्माण झाला होता.
'गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये 'म्याव...म्यान' आवाज ऐकू आला नाही भाई, खूपच वाईट. खूप दु:ख झालं,' असं ट्विट राणेंनी केल आहे. गोवा, उत्तर प्रदेशातील निकालचे पडसाद आता महाराष्ट्राच्या राजकारणावरतीही उमटणार असल्याचे राणेंच्या ट्विटवरून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी उत्तर प्रदेशातील ज्या मतदारसंघात सभा गाजवल्याचा दावा शिवसेना नेत्यांनी केला आहे, त्या मतदारसंघासह इतर ठिकाणीही शिवसेनेच्या उमेदवारांना डिपॉझिटही वाचवता येणार नाही, अशी स्थिती उत्पन्न झाली आहे.
शिवसेनेची झालेली दयनीय स्थिती
शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे यावेळी उत्तर प्रदेशात परिवर्तन होणार असल्याचा दावा करत होते. शिवसेनेचे जवळपास 60 उमेदवार मैदानात उतरवण्यात आले होते, पण अनेक उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने मैदानात 37 उमेदवार उरले होते. शिवसेना यंदा खातं उघडणार असंही नेत्यांकडून सांगितले गेले होते. त्यासाठी आदित्य ठाकरेंना प्रचारासाठी देखील उतरवण्यात आलं होत. त्यावेळी महाराष्ट्रातील अनेक नेते त्यांच्यासोबत होते.
कोराँव मतदारसंघातील उमेदवार आरती कोल यांच्या प्रचारासाठी लडीयारी यथे आणि डुमरियागंजचे उमेदवार राजू श्रीवास्तव यांच्यासाठी त्यांनी सभा देखील घेतली होती. सभेत बोलताना त्यांनी त्यावेळी बदलाची लाट असल्याचा दावाही केला होता. योगी आदित्यनाथ निकालानंतर माजी मुख्यमंत्री होतील, असंही ते यावेळी म्हणाले. पण निकालामध्ये या दोन्ही उमेदवारांचे डिपॉझिटही वाचणार नाही, असंच चित्र दिसत आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगानुसार, डुमरियागंज मतदारसंघात सहा फेरी अखेर शिवसेनेला 838 मतं मिळाली. तर भाजपचा उमेदवार 13 हजार मतांसह आघाडीवरती आहे. आरती कोल यांना पाचव्या फेरीअखेर 339 मतं मिळाली. भाजपच्या उमेदवाराने दहा हजारांहून अधिक मतं मिळवत आघाडी घेतली आहे. अनुपशहर, लखनौ मध्य, हाथरस, कुंदरकी यांसह इतर मतदारसंघातही शिवसेनेच्या उमेदवारांना दुपारी बारा वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालानुसार 100 मतंही मिळालेली नाहीत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.