सांगेतील जनता सध्या बंधाऱ्याला घाबरू लागली आहे. बंधारा बांधल्यास देवस्थान व घरे बुडतील अशी भीती त्यांना वाटू लागली आहे. बंधारा बांधून पर्यावरणाचा ऱ्हास होईल, असा टाहो ते फोडू लागले आहेत. जनतेला त्याचा फायदा काय हे सरकार का सांगत नाही अशी विचारणा ते करू लागले आहेत. राखणदाराचे देवस्थान बुडेलच पण संगमपूरही बुडेल असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्याना सध्या बंधाऱ्याचे भूत सतावू लागले आहे. मध्यंतरी केलेल्या विरोधानंतर सरकार बंधारा बांधणार नाही असा त्यांचा समज होता मात्र खोटा ठरू लागल्याचे दिसल्यावर आम्हाला बंधारा नको असा सूर सांगेत घुमू लागला आहे. ∙∙∙
राजकारणात केवळ राजकारण असायला हवे आणि शिक्षणात राजकारण आणता कामा नये. मात्र, आपले भाजपवाले आता शिक्षणात ही राजकारण घुसवायला लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी गोवा शालान्त मंडळाच्या सदस्य निवडीसाठी काही जागांवर निवडणूक घेण्यात आली. उच्च माध्यमिक शिक्षकाकडून उत्तर गोवा व दक्षिण गोवा असे दोन सदस्य गोवा बोर्डावर निवडले जातात. यंदा या दोन पदांसाठी निवडणूक घेण्यात आली.निवडून आलेल्या दोन्ही सदस्यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर फोटो सेशन केले समजू शकते. मात्र, गोवा बोर्डावर उच्च माध्यमिक शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून निवडलेल्या नाव निर्वाचित शालान्त मंडळ सदस्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्याबरोबर फोटो सेशन करून समाज माध्यमावर फोटो व्हायरल केलेले शिक्षकांना आवडलेले नाही. शिक्षकांचा प्रतिनिधी कोणत्याही पक्षाचा असू शकत नाही. शिवाय मुख्यमंत्रीच म्हणतात की, शिक्षकांनी ‘शिक्षा दान’ करावे सरकारी वेतन घेऊन राजकारण करू नये. डॉक्टर साहेब पाद्री शेरमांव व्हनयेक लागना? ∙∙∙
चिंबलमध्ये सध्या एक नवं गणित सुरू आहे सरकार शब्दावर ठाम, जनता शब्दावर आग्रही, आणि प्रशासन मधोमध अडकलेलं! सरकार म्हणतं, युनिटी मॉल होणारच. जनता म्हणते, इथे नाहीच आणि प्रशासन म्हणतं, स्तंभ हलवू ...पण प्रश्न नको! आंदोलन पाहता असं वाटतं की, मॉल येण्याआधीच ‘युनिटी’ हा शब्दातच फुट पडणार की काय! आता आंदोलनाची दिशा ठरायच्या आधीच चर्चांची रेलचेल सुरू आहे. आंदोलक आक्रमक होतील का शांत होतील? सरकार समजावणार की सामोरे जाणार? सध्या जनता विचारात, नेते गणितात आणि अधिकारी फाईलमध्ये! आम्ही जनतेसोबत आहोत असा सूर वाढतोय, पण तो माईकवरच की, मैदानातही तो आवाज ऐकू येणार, हे अजून गुलदस्त्यातच आहे. उत्तर कधी मिळेल? मॉल येण्याआधी की आंदोलन संपल्यानंतर? ∙∙∙
‘हरबऱ्याच्या झाडावर चढविणे’ हा वाक्प्रचार आपण ऐकला असणार. मडगाव पालिकेच्या एका अती उत्साही कर्मचाऱ्याने आपले बॉस असलेल्या नगराध्यक्षांना एका कार्यक्रमात खरेच हरबऱ्याच्या झाडावर चढविण्याची किमया साध्य केली. मडगाव पालिकेला गोव्याची सिने कलाकार वर्षा उसगावकर यांनी भेट दिली होती. आता ही भेट कशासाठी होती यात आपल्याला जायचे नाही. मात्र, या भेटीच्या वेळी वर्षा उसगावकर यांच्याशी संवाद साधण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पालिका कर्मचाऱ्याने केले. हातात माईक व बाजूला नगराध्यक्ष आणि पुढे वर्षा उसगावकर हे दृश्य पाहून तो कर्मचारी भाळला. वर्षा उसगावकर यांची स्तुती करण्याचे सोडून तो कर्मचारी नगराध्यक्षांचे गुणगान करायला लागला. त्याचे ते गुणगान कीर्तन, ऐकून मागे बसलेले पालिका कर्मचारी त्या ‘स्तुतीकुमार’ची चर्चा करायला लागले∙∙∙
पोलिसांना साप्ताहिक सुट्टी नसते. त्यामुळे पाेलिस खात्यात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार अतिरिक्त मिळतो. मात्र, या तेराव्या पगाराचे पैसे पोलिसांच्या हाती लागेपर्यंत एवढ्या अडचणी येत असतात की पोलिसांवर एकप्रकारे दुष्काळात तेरावा महिना, असे म्हणण्याची पाळी येते. मागच्या वर्षी पोलिसांना हा तेरावा पगार मिळवण्यासाठी चौदाव्या महिन्याची वाट पहावी लागली होती. यावेळीही तीच स्थिती आहे. वास्तविक २० जानेवारीपर्यंत हा तेरावा पगार पोलिसांच्या खात्यात जमा होतो. पण २० तारीख उलटून गेली तरीही यंदा या तेराव्या पगाराची पोलिस वाट पहातच आहेत. ∙∙∙
दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ हे सुसज्ज करणार, असे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे येता जाता सांगत असतात. मात्र, या इस्पितळाच्या समस्या अशा आहेत की, इस्पितळाच्या सटीलाच त्या पूजल्या आहेत की काय, असे कुणालाही वाटावे. रुग्णांना झोपायला पुरेशा खाटा नसल्यामुळे रुग्णांनी जमिनीवर झोपणे हे येथील नेहमीचेच दृष्य. त्यात आता पाणी गरम होण्याची सोयही मागचे चार-पाच दिवस बंद पडले आहे. त्यामुळे या इस्पितळात ज्या महिला आहेत, त्यांना मागचे पाच दिवस आंघोळीविनाच रहावे लागले आहे. या इस्पितळाच्या आवारात सुलभ शौचालयाचीही सोय नसल्याने इस्पितळात रुग्णांबरोबर रहाणाऱ्या महिला सध्या कशाबशा या परिस्थितीला सामोरे जात आहेत. हे इस्पितळ सुसज्ज कधी होणार ते होवो. मात्र या इस्पितळात येणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्याबरोबर राहणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांच्या प्राथमिक गरजा पूर्ण होण्या इतकीतरी सोय करा ना! ∙∙∙
अवघ्या काही वर्षांपूर्वीच ज्यांच्या खांद्यावर नवे स्टार झळकले होते, त्यांच्याच खांद्यावर पुन्हा एकदा चमकदार भर पडली आहे. पदोन्नतीचा हा ‘रिपीट शो’ पाहून कनिष्ठ मात्र खुर्चीवर बसून गणित घालत आहेत. आपली फाईल नेमकी कुठल्या कपाटात अडकली, की कुठल्या चहाच्या कपाखाली दडली? वरिष्ठांचे हिरमुसलेले चेहरे, दबक्या आवाजातल्या चर्चेचा सूर रात्री पोलिस स्थानकात गुंजत होता. ‘नाराजी मतांतूनच व्यक्त होणार’ असा इशाराही आता फिरू लागला आहे. सरकारपुढे पेच वाढतोय, कनिष्ठांना वर घ्यायचं की, नाराजीचा धूर सहन करायचा? आणि या सगळ्यात एकच प्रश्न सर्वत्र घुमतोय: ही पदोन्नती योगायोग की जवळिकीचा चमत्कार? राजकीय हातमिळवणी की फक्त ‘योग्य वेळेचा’ लाभ यावरून प्रत्येक पोलिस स्थानकात नव्या कथानकांची पेरणी सुरू आहे. शेवटी, ‘स्टार’ कुणाच्या खांद्यावर चमकतोय यापेक्षा तो का चमकतोय, हाच खरा चर्चेचा मसाला! ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.