साळ येथील प्रसिद्ध गडे उत्सवास आज सोमवार, २५ पासून सुरुवात होणार असून २७ मार्च रोजी सांगता होणार आहे. या उत्सवासाठी हजारो भाविक साळला दाखल होणार असल्याने ग्रामस्थांनी जय्यत तयारी चालवली आहे.
दरम्यान काल मधुकर दत्ताराम नाईक (मधलावाडा - साळ) यांच्या ‘पाट्यात’ या काजूबागायतीत अंदाजे ५५ फूट लांब आंब्याच्या झाडाची विधीवत पूजा करून ते तोडण्यात आले.
पुरोहित यशवंत गाडगीळ व शंकर गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली गडे सदस्य मधुकर बाबुली परब त्यानंतर प्रवीण मधुकर नाईक ( बागायतदार) व हनुमंत सखाराम घाडी (होळी तोडणारा ) यांच्या हस्ते सदर झाडाची विधीवत पूजा करण्यात आली.
त्यानंतर सार्वजनिक गाऱ्हाणे घालण्यात आले. यावेळी अनेक गडे सदस्य, राऊत व परब महाजन, पंचक्रोशीतील युवक हजर होते त्यात श्री महादेव भूमिका देवस्थानचे अध्यक्ष कालिदास राऊत व सचिव विशाल परब हे उपस्थित राहून त्यांनी योग्य ते मार्गदर्शन व सहकार्य दिले, यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यक्रम होत आहेत.यंदा ही होळी आपल्या गावातीलच असावी असे श्री भूमिका देवीने व बारा अंधाराच्या अवसराने कौल दिला होता. त्यामुळे यंदा ही होळी साळ मधूनच आणली.
हनुमंत घाडी यांच्या हस्ते सुरुवातीला झाडाला घाव घालण्यात आला. त्यानंतर राजन घारे, भैया शेटकर, संतोष परब , दीपक ठाकूर, मेघनाथ राऊत व इतराने झाडाच्या बुंध्याची साफसफाई करण्यात आली व त्यानंतर ते कुऱ्हाडीने व मशीन कटरने तोडण्यात आले व ते उपस्थित युवकांच्या सहकार्याने व दोरखंडाच्या मदतीने जमिनीवर आणण्यात आले तर संध्याकाळी ५ वाजता होळी स्थानी (कार्यक्रम स्थळी )सदर होळी ढोल ताशाच्या गजरात रंग उधळीत आणण्यात आली.
मध्यरात्री ते मंदिरासमोर होळी म्हणून उभारण्यात आली. होळी उभारल्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्रीपासून गडे पडण्यास सुरुवात होते. साळातील गडे उत्सव हा गोवा, महाराष्ट्र व कर्नाटकात प्रसिद्ध आहे.
अदृश्य रुपातील देवदेवता व दृश्य रूपातील गडे यांचा हा रात्रीचा चालणारा खेळ पाहण्यास हजारो भाविक येतात. सुरुवातीस ६४ गडे होते, आता त्यांची संख्या अंदाजे ४५ असून श्री महादेवाने या खेळाला सुरुवात करून श्री भूमिका देवीच्या हाती सर्व सूत्रे दिली. तर श्री माडयेश्वर देव त्याच्या अधिकाराखाली हा खेळ चालतो.
भाविकांना आवाहनवजा सूचना
गडे उत्सवासाठी येणाऱ्या भाविकांनी धुमासेमार्गे रात्री दहाच्या नंतर प्रवेश करू नये. तर कासारपाल मार्गे येणाऱ्या भाविकांनी रात्री ११ वाजल्यानंतर कासापाल मार्गे येऊ नये.
येथे उपस्थित असणाऱ्या पोलिस व वाहतूक पोलिस यंत्रणा, प्रशासनाला सर्वांनी योग्य ते सहकार्य करावे, असे साळ देवस्थान व गड्यांनी सूचनावजा आवाहन केले आहे.
गडे देण्याचा थरार
मध्यरात्री रोमट आल्यानंतर गड्यांचे गाऱ्हाणे घालतात. गडे पडू लागल्यानंतर होळीला पाच फेऱ्या घातल्यानंतर करूल्या आणण्यासाठी मंदिराच्या पाठीमागील डोंगरापलीकडे श्रीकरवेश्वर ठिकाणी जातात वाटेतच देवदेवता मशाल पेटवून त्यांचे स्वागत करतो. त्यानंतर या मशाली मागून गडे चालू लागतात.
परत येताना देवता या काही गड्यांना लपवतात व त्याच रात्री लपवलेल्या गड्यांना परत गड्यांकडे देतो, दृश्य पाहण्यासाठी हजारो भाविक या गड्या मागून धावतात पण भाविकांचे संरक्षण करण्यासाठी धोक्याच्या ठिकाणी गडे उभे असतात. गडे देण्याचा अनोखे दृश्य बघण्यासाठी भाविक पळतात,असे तिन्ही रात्री गडे देण्याचा कार्यक्रम चालतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.