वास्को : साडेतीन वर्षापूर्वी लोकार्पण केलेला सडा येथील मार्केट प्रकल्पासमोरील वीज, पाणी पुरवठा आदीचे अडथळे दूर झाल्याने तसेच येथील दुकाने भाडेपट्टीवर देण्यासाठी लिलाव करण्यात आल्याने मार्केट प्रकल्प येत्या काही दिवसांत सुरू होणार असल्याचे समजते.
सदर प्रकल्प उभारण्यासाठी माजी नगरविकास मंत्री मिलिंद नाईक यांनी पुढाकार घेतला होता. मार्केट प्रकल्पाच्या पहिल्या मजल्यावर फळभाजी, मासळी मार्केट, बर्फ साठवणूक कक्ष आहेत.दुसऱ्या मजल्यावर २३ दुकानगाळे आहेत.
तिसऱ्या मजल्यावर सुपरमार्केटची व्यवस्था आहे. चौथ्या मजल्यावर सुमारे ५०० आसनाचा कम्युनिटी हॉल आहे. तळमजल्यावर वाहन पार्किंग व्यवस्था तसेच लिफ्ट अशा सर्व सुविधा आहेत.
सदर प्रकल्पाचे लोकार्पण ३१ मे २०२१ रोजी तत्कालीन नगराध्यक्ष दामोदर कासकर यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यामुळे त सदर प्रकल्प कार्यान्वित होईल, अशी आशा सडावासीयांना वाटत होती.
तथापि वीज खाते व सार्वजनिक बांधकाम खात्याची वीज व पाणी बिलांची मोठी थकबाकी मुरगाव पालिकेने फेडली नसल्याने संबंधित खात्याने तेथे वीज, पाणी पुरवठा करण्यास नकार दिला होता.
त्यामुळे सदर प्रकल्प कार्यान्वित करण्यास अडसर आला होता. वीज खात्याने वीज जोडणी देण्यास सहमती दर्शवून ‘थ्री फेजऐवजी वन फेज’वीज पुरवठा करण्याची तयारी दाखविली होती. परंतु आता वीज, पाणी बिलाची थकबाकी वन टाईम सेंटलमेंट अंतर्गत फेडण्यात आली आहे. त्यामुळे प्रकल्पासमोरील मोठा अडथळा दूर झाला आहे.
सदर मार्केट प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी मुरगाव पालिकेने तेथे स्वच्छता केली आहे. तेथील काही बाबींची दुरुस्तीही करण्यात आली आहे. त्यामुळे सदर प्रकल्प कार्यान्वित झाल्यास मुरगाव पालिकेला महसूल मिळण्यास हातभार लागणार आहे. तसेच एक पांढरा हत्ती म्हणून जी टीका केली जाते, तीही थांबणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.