Rumdamol Davorlim : रूमडामळ दवर्ली पंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान पंच विनायक वळवईकर यांच्यावर शनिवारी रात्री प्राणघातक हल्ला झाल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी मायणा कुडतरी पोलीसांनी आयुब खान या संशयिताला अटक केली आहे.
या घटनेचा रुमडामळ येथील कथित बेकायदेशीर मदरसा प्रकरणाशी संबंध लावला जात आहे.
गाडीची काच फोडली; सुऱ्याने वार
शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास वळवईकर हे आपल्या गाडीतून जात असताना फोन कॉल घेण्यासाठी थांबले असता एका व्यक्तीने जड वस्तूने त्यांच्या गाडीची काच फोडून नंतर त्यांच्यावर सुऱ्याने हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला.
मात्र वळवईकर यांनी प्रसंगावधान राखून गाडीचे दार उघडून त्या मारेकऱ्याला ढकलून दिल्याने हा मारेकरी पळून गेला, अशी माहिती वळवईकर यांनी दिली.
या पंचायतीचे अन्य एक पंच समीउल्ला फणीबंध यांच्या गाडीवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करून गाडीची मोडतोड करण्यात आल्याची तक्रार पोलिसांत नोंद झाली आहे .
दोषींवर गंभीर कारवाई करणार : मुख्यमंत्री
पंचावर झालेली ही हल्ल्याची घटना गंभीर आहे. या प्रकरणाचा मी अहवाल घेतला आहे. त्यावर गंभीर करवाई केली जाईल. आपण या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लोहिया मैदानावर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
बेकायदेशीर मदरशावरुन तणाव
हाऊसिंग बोर्ड परिसरात गेल्या चार वर्षांपासुन एका घरात बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या मदरशावरुन परिसरात वातावरण तापले आहे. पंच विनायक वळवईकर यांनी हे प्रकरण पंचायत बैठकीत उपस्थित केले. तेव्हा दोन गटांमध्ये बाचाबाचीही झाली होती.
वळवईकर यांनी बेकायदेशीर मदरशा प्रकरणी कुडतरी पोलिसातही तक्रार दखल केली होती. त्यामुळे वळवईकर यांच्यावर हल्ला करण्यात आला असावा, असाही अंदाज व्यक्त होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.