CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

मुख्यमंत्र्यांकडून उलटतपासणी! खरी कुजबुज

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राज्यभर केंद्राने सुरू केलेल्या योजनांची जागृती करण्याचे कार्यक्रम सुरू आहेत.

दैनिक गोमन्तक

मुख्यमंत्र्यांकडून उलटतपासणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राज्यभर केंद्राने सुरू केलेल्या योजनांची जागृती करण्याचे कार्यक्रम सुरू आहेत. ताळगावातही हा कार्यक्रम झाला. केंद्र सरकारचे गुणगान गाणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या कार्यक्रमाचा फायदा उठवत जमलेल्या लोकांना योजनांची माहिती देतानाच त्यांचा गृहपाठही घेतला. किती लोकांनी या योजनांचा फायदा घेतला तसेच किती जणांना आतापर्यंत केंद्र सरकारची या योजनेअंतर्गत रक्कम मिळाली याची जणू काय ते परीक्षाच घेत होते. त्‍यांनी लाभार्थ्यांना हात वर करण्यास सांगितले व त्यानंतर त्यांना उभे करून त्यांची उलटतपासणी करण्यास सुरुवात केली. म्‍हणजेच लोकांना त्यांनी या कार्यक्रमात उठाबशा काढायला लावल्या. मुख्यमंत्र्यांना तसेच मंत्री बाबूश मोन्सेरात यांना खूष करण्यासाठी लाभार्थ्यांनीही या उठाबशा सहनही केल्‍या. मात्र कार्यक्रमानंतर या प्रकाराची लोकांमध्ये चर्चा सुरू होती. ∙∙

गोवा डेअरीच्या निवडणुकीत सरकारी पॅनल!

‘पळा पळा कोण पुढे पळे’ हे बिद्रवाक्य बदलून आता ‘लुटा लुटा कोण किती लुटतो ते’ असे झाले असावे अशी शंका येते. गोवा डेअरीची ज्या लोकांनी मलई खाल्ली तेच आता पुन्हा संचालक बनण्यास धडपडत आहेत. १९ जूनला होणाऱ्या निवडणुकीत म्हणे तीन पॅनल्‍स उतरली आहेत. त्यात बहुतांश माजी संचालक व माजी अध्यक्ष आहेत. आता दोन वेगवेगळ्या पॅनल्‍स‍चे उमेदवार आपले पॅनल सरकारचे आहे, आपल्या पॅनेलला सरकारचा पाठिंबा आहे असे सांगत आहेत. म्हणजे सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, माजी सहकारमंत्री गोविंद गावडे व मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी दोन-दोन पॅनल्‍स गोवा डेअरीवर उतरविली आहेत का, असा प्रश्न दूध सोसायटीच्या अध्यक्षांना पडला आहे. म्हणजे गोवा डेअरीच्या राजकारणात सरकारही सामील आहे तर! मग देवच भले करो डेअरीचे असेच म्हणावे लागेल. ∙∙∙

आणखीन एक व्हिडीओ...

सध्या गोव्यासंदर्भात रोज नवनवीन व्हिडीओ समोर येताहेत. अशातच, आता समोर आलेल्‍या एका कथित व्हिडीओत एक तरुणी चारचाकीवर बसलेल्या एका तरुणांच्या गटाशी बोलताना दिसत आहे. आपल्याला गोव्यात एन्जॉय करायचे आहे का? तुम्हाला ‘सर्व्हिस’ हवी तर सांगा, असे ती त्यांना सांगताना दिसतेय. मुळात हा कथित व्हिडीओ बनावटच असावा असे बोलले जात आहे. पण, अशा कथित व्हिडीओमुळे विनाकारण गोव्याचे नाव बदनाम होत आहे. ज्यांनी हा व्हिडीओ बनविला आहे, त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी सध्या नेटिझन करीत आहेत. ∙∙∙

बिच्चारे, आलेक्स सिक्वेरा!

सांतआंद्रेतील भाजपचे माजी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा हे पराभूत झाल्यापासून त्‍यांनी मतदारसंघात फिरकणेच बंद केले आहे. नवनिर्वाचित आमदार वीरेश बोरकर यांनी मतदारसंघातील प्रलंबित कामे तसेच बेकायदा कामांचा आढावा घेण्यास सुरुवात केल्यापासून सिल्वेरा यांनी सध्या गप्प राहणे पसंत केले आहे. पंतप्रधान मोदींच्या सेवा, सुशासन व गरीब कल्याणची आठ वर्षे कार्यक्रमाला ताळगावात ते हजर राहिले. भाजपमध्ये जाऊन केलेला प्रयोग त्यांच्या अंगलट आला, मात्र आता ‘ना घर का, ना घाट का’ अशी त्‍यांची स्थिती झाली आहे. काँग्रेसने तर त्या दहा फुटिरांना कोणत्याही परिस्थिती घेणार नसल्याचे स्पष्ट केल्याने सिल्वेरा यांना भाजपमध्‍ये राहण्यापासून पर्याय राहिलेला नाही. एरवी त्यांची राजकीय कारकीर्द दशकापूर्वीच संपुष्टात आली होती. पण भाजपचे आमदार विष्णू वाघ यांच्यानंतर त्यांना संधी मिळाली. तरीसुद्धा काँग्रेसला दिलेली सोडचिठ्ठी त्‍यांना महागात पडलीय. तीनवेळा आमदार झालेल्या सिल्वेरांची भाजप नेत्यांकडून दखलही घेतली जात नसल्याने ते निराश आहेत म्‍हणे. ∙∙∙

(role of the Chief Minister Pramod sawant In Goa politics)

काणकोणातील रुसवे-फुगवे

विधानसभा निवडणुकीत परिवर्तन झाल्यापासून काणकोणात राजकीय मंडळींमधील रुसवे-फुगवे वाढत चालले आहेत. बरे ही मंडळी भिन्न-भिन्न पक्षांतील असती तर गोष्ट वेगळी होती. पण प्रत्यक्षात तसे नाही. तर ही मंडळी एकाच पक्षाची पण भिन्न-भिन्न नेतृत्व मानणारी आहे. या प्रकारामुळे त्यांच्या विरोधकांची मात्र करमणूक होत आहे. सोमवारी दक्षिण काणकोणमधील लोलये-माशे येथील बाब्रे खाडीवर बांधलेल्या पुलाच्या उद्घाटनावर इजिदोर समर्थकांनी टाकलेल्या बहिष्कारातून त्याचा प्रत्यय आला. इजिदोर यांच्या प्रयत्नातून जरी हा पूल झालेला असला तरी त्याचे उद्घाटन त्यांना करता आलेले नाही हा काळाचाच महिमा. पण ते त्यांना अजूनही मानणाऱ्यांना कोण सांगणार? ∙∙∙

सरकारी कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांनाच मास्‍कचा तिटकारा?

गेल्या काही दिवसांतील कोविड रुग्णांचे आकडे पाहिल्यास कोरोनाचा संसर्ग पुन्हा डोकावू लागलाय असेच दिसते. अशातच, लोकांनी पुन्हा एकदा मास्क वापरण्‍यास सुरूवात करावी, असे आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे. मात्र, दुसरीकडे सरकारी खात्यांतील अधिकारी किंवा कर्मचारी याची अंमलबजावणी करताना दिसत नाही. तसेच लोकप्रतिनिधीही मास्क वापरत करत नसल्याचे दिसतात. अशावेळी प्रशासनाने व नेत्यांनी या बदलाची सुरूवात स्वतःपासून करीत लोकांना संदेश देण्याची गरज आहे. शिवाय ज्यांनी अजूनही कोविडची एकही लस घेतलेली नाही, त्यांच्यामध्ये जागृती करण्याची वेळ आली आहे. ∙∙∙

हायमास्ट दिव्यांखाली अंधार...

जगभरातील पर्यटक गोव्याच्या चंदेरी किनाऱ्यांवर मौजमजा करण्यासाठी येतात. पण किनाऱ्यांवर वाहने पार्क करून समुद्रस्नानाला गेल्यावर पर्यटकांचे साहित्य लांबवण्याचे प्रकार वारंवार घडतात. किनाऱ्यांवर येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी हायमास्ट दिवे लावण्याचे तसेच सीसीटीव्ही बसवण्याचे सरकारने ठरवले होते. पण, दिवे लावण्याचे काम कुठे अडले, कुणास ठाऊक. बहुतांश किनाऱ्यांवर अजूनही हायमास्ट दिव्यांचा उजेडच पडला नसल्याच्या तक्रारी आहेत. परिणामी चोरट्यांचे आयतेच फावते. काही किनाऱ्यांवर लावलेल्या दिव्यांचा उजेडही पुरेसा नसतो. त्यामुळे अंधाराचा फायदा घ्यायला टपलेल्यांना आयतीच संधी मिळते. त्यातून गुन्हे घडतात. समुद्रकिनाऱ्यावर चोरट्यांवर नजर ठेवण्यासाठी आयआरबी पोलिसांना पर्यटन पोलिस म्हणून नेमण्‍यात आले होते. मात्र हे पोलिस किनारपट्टीवर क्वचितच दिसतात. शिवाय आताशा तोतया पोलिसही भटकतोय म्हणे. किनाऱ्यांवर लुटल्या गेलेल्या पर्यटकांनी दाद तरी कुणाकडे मागावी? ∙∙∙

भाऊ, बस चालणार ना?

केवळ प्रसिद्धीसाठी कोणतेही विकासकाम केल्यास त्या कामाची दुर्दशा होते व त्यातून काम केलेल्याची बदनामीच जास्त होण्याचा धोका असतो. आमदार व मंत्री आपल्या वाढदिनी अनेक विकासकामांची सुरूवात करतात, कोनशिला बसवितात व भरपूर प्रसिद्धी घेतात. नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर यांनी आपल्या वाढदिनी मडगाव उपनगरीय भागात कदंब बससेवा सुरू केली व फोटो छापून आणला. काही महिन्यांपूर्वी कुंकळ्‍ळीचे माजी आमदार क्लाफास डायस यांनी मडगाव ते वेरोडा तलवडा अशी कदंब बससेवा सुरू केली होती. केवळ दोनच दिवसांनी ती बस प्रवासी नाही म्‍हणून बंद करावी लागली. उल्हास भाईने आपल्या मतदारसंघात सुरू केलेल्या बसची गत तीच झाली नाही म्हणजे मिळविले. बस उद्‌घाटनाच्या वेळी काही जण कुजबुजलेच, भाऊ बस चालणार ना? ∙∙∙

ही दिवाळखोरी तर नव्हे?

तब्बल ३७ कोटी रुपये खर्चून पेडणे येथे उभारण्यात आलेले नवे कोरे स्टेडियम एका खासगी कंपनीला भाडेपट्टीवर देण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे तेथील क्रीडापटू व क्रीडाप्रेमी नाराज झालेले आहेत. ते सरकारच्या या निर्णयावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करु लागले आहेत. सरकारने अद्याप यासंदर्भात अजून अधिकृत घोषणा केली नसली तरी ज्या खासगी कंपनीचे नाव घेतले जातेय ती भाजप श्रेष्ठींच्या मर्जीतील आहे व त्यामुळेच त्यात तथ्य असावे. पण क्रीडा विकासासाठी उभारलेली अशी भव्य संकुले आर्थिक समस्येपोटी भाडेपट्टीवर तर देत नाहीत ना, अशी चर्चा सुरू झालेली आहे. अन्य भव्य प्रकल्पांवरही ती वेळ येऊ शकते कारण अशा प्रकल्पांची देखभाल प्रचंड खर्चिक असते असे सांगतात. ∙∙∙

लोका सांगे ब्रह्मज्ञान

सरकारने कोविडच्या चौथ्या लाटेबाबत लोकांना सावधगिरीचे इशारे देण्यास सुरुवात केली आहे व दुसरीकडे लसीकरणासाठीही पावले उचलली आहेत. परवा तर आरोग्य संचालक व इतरांनी एकंदर स्थितीचा आढावाही घेतला. पण कोविडप्रतिबंधक उपायांची माहिती देणाऱ्या या लोकांनी स्वतः मास्‍क परिधान केले नव्हते. त्याबद्दल अनेकांनी सवाल उपस्‍थित केला. सुरक्षित अंतर, मास्‍क हे केवळ लोकांसाठीच आहे का, हे त्यांचे प्रश्न अनुत्तरीतच राहिले. तेवढ्यानेही भागत नाही. कोविड संसर्ग घटल्यापासून सर्व व्यवहार पूर्ववत सुरू झालेले आहेत. कोविडचा महाभयंकर अनुभव घेतलेलेही खबरदारी घेताना दिसत नाहीत, हीच तर चिंतेची बाब आहे. ∙∙∙

बुडत्याचा पाय आणखी खोलात

‘बुडत्याचा पाय खोलात’ अशी एक म्हण आहे. ही म्हण राज्यातील एका वादग्रस्त पोलिस अधिकाऱ्याला तंतोतंत लागू पडते. आधीच काही प्रकरणांत त्याच्यावर खात्यांतर्गत कारवाई झाली आहे. असे असतानाही संकटे त्याची पाठ सोडताना दिसत नाहीत. याला तो तरी बिचारा काय करणार. आता आणखी एक नवी आफत त्याच्यासमोर उभी ठाकली आहे. खासगी जागेतील अतिक्रमण व घराची मोडतोड केल्याप्रकरणी फिर्यादीचा पक्ष घेण्याऐवजी या अधिकाऱ्याने संशयिताकडूनच पैसे घेऊन फिर्यादीला समन्स बजावून पोलिस ठाण्यात बोलावल्याचे प्रकरण वर आले आहे. या प्रकरणात अन्य काही अधिकाऱ्यांची नावे असली तरी वादग्रस्त पोलिस अधिकाऱ्यामागील ग्रहण काही सुटता सुटत नाही. यात त्याचा कितपत हात आहे किंवा नाही, हे न्यायालयातच सिद्ध होईल. कारण या प्रकरणाची तक्रार पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. ∙∙∙

पुन्हा डोके वर

कोरोना गेला, असे म्हणणाऱ्यांच्‍या कानावर आता पुन्हा चिंता वाढविणाऱ्या बातम्या पडत आहेत. देशात तसेच राज्यातही सक्रिय रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे यंदा देशी पर्यटकांच्या जिवावर रोजीरोटी भरणाऱ्या व्यावसायिकांची चिंता वाढली आहे. कोरोना संपेल आणि विदेशी पर्यटकही गोव्यात येतील, अशी स्वप्ने ते पाहत होते, मात्र हंगाम संपल्यात जमा आहे. आता पुढील वर्षी तरी कोविडरूपी राक्षसाने तांडव करू नये, अशी प्रार्थनाही ते करू लागले आहेत. मास्कमुळे श्वास कोंडलेली जनता खूप त्रस्त झाली आहे. कोरोनाने डोके वर काढले तर... काही जण तर पुन्हा ‘ते’ दोन वर्षाांपूर्वीचे दिवस आठवू लागले आहेत. आरोग्य यंत्रणाही सज्ज झाली आहे. त्यामुळे ‘ते’ दिवस पुन्हा येऊ नयेत असे वाटत असेल तर बेफिकिरी सोडा. म्हणूनच तर काही मंत्र्यांच्या तोंडावर पुन्हा मास्क चढू लागले आहेत. ∙∙∙

फिलिप अजूनही वेळ्‍ळीत कार्यरत

भाजपमध्ये गेल्याने वेळ्ळीच्या मतदारांनी निवडणुकीत नाकारले असले तरी या मतदारसंघाचे माजी आमदार आणि माजी मंत्री फिलिप नेरी रॉड्रिगीस यांनी या मतदारसंघातील लोकांशी असलेले संबंध तुटू दिलेले नाहीत. चर्चिल आलेमाव वगैरेंनी पराभव झाल्यानंतर आपली कार्यालये बंद केली. पण फिलिपने आपले कार्यालय बंद केलेले नाही, लोक अजूनही त्यांच्या घरी आपल्या अडचणी घेऊन येत असतात. फिलिप यांना चिकाटी असलेले राजकारणी म्हणून ओळखले जाते. २०१२च्या निवडणुकीत जेव्हा त्यांचा पराभव झाला होता, त्यावेळीही त्यांनी धीर न सोडता लोकांशी आपला संपर्क चालूच ठेवला होता. आता ते पुन्हा तीच चाल खेळत तर नसावेत ना? ∙∙∙

आयटीचे मृगजळ

गोव्यात गेल्‍या अनेक वर्षांपासून आयटी हबबाबत घोषणा सुरू आहेत. पण अजून कुठेच त्याचे प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही. दोनापावला, पेडणे वगैरे जागांबाबत सरकारी पातळीवर घोषणा झाल्या, पण नंतर घोडे कुठे अडले ते कळू शकलेले नाही. वास्तविक आयटी हे प्रदूषणरहित क्षेत्र आहे. मग हा हब अजून का साकारला नाही ते सरकारने स्पष्ट करण्याची गरज आहे. आयटी क्षेत्रात असंख्य गोमंतकीय तरुणांनी लक्षणीय कामगिरी बजावलेली आहे. आयटी हब झाला तर त्यांना रोजगाराच्‍या संधी मिळतील हे या खात्‍याचे मंत्री रोहन खंवटे यांनी लक्षात घ्यावे. ∙∙∙

‘खाकी’ला काळीमा

राज्यात यापूर्वी अनेकदा खाकी वर्दी बदनाम झाल्याचे किस्से घडले आहेत. त्यामुळे राज्याची प्रतिमा डागाळली जात आहे. असे असले, तरी खाकी वर्दीला काळीमा फासण्याचे प्रकार काही कमी होताना दिसत नाहीत. एका अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाचा ठपका लागलेला पोलिस कॉन्स्टेबल तब्बल आठ दिवसांपासून फरार आहे. आतापर्यंत संशयित फरार होत असत; पण आता पोलिसच फरार होऊ लागले आहेत. काळाचा महिमा, दुसरे काय? असो. या प्रकरणात अद्याप त्याला निलंबित केलेले नाही. कदाचित जामीन मिळाला नाही तर पोलिस अटक करतील, अशी भीती त्याला सतावते आहे. या पठ्ठ्याने आपला मोबाईलही बंद ठेवला आहे. पण तो येनकेन प्रकारे पत्नीच्या संपर्कात असतो. पोलिस चौकशीसाठी आले तरी तीही पतीची बाजू घेत, मला काहीच माहिती नाही असे सांगून हात वर करते. आता पोलिसच पोलिसाच्या कारनाम्यांमुळे पुरते अडचणीत आले असून याची चर्चा सध्या चवीने चघळली जात आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT