Temple In Goa: मंदिरांचे वाद न्यायालयात खितपत ठेवण्यापेक्षा मंदिर व्यवस्थापन समिती स्थापन करून धार्मिक शास्त्र व धर्माधिष्ठित गुरूंच्या माध्यमातून हे वाद निकाली काढताना गोव्यात आध्यात्मिक पर्यटनाला वाव करून देण्याची आज गरज आहे.
न्यायालयीन वादातून मंदिरांचे सरकारीकरण होण्याचा धोका असतो, म्हणून हे वाद आपसात मिटवायला हवेत, असे मत हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी व्यक्त केले.
म्हार्दोळ येथील महालसा मंदिराच्या प्रांगणातील सिंहपुरुष सभागृहात आज (रविवारी) गोमंतक मंदिर धार्मिक संस्था परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर रमेश शिंदे यांच्यासोबत सद्गुरू नीलेश सिंगबाळ, गोमंतक मंदिर महासंघाचे सचिव जयेश थळी व लेखिका शेफाली वैद्य आदी उपस्थित होते.
रमेश शिंदे म्हणाले की, न्यायालयात असलेले मंदिरांचे वाद पिढ्यान पिढ्या चालत राहतात. देशभरात आज पाच कोटी मंदिर प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. अशा प्रकरणांचा सोक्षमोक्ष लावायचा असेल तर मंदिर व्यवस्थापन समितीला चालना द्यायला हवी.
पर्यटकांमध्ये तर गोवा म्हणजे समुद्र किनारे, कॅसिनो आणि भोगवस्तूचे राज्य असल्याचा समज पसरत चालला आहे. हा गैरसमज दूर करताना गोव्यात धार्मिक पर्यटनाला चालना द्यायला हवी. काशी विश्वेश्वराच्या मंदिराला भेट देणाऱ्या पर्यटकांची वार्षिक संख्या आट कोटी आहे तर गोव्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या त्र्याहत्तर लाख आहे.
त्यामुळे किनारपट्टी म्हणजे गोवा नव्हे तर येथील अध्यात्मिकतेला चालना देणारी मंदिरे ही गोव्याची ओळख असल्याचे दाखवून देण्याची आज गरज असल्याचे रमेश शिंदे म्हणाले.
मान्यवरांच्या हस्ते समई प्रज्वलनाने परिषदेला सुरुवात झाली. या परिषदेच्या सुरुवातीला संदेशवाचन करण्यात आले. सूत्रसंचालन सुमेधा नाईक व राहुल वझे यांनी केले. त्यानंतर झालेल्या विविध सत्रात तसेच परिसंवादात मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करून मंदिरांचे वाद निकाली काढताना मंदिरे वाचवण्यासाठी एकसंध होण्याची गरज व्यक्त केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.