Vasco News सडा येथील लेगसी कचरा डंपिंग साईटच्या जवळ मोकळ्या जागेत घातलेला कचरा शक्य तितक्या लवकर काढा व ती जागा मूळ स्वरूपात आणा अशी ताकीद मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी कंन्ट्राटदाराला दिली.
आपण याविषयी कचरा व्यवस्थापन मंत्री बाबूश मॉन्सेरात यांच्याकडे बोलणी करणार असल्याचे आमोणकर यांनी सांगितले.
हेडलॅण्ड सडा येथील कचरा प्रकल्पाशेजारी असलेल्या कला व संस्कृती खात्याच्या मोकळ्या जागेतर 2019 साली कचरा प्रकल्पामधील शेकडो टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी तात्पूरती शेड उभारून मशिनरी घालून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली.
माजी मंत्री मिलिंद नाईक यांनी याकामी कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या पुणे येथील कंपनीला कंत्राट देऊन कचरा नष्ट करून खत निर्मिती केली होती.
2020 पर्यन्त कचरा प्रकल्पा मधील शेकडो टन कचऱ्याची विल्हेवाट लावल्यानंतर ही तात्पुरती शेड व मशीनरी तेथून हटविण्यात आली होती.
दरम्यान तद्नंतर या मोकळ्या जागेवर परत कचऱ्याचे ढीग करून ही जागा कचऱ्याने व्यापून टाकली. आता सदर कचरा येथे जवळच असलेल्या समुद्रात वाहून जाण्याच्या मार्गावर आहे. तसेच कचरा साठवून त्यावर माती घालण्याचे काम सुरू आहे.
दोन दिवसापूर्वी या कचऱ्याला आग लागल्याची घटना घडली. हा विषय चर्चेचा बनला आहे. दरम्यान याची दखल घेऊन मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी आज या कचरा डंप साईटवर कचरा व्यवस्थापन महामंडळाच्या अधिकाऱ्यांसह पालिका मुख्याधिकारी, पालिका अभियंता आणि कंत्राटदार यांच्यासह सडा येथील लेगसी कचरा डंपिंग साईटची संयुक्त पाहणी केली.
त्यावेळी मोकळ्या जागेवर कचरा डंप करून त्यावर माती घातल्याचे आढळून आले. तसेच दर्याच्या बाजूला कचरा दर्यात वाहून जाण्याच्या मार्गावर आहे. याव्यतिरीक्त येथील एमएमटीसी इमारतीच्या दुसऱ्या मजल्या पर्यन्त कचरा डंप केलेला आढळला.
दरम्यान याविषयी आमदार संकल्प आमोणकर यानी कंत्राटदाराला जाब विचारुन तुम्हाला येथे कचरा टाकण्याचा अधिकार कुणी दिला असा कडाडून सवाल केला असता त्याने पालिकेला बोट दाखवले.
तर पालिकेने सरळ आपल्या कानवर हात ठेवले. त्यामुळे कचरा टाकण्याचा अधिकार कुणी दिला हा प्रश्न मिटला नाही. शेवटी संकल्प आमोणकर यांनी आपण कचरा व्यवस्थापन संचालक लेविनसन मार्टीन्स यांच्याशी पुन्हा एकदा संयुक्त पाहणी करून त्यांच्या नजरेस ही बाब आणणार असल्याचे सांगितले.
तसेच कचरा व्यवस्थापन मंत्री बांबूश मोन्सेरात यांच्याकडेही हा प्रश्न मांडणार असल्याचे ते म्हणाले व ही जागा मुळ स्वरूपात आणण्याची आपण कंत्राटदाराला ताकीद दिली असल्याचे आमोणकर म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.