सपना सामंत
वाळपई : सत्तरी तालुक्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. ते टिकवून ठेवण्यासाठी सरकारकडून चालना मिळायला हवी. नगरगाव पंचायत क्षेत्रातील ‘कावळ्याचे पाणी’, माळोली-सत्तरी (पोस्त) येथे असलेल्या पोर्तुगीज काळात उभारलेल्या आऊट पोस्ट व तुरुंगाची दूरवस्था झाली आहे. त्यामुळे त्याची दुरुस्ती करावी व पुरातत्व खात्याने ही इमारत ताब्यात घेऊन तिचे जतन करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
ही इमारत सध्या जलसंपदा खात्याच्या ताब्यात आहे. मात्र, तिच्याकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक तसेच स्थानिकांनी या तुरुंग व आऊट पोस्टचे संवर्धन करण्यासाठी पुरातत्व खात्याने पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली आहे.
आम्ही लहानपणापासून हा तुरुंग आणि आऊट पोस्ट पाहात आहोत. आमच्या पूर्वजांनी देशासाठी बलिदान दिले, त्याचे हे स्थळ साक्षीदार आहे. भावी पिढीला इतिहासाची जाणीव करून देण्यासाठी या स्थळाचे जतन करणे गरजेचे आहे. योग्य रितीने विकास केल्यास हे पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला येऊ शकते.
- अनिरुध्द जोशी, स्थानिक रहिवासी.
क्रांतिकारकांमुळे ऐतिहासिक महत्त्व
1932 साली भारत स्वतंत्र होण्यापूर्वी माळोली येथे पोर्तुगीज, इंग्रजांनी आऊट पोस्ट व त्याच्या बाजूला तुरुंगाची उभारणी केली होती. त्याकाळी स्वातंत्र्यासाठी लढण्याऱ्या स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकाऱ्यांना या तुरुंगात डांबून ठेवले जात होते. हा तुरुंग स्वातंत्र्य लढ्याचा साक्षीदार आहे. कित्येकांनी या तुरुंगात शिक्षा भोगली आहे, तसेच आत्मबलिदानही दिले आहे. त्यामुळे या तुरुंगाला ऐतिहासिक असे महत्त्व आहे.
...तर होणार उत्कृष्ट पर्यटन स्थळ
या इमारतीकडे सध्या दुर्लक्ष होत असल्याने आजूबाजूला झाडाझुडपांनी वेढले आहे. इमारतीचा काही भाग कोसळला आहे. बरीच वर्षे होऊनही ही इमारत आजही मजबूत स्थितीत आहे. इमारतीतील काही दगड चोरून नेण्याचेही प्रकार घडले आहेत.
पुरातत्व खात्याने या इमारतीची दुरुस्ती करून आपल्या ताब्यात घ्यायला हवी. पुरातत्व खात्याने इमारतीचे दुरुस्तीकाम करून पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले तर स्थानिक पंचायतीला त्यातून महसूलही मिळू शकतो आणि हे स्थळ नावारूपाला येईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.