लोकसाहित्यातील भरीव योगदानाबद्दल विनायक खेडेकर यांना 2019-20 वर्षासाठी; तर शास्रीय संगीतात अद्वितीय कामगिरी करणाऱ्या पं. प्रभाकर कारेकर यांना 2021-22 सालचा गोमंतविभूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली. गोवा घटकराज्य दिन (30 मे) सोहळ्यात पुरस्कारांचे वितरण होईल.
विविध क्षेत्रांत अतुच्च कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा राज्य सरकारच्या वतीने ‘गोमंतविभूषण’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. या संदर्भात मुख्यमंत्री सावंत म्हणाले, लोकसाहित्यातील योगदानाबद्दल विनायक खेडेकर यांना २०१९-२० वर्षासाठीचा हा पुरस्कार देण्यात आला असून, कोरोनामुळे हा पुरस्कार दिला गेला नव्हता.
शास्रीय संगीतात गोव्याचे नाव अजरामर करणाऱ्या पं. प्रभाकर कारेकर यांना २०२१-२२ वर्षासाठीचा पुरस्कार देण्यात येत आहे. यापूर्वी डॉ. अनिल काकोडकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, लक्ष्मण पै, स्वातंत्र्यसैनिक लोंबार्ट मास्कारेन्हस, डॉ. प्रेमानंद रामाणी यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कारेकर : संगीत क्षेत्रात बहुमोल योगदान
पं. प्रभाकर कारेकर यांचे शास्त्रीय संगीत क्षेत्रात बहुमोल योगदान राहिले आहे. प्रिये पहा, नभ मेघांनी आक्रमिले, राम होऊनी राम गा रे... अशी अनेक लोकप्रिय गीते त्यांनी गायिली. पं. सुरेश हळदणकर, पं. जितेंद्र अभिषेकी, पं. सी. आर. व्यास यांच्याकडून त्यांनी गायनाचे धडे घेतले.
पु. ल. देशपांडे यांच्या ‘शाकुंतल ते सौभद्र’ या कार्यक्रमाने त्यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळवून दिली. ‘सवाई गंधर्व’ महोत्सवात देखील त्यांच्या गायनाने श्रोते भारावून गेले.
त्यांनी देश-विदेशात गायनाच्या मैफिली केल्या आहेत. मध्यप्रदेश शासनाचा ‘तानसेन’ पुरस्कार, संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे.
लोककला व लोकसंस्कृतीच्या क्षेत्रात ज्या-ज्या लोकांनी मला मदत केली, मला सन्मान दिला त्यांचा हा पुरस्कार आहे. त्यांच्या वतीने मी हा पुरस्कार स्वीकारणार असल्याने त्याचा सर्वाधिक आनंद आहे. ईप्सित कार्यात ज्यांचे सहकार्य लाभले, त्यांचा ऋणी आहे.
- पद्मश्री विनायक खेडेकर
‘गोमंतविभूषण’ जाहीर झाल्याचे कळताच मला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. कारण, माझ्यासाठी हे अनपेक्षित होते. माझ्या जन्मभूमीतील मोठा पुरस्कार मला मिळणार आहे. तो आनंद अवर्णनीय आहे. गुरुजनांमुळेच मी संगीत क्षेत्रात व आयुष्यात काही चांगले करू शकलो. - पं. प्रभाकर कारेकर
संशोधनपर विपुल ग्रंथसंपदा
पद्मश्री विनायक खेडेकर हे लोकसंस्कृती आणि लोकसाहित्याचे ज्येष्ठ संशोधक, अभ्यासक आहेत. त्यांनी गोवा कला अकादमीत सदस्य सचिव पदाची जबाबदारी सांभाळली आहे.
गोव्यातील लोककला, लोकवाद्य प्रकारांचे दस्तावेजीकरण केले आहे. गोमंतकीय लोककला, लोकसरिता, गोवा कुळमी, फोक डान्सेस ऑफ गोवा, गोमंतकीय लोकभाषा अशी अनेक संशोधनपर ग्रंथसंपदा त्यांच्या नावावर आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.