कायदा आणि सुव्यवस्था म्हटली की आजही लोकांना आठवतात ते रवी नाईक. २५ जानेवारी १९९१ ते १८ मे १९९३ या त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या अडीच वर्षांच्या काळात त्यांनी अनेक ‘समाजविघातक’ लोकांना ‘ताळ्यावर’ आणले. त्यामुळे या काळात कायदा व सुव्यवस्था गुण्यागोविंदाने नांदताना दिसली.
माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव, रुडॉल्फ फर्नांडिस, त्याकाळी आमदार असलेल्या त्यांच्या मातोश्री व्हिक्टोरिया फर्नांडिस (मामी) अशा बड्या धेंडांना तुरुंगाची वाट दाखवायला रवींनी मागेपुढे पाहिले नाही. ‘प्रोटेक्टर’ ही त्यावेळची ‘समांतर सरकार’ चालविणारी गुंडांची गँग रवींनीच संपवली. त्यामुळे सामान्य लोक रवी नाईक यांना तारणहार मानू लागले. ‘गुंडांचा कर्दनकाळ’ अशी त्यांची प्रतिमा जनमानसात निर्माण झाली.
२००७ साली गृहमंत्री असताना रवी नाईक यांनी हीच आपली चमक पुन्हा एकदा दाखवली. बाबूश मोन्सेरात, त्यांच्या पत्नी जेनिफर मोन्सेरात, मिकी पाशेको यांनाही त्यांनी कायद्याचा बडगा दाखविला. पोलिस स्थानकावर हल्ला करणाऱ्यांना त्यांनी दयामाया न दाखवता फरफटत आणले! त्यामुळेच गुंड त्यांना वचकून असायचे. कोणाचाही मुलाहिजा न बाळगता केस कापून ते गुंडांना आत टाकत असत. पोलिसांना तर त्यांनी अगदीच ‘फ्री हँड’ दिला होता. अनेक पोलिस अधिकारी आजही त्याबाबत खासगीत सांगतात. यामुळेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला की सर्व प्रथम डोळ्यासमोर नाव येते ते रवी नाईक यांचे.
गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी तर अधिवेशनात राज्यात ढासळत चाललेली कायदा-सुव्यवस्था नियंत्रणात आणण्यासाठी रवींकडे जबाबदारी सोपवावी, अशी सूचना सरकारला केली होती. तीच गोष्ट
‘आप’चे आमदार व्हेंझी व्हिएगस यांची. त्यांनीही परवा पर्वरी येथे ‘आज तुमची खरी गरज आहे’ अशा शब्दांत रवींची प्रशंसा केली होती.
एरवी शांत प्रवृत्तीचे म्हणून गणले जाणारे रवी नाईक कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न आला की अगदी कडक व्हायचे. तेथे ते कोणतीही तडजोड करत नसत. लोकांना सुरक्षितता देणे हे शासनाचे कर्तव्य ठरते, असे ते मुख्यमंत्री असताना नेहमी सांगायचे. केवळ सांगायचेच नाहीत तर तसे वागायचेसुद्धा. त्यामुळेच मेरशी, रायबंदर, चिंबलसारख्या भागातील मुलीसुद्धा रवींच्या काळात रात्री-अपरात्री बिनधास्तपणे फिरताना दिसायच्या.
राज्यातील गुंडगिरीचे संपूर्ण उच्चाटन करण्याचा विडाच रवींनी उचलला होता. आता त्यांच्या जाण्यानंतरही लोक त्यांची आठवण काढतच राहणार यात शंकाच नाही. म्हणूनच ढासळत चाललेल्या कायदा-सुव्यवस्थेची गाडी परत मार्गावर आणणे हीच त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल.
नगरसेवक ते मुख्यमंत्री
रवी नाईक यांना गोव्याच्या राजकारणातील ‘दीपस्तंभ’ असे म्हटले जाते. म्हणूनच तर १९७६ साली फोंड्याचे नगरसेवक म्हणून सुरू झालेली त्यांची राजकीय कारकीर्द मंत्री, मुख्यमंत्री, खासदार अशा प्रकारे गेल्या पन्नासहून अधिक वर्षांपासून सुरू होती. राजकारणात त्यांनी अनेक चढउतार पाहिले. पण सर्व आव्हानांना तोंड देत शेवटपर्यंत कायम राहिले.
१९८० साली काँग्रेसचे ज्योईल्द आगियार यांच्याकडून रवी पराभूत झाले. पण पहिल्याच निवडणुकीत पराभूत होऊनही ते डगमगले नाहीत. १९८४ साली मगो पक्ष दुभंगला गेला. तरीसुद्धा ते अडीच हजार मतांनी फोंड्यातून विजयी झालेच. त्यानंतर ते आजपर्यंत सहावेळा फोंड्यातून तर एक वेळा मडकईतून निवडून आले आहेत. मुख्यमंत्रिपदापर्यंतची त्यांची झेप विलक्षण अशीच म्हणावी लागेल.
रवी हे फोंडा तालुक्यातील आतापर्यंतचे एकमेव मुख्यमंत्री. एका गरीब घरातील मुलगाही राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो, हे रवींनी दाखवून दिले. म्हणूनच तर सरकारी नोकरी न मिळाल्याने निराश होणाऱ्या युवकांना ते हेच सांगायचे. जिद्द असेल तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकता, हा त्यांचा संदेश युवकांना प्रोत्साहित करून जायचा.
रवींच्या यशाचे मुख्य कारण म्हणजे त्यांची जिद्द, धडपड तसेच ‘नेव्हर से डाय’ ही वृत्ती. २०१२ साली त्यांचा पराभव झाल्यामुळे कार्यकर्ते निराश झाले. पण त्यांनी कार्यकर्त्यांना बोलावून ‘२०१७ साली होणाऱ्या निवडणुकीच्या तयारीला आतापासूनच लागा’ असे सांगून त्यांचे मनोधैर्य वाढवले. आणि त्यामुळे ते २०१७ साली तब्बल ३०५० मतांच्या आघाडीने निवडून येऊ शकले.
रवींची आणखी एक खासियत म्हणजे ते नेहमीच पक्षांच्या बंधनाबाहेर राहिले. म्हणूनच तर ते मगो, काँग्रेस व भाजप अशा तिन्ही पक्षांच्या निशाणीवर निवडून येऊ शकले. २०२२ साली त्यांना फोंड्याची उमेदवारी दिली म्हणून मूळ भाजप कार्यकर्ते नाराज झाले. त्यात आणखी एक गोष्ट म्हणजे तोपर्यंत तरी भाजप फोंडा मतदारसंघातून एकदाही निवडून आला नव्हता. असे असूनसुद्धा रवींनी बाजी मारलीच आणि फोंड्यावर प्रथमच भाजपचा झेंडा फडकवण्यात यश मिळवले. म्हणूनच तर त्यांना जपानी बाहुल्यांची उपमा दिली जायची. त्यांच्या हातात जेवढे पत्ते असायचे, त्यापेक्षा अधिक पत्ते त्यांच्या शर्टाच्या बाह्यात दडलेले असायचे. वेळ आली की हे पत्ते रवी बाहेर काढायचे. गोव्यातील अतिशय धूर्त राजकारणी म्हणजे रवी नाईक.
रवींची अडीच वर्षांची मुख्यमंत्रिपदाची कारकीर्द आजसुद्धा अनेकांच्या स्मरणात आहे. त्यांच्या काळात गुण्यागोविंदाने नांदत असलेली कायदा-सुव्यवस्था आज मर्मबंधातील ठेव बनली आहे. १३ महिन्यांची खासदारकीही त्यांनी संस्मरणीय बनवली. त्यांच्यावर लिहिलेल्या ‘विकासपुरुष’ या पुस्तकाने तर लोकसभेत जाण्याचा मान मिळवला. म्हणूनच तर असा नेता गोव्यात परत होणे नाही असे म्हटले जात आहे. सध्या ते कृषीमंत्री म्हणून कार्यरत होते. नगरसेवक ते मुख्यमंत्री, खासदार अशी हनुमान उडी घेऊन गोव्याच्या राजकारणावर आपला शिक्का जमविणाऱ्या तसेच गोव्याच्या राजकारणातील जवळजवळ सर्व महत्त्वाची पदे भूषविणाऱ्या बहुजन समाजाच्या या नेत्याच्या कार्याला मानाचा मुजरा.
जनाधार लाभलेला नेता
रवी नाईक यांच्यासारखा दुसरा लोकप्रिय नेता गोव्यात तरी दुसरा सापडणे कठीण. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांनी जोपासलेली बांधीलकी. परवाचेच उदाहरण घ्या, दै. ‘गोमन्तक’ने आयोजित केलेल्या ‘कोकोनट एनक्लेव्ह’ या कार्यक्रमाला कृषीमंत्री म्हणून रवी उपस्थित होते. वास्तविक आदल्या दिवशी गुरुवारी रात्री त्यांची तब्येत बिघडली होती.
ते कार्यक्रमाला येण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्याप्रमाणे मी ‘गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक यांना मेसेज पाठवला होता. पण शुक्रवारी म्हणजे कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी साडेआठ वाजता रवींचा मला ‘कार्यक्रमाला जाऊया’ म्हणून फोन आला आणि कार्यक्रमात तेच ''स्टार ऑफ ॲट्रॅक्शन’ ठरले. त्यांनी तेथे भरलेल्या प्रदर्शनाला भेट देऊन स्टॉल्सवाल्यांशी मनमुराद गप्पाही मारल्या. म्हणूनच ते माणसे जोडू शकले.
रवी नाईक यांची लोकप्रियता ही त्यांच्या पदावर कधीच अवलंबून नव्हती. २०१२ साली फोंड्यात पराभव होऊनसुद्धा त्यांची लोकप्रियता कधी कमी झाली नाही. माजी मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांच्या अंत्ययात्रेवेळी त्याचा प्रत्यय आला. त्या अंत्ययात्रेला तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, तत्कालीन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यासह अनेक मंत्री व आमदार होते.
पण असे असूनसुद्धा गर्दी जास्त होती ती त्यावेळी कोणीही नसलेल्या रवी नाईक यांच्याभोवती. कोकणातही याचा अनुभव आला. काँग्रेसचे रत्नागिरी जिल्ह्याचे निरीक्षक असताना मी त्यांच्याबरोबर होतो. त्यावेळी त्यांच्याभोवती जमणारी गर्दी कोकणातसुद्धा रवी किती लोकप्रिय आहेत याची साक्ष देत होती. त्यामुळे रवी म्हणजे गर्दी असे समीकरणच बनले होते.
गरीब घराण्यातून आल्यामुळे गरिबांशी रवी चांगल्या प्रकारे ‘कनेक्ट’ व्हायचे. म्हणूनच ते लोकांना आपलेसे वाटायचे आणि मुख्य म्हणजे ते लोकांना सांभाळायचे. म्हणूनच तर ५० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत ते कधीच वादात सापडले नाहीत. विरोधकसुद्धा त्यांच्यावर टीका करण्यात कचरत असत. म्हणूनच तर त्यांना राजकारणातील ‘पितामह’ असे संबोधले जायचे. ‘राजकारण हे राजकारणापुरते असावे, ते कधी वैयक्तिक आयुष्यात आणू नये’ हा त्यांचा संदेश बरेच काही सांगून जातो. अशा या अजातशत्रू तथा गोव्याच्या लोकप्रिय नेत्याच्या स्मृतींना आदरांजली.
शिक्षणमहर्षी
रवी नाईक यांनी शैक्षणिक क्षेत्रात दिलेले योगदान लक्षणीयच म्हणावे लागेल. या क्षेत्राशी विशेष संबंध नसूनसुद्धा त्यांनी या क्षेत्राला नवी दिशा दाखवली. फर्मागुढी-फोंडा येथे उभी असलेली ‘पीईएस’ची पाच शैक्षणिक आस्थापने याची साक्ष देतात.
१९९२ साली जेव्हा रवींनी ‘पीईएस’ संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा हाती घेतली तेव्हा या संस्थेच्या कॉलेज व उच्च माध्यमिक विद्यालयाचा संसार फक्त एका इमारतीत सुरू होता. सकाळी उच्च माध्यमिकचे वर्ग तर संध्याकाळी महाविद्यालयाचे वर्ग अशा प्रकारे हा कारभार सुरू होता. पण रवींनी सूत्रे हाती घेतल्यावर संस्थेचा अक्षरशः कायापालट केला.
बीएड व फार्मसी ही दोन महाविद्यालये सरकारी अनुदानाशिवाय सुरू केली. त्यातले फार्मसी महाविद्यालय तर अत्यंत खर्चीक. त्यामुळे ते सरकारी मदतीशिवाय चालविणे म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखेच. पण रवींनी हे शिवधनुष्य पेलून या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या युवकांना एक चांगली संधी प्राप्त करून दिली. आज या महाविद्यालयातून पदवी प्राप्त केलेले युवक गोव्याच्या फार्मसी क्षेत्रात तळपताना दिसत आहेत.
फर्मागुढी-फोंडा येथे जो ‘शैक्षणिक हब’ झाला आहे, त्याचे संपूर्ण श्रेय रवींना जाते. कामात कितीही व्यस्त असले तरी ते महाविद्यालयांच्या कामात रस घ्यायचेच. स्वतः जातीने फिरून महाविद्यालय व सभोवतालच्या परिसराचा आढावा घ्यायचे. राज्याचे गृहमंत्री असताना अतिशय व्यस्त असूनसुद्धा ते ‘पीईएस’च्या आपल्या कार्यालयात जाऊन संबंधित फाईल्स हातावेगळ्या करत असत. आपल्या कारकिर्दीत त्यांनी या शैक्षणिक संस्थेला गोव्यातील एक आघाडीचे संस्था बनविली. सध्या या संस्थेचा कारभार २१ इमारतींतून चालतो. हजारो विद्यार्थी या शिक्षण संस्थांतून शिक्षण घेत आहे. विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, माजी मंत्री तथा प्रियोळचे आमदार गोविंद गावडे हे याच संस्थेचे विद्यार्थी.
शेकडो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या संस्थेच्या महाविद्यालयात काम करताना दिसतात. रवी सीताराम नाईक उच्च माध्यमिक विद्यालय, रवी सीताराम नाईक कला व विज्ञान महाविद्यालय, राजाराम बांदेकर फार्मसी महाविद्यालय, पीईएस बीएड महाविद्यालय आणि पोस्ट ग्रॅज्युएट आस्थापन ही पाच आस्थापने तसेच टाटाच्या सौजन्याने मॅनेजमेंटचे प्रशिक्षण देणारे आस्थापन ताठ मानेने उभी राहिलेली दिसतात. रवींचे कर्तृत्व त्यातून दिसून येते. म्हणून गोव्याचे शैक्षणिक क्षेत्र रवींचे कायम ऋणी राहील यात शंकाच नाही.
त्यावर रवींनी ‘मी राजकारणात कधीही समाज आणत नाही. मी फोंड्याचा आमदार आहे. माझे मतदार मला सोडायला तयार नाहीत. त्यामुळे मला रिंगणातून माघार घ्यावी लागली’ असे शांतपणे सांगितले. त्यामुळे केसरकारांना शेवटी ‘सॉरी’ म्हणावे लागले. आज रवींच्या अंत्यदर्शनाला भंडारी समाजातील लोकांनी मोठी गर्दी केली होती. ‘आम्ही पोरके झालो’ ही त्यांनी व्यक्त केलेली व्यथा बरेच काही सांगून गेली.
समाजात अनेक नेते असूनही भंडारी समाज प्रामाणिकपणे बांधील राहिला तो रवी यांच्याशीच. पण म्हणून त्यांनी आपणच भंडारी समाजाचा नेता असा दावा कधीच केला नाही. समाजाचे हित जोपासले हेही तेवढेच खरे. हे हित जोपासताना त्यांनी इतर समाजांवरही अन्याय होऊ दिला नाही, हे विशेष.
मला आठवते, २००४ साली रवी कोकणच्या दौऱ्यावर असताना आम्ही सावंतवाडीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात गेलो होतो. तेथे त्यावेळी उपस्थित असलेले सावंतवाडी नगरपरिषदेचे अध्यक्ष दीपक केसरकर (नंतर ते मंत्री बनले) यांनी रवींना पाहताच ‘तुम्ही राजकारणात समाज आणता म्हणून श्रीपाद नाईक यांच्याविरोधात उत्तर गोव्यातून निवडणूक लढवली नाही’ असा आरोप केला. त्यावेळी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसतर्फे रवी निवडणूक लढविणार होते. पण काही कारणास्तव ते शक्य झाले नाही. त्यामुळे संतप्त बनलेले केसरकर असे आरोप करत होते.
भंडारी समाजाचा दीपस्तंभ
गोव्यातील सर्वांत मोठा समाज म्हणजे भंडारी समाज होय. पण मोठा असूनही थोडासा दिशाहीन वाटणाऱ्या या समाजाला खरी दिशा दिली ती रवी नाईक यांनी. मुख्यमंत्री असताना त्यांनी इतर मागासवर्गीयांना (त्यात भंडारी समाजही आला) अनेक सवलती उपलब्ध करून दिल्या.
गोव्याचे मुख्यमंत्री बनलेले रवी नाईक हे भंडारी समाजातील एकमेव नेते. आजसुद्धा गोव्यातील भंडारी समाज रवींनाच आपला नेता मानतो. परवा हरवळे येथे झालेल्या भंडारी समाजाच्या मेळाव्यात त्याचा प्रत्यय आला. समाजातील अनेक नेते सल्लामसलत करायला रवींना भेटायला फोंड्यात यायचे. एकत्र येऊन विधायक उपक्रम राबवा, असा सल्ला ते भंडारी बांधवांना देत असत. सध्या समाजात सुरू असलेली गटबाजी त्यांना पसंत नव्हती.
राजकीय कारकीर्द
l १९६७ : राजकीय कारकिर्दीस प्रारंभ (जनमत कौलात सक्रिय सहभाग)
l १९७५ : महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या युवा शाखेत प्रवेश
l १९७६ : फोंडा नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवड
l १९८० : महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नेमणूक
l १९८४ : गोवा, दमण आणि दीवच्या सहाव्या विधानसभेत फोंडा
मतदारसंघातून प्रथम बनले आमदार
l १९८९ : गोवा घटकराज्याच्या पहिल्या विधानसभेत मडकईतून बनले आमदार
l १९९० (मार्च ते डिसेंबर) : प्रथमच कृषी, पशुपालन आणि पशुसंवर्धन,
माहिती व प्रसिद्धी खात्याचे मंत्रिपद
l २५ जानेवारी १९९१ ते १८ मे १९९३ : प्रथम मुख्यमंत्रिपदी नेमणूक
l २ एप्रिल १९९४ ते ८ एप्रिल १९९४ : दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी निवड
l १९९८ : उत्तर गोव्यातून लोकसभा निवडणूक जिंकून बनले खासदार
l जून १९९९ : विधानसभा निवडणुकीत फोंड्यातून दुसऱ्यांदा विजयी
l ९ जून १९९९ ते २४ नोव्हेंबर १९९९ : सार्वजनिक बांधकाम, गृहनिर्माण,
विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्यांचे मंत्री
l २९ नोव्हेंबर १९९९ ते २० ऑक्टोबर २००० : विरोधी पक्षनेते
l २४ ऑक्टोबर २००० ते २७ फेब्रुवारी २००२ : उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम, पशुपालन आणि पशुसंवर्धन, महिला आणि बालकल्याण
खात्यांचा पाहिला कारभार
l जून २००२ : फोंड्यातून तिसऱ्यांदा आमदार
l २००४ ते २००७ : प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष
l ७ जून २००७ : फोंड्यातून चौथ्यांदा आमदार म्हणून विजयी
l २०१२ : विधानसभा निवडणुकीत फोंडा मतदारसंघातून पराभव
l २०१७ : फोंड्यातून पाचव्यांदा आमदार (२०१९ मध्ये दहा आमदार फुटल्यानंतरही काँग्रेससोबत राहिले)
l ८ डिसेंबर २०२१ : काँग्रेसचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश
l २०२२ : विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारीवर फोंड्यातून
सहाव्यांदा आमदार
l २८ मार्च २०२२ : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळात स्थान
(कृषी, नागरीपुरवठा खात्यांचा कारभार)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.