Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; तवडकरांची घोडेस्वारी!

Khari Kujbuj Political Satire: इफ्फीच्या आयोजनासाठी मडगाव येथील रवींद्र भवनचे नूतनीकरण हाती घेण्यात येणार असल्याने सुमारे दोन महिने हे भवन कार्यक्रमासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

Sameer Panditrao

तवडकरांची घोडेस्वारी!

विधानसभेचे सभापती रमेश तवडकर नेहमीच चर्चेत असतात. मध्यंतरी मुख्यमंत्रिपदासाठी त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आणि तवडकर यांचा बोलबाला राज्यभरात झाला. श्रमधाम संकल्पनेने काणकोण मतदारसंघाची सीमा ओलांडली आणि तवडकरांच्या लोकप्रियतेची प्रचिती सर्वांना आली. त्यातून राजकीय वादही ओढवून घेतला. सध्या तवडकर काय करतात, असा प्रश्‍न पडू शकतो. त्यांनीच त्याचे उत्तर बोलकेपणाने िदले आहे. घोडेस्वारी करणारे रमेश तवडकर समाजमाध्यमावर िदसले आहेत. त्यांनीच ते छायाचित्र अपलोड केेले आहे, ते म्हणतात, घोड्यावर बसल्यानंतरचा एक शांत आणि चिंतनशील क्षण. प्रत्येक नवा अनुभव जीवनाकडे बघण्याचा नवा दृष्टीकोन प्रदान करतो. त्यांचे हे सांगणे कोणाला असेल बरे? ∙∙∙

रवींद्र भवनचाही ताज महाल?

इफ्फीच्या आयोजनासाठी मडगाव येथील रवींद्र भवनचे नूतनीकरण हाती घेण्यात येणार असल्याने सुमारे दोन महिने हे भवन कार्यक्रमासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. अलीकडेच अशा प्रकारे कला अकादमी वास्तूची दुरुस्ती हाती घेतली होती आणि त्या दुरुस्ती नंतर त्या वास्तूची काय हालत झाली, हे सगळेच पाहत आहेत. त्यामुळे रवींद्र भवनचीही तशीच गत होणार नाही ना, अशी शंका गोवा मनोरंजन सोसायटीचे माजी सदस्य विशाल काकोडे यांनी व्यक्त केली आहे. रवींद्र भवनाचे रक्षण देवच करो, अशी मागणी त्यांनी केली आहे. आता दामबाबांच्या थळात नवीन ताज महाल उभा झाला नाही, म्हणजे मिळवली. ∙∙∙

प्राध्यापकाचे प्रताप; चौकशी होणार?

काही दिवसांपूर्वी मयेच्या तंत्रनिकेतन महाविद्यालयात भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी स्थितीचा आढावा घेतला होता. यावेळी मुख्यमंत्र्यानी तिथल्या गैरव्यवस्थापनावर वरिष्ठांची चांगलीच कानउघाडणी केली होती. एवढे असूनही मये तंत्रनिकेतनचा कारभार सुधारण्याची चिन्हे दिसत नाहीत. आता तर चक्क एक वरिष्ठ पातळीवरील प्राध्यापक महाविद्यालयात आपल्या कॅबीनमध्ये संगणकावर ''ब्ल्यू फिल्म'' पाहत असल्याचे उघड झाले आहे. त्याचे झाले असे की, सरकारी संगणकावर सरकारी आयपी ॲड्रेस वापरून हे प्रताप सुरू असल्याने त्यासंबंधीचा एक मेल त्याला आला आणि त्याची भंबेरी उडाली. त्याने म्हणे आता यावर उपाय म्हणून तो संगणक काढून लॅब रूममध्ये बसवला. जेणेकरून चौकशी झालीच तर ते मुलांवर ढकलता येईल. मात्र, त्याला हे माहीत नाही की, जरी संगणक बदलला तरी आयपी ॲड्रेस तोच असतो. त्याचे कृत्य तो लपवू शकत नाही. मात्र महत्वाचा प्रश्न हा आहे की या सर्व प्रकरणाची खाते चौकशी करणार का? ∙∙∙

....तू रडल्यासारखं कर!

लईराई देवीच्या जत्रोत्सवावेळच्या चेंगरीचेंगरीचा अहवाल मुख्यमंत्र्यांनी उघड केला. मात्र ठोस कारवाईबाबत त्यात काहीच नाही. कारणेदाखवा नोटीस बजावून त्यावर सारवासारव केली, अशीच चर्चा सुरू आहे. ज्या अधिकाऱ्यांना या नोटिसा बजावल्या आहेत त्याचे उत्तर कोणाकडे द्यायचे व त्यावर कोण निर्णय घेणार, याचे स्पष्टीकरण दिलेले नाही. मुख्य सचिव के. कांडावेलू यांना एका कार्यक्रमावेळी विचारणा केली असता तेही उत्तर देताना गडबडून गेले. तपास अधिकाऱ्यांकडे ही उत्तरे द्यावी लागतील, असे ते बोलून गेले. मात्र त्यातील काही अधिकारी हे तपास अधिकाऱ्याचे वरिष्ठ अधिकारी आहेत. त्यामुळे ते शक्य होईल, असे विचारताच त्यांनी काढता पाय घेतला. यापूर्वीही अधिकाऱ्यांना नोटिसा बजावायच्या व कालांतराने या अधिकाऱ्यांची पुन्हा त्यांच्या जागी वर्णी लावायची हे नित्याचेच झाले आहे. अधिकाऱ्यांना त्यांच्या जागेवरून हटवले, मात्र त्या जागी इतरांची वर्णी लावण्यात आलेली नाही. त्यामुळे या जागा पुन्हा त्यांच्यासाठीच राखीव ठेवलेल्या आहेत का, असा प्रश्‍न पडतो. ‘मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर’ असाच हा डावपेच असावा, असे बोलले जातेय. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire

‘शंखनाद’ला ‘आधार’ सक्ती

फर्मागुढी - फोंड्यात शंखनाद महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या शनिवारी या मेळाव्याला प्रारंभ होणार असून राज्यात यापूर्वी असा मेळावा झाला नाही, त्यासाठी भव्य दिव्य असे आयोजन करण्यात येत आहे. फर्मागुढीचा विस्तीर्ण पठार त्यासाठी वापरात येणार आहे. या मेळाव्यात सहभागींना आधारकार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. बऱ्याच जणांनी या आधारकार्ड सक्तीबद्दल भुवया उंचावल्या, पण सुरक्षिततेसाठी ते अनिवार्य असल्याचे आयोजकांनी सांगितले. तसे पाहिले तर आधारकार्डाची काही गरज नव्हती, पण सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये तणातणी सुरू असल्याने सुरक्षेच्यादृष्टीने आयोजकांनी हे पाऊल उचलले असावे, असा कयास व्यक्त करण्यात येत आहे. ∙∙∙

चोवीस तास पाणीपुरवठ्याचे लक्ष्य

गोव्यात गेल्या अनेक वर्षांपासून चोवीस तास पाणीपुरवठा करण्याच्या घोषणा होत आहेत पण चोवीस तास सोडा ठरावीक वेळेत नियमीत पाणीपुरवठा काही होत नाही अशा तक्रारी लोकांकडून सतत होत आहेत. आता तर केंद्रीय मंत्री खट्टर हे गोव्यात आल्यावेळी त्यांनी गोव्यातील पाणीपुरवठा सुधारण्यासाठी केंद्र सरकारकडून ६५२ कोटी खर्च होणार असल्याचे जाहीर केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या, कारण पाणीपुरवठा सुधारण्यासाठी प्रचंड खर्च गेल्या काही वर्षांत खर्च झाला असला तरी सुधार मात्र काही होत नाही, असे म्हटले जाते. २०१५ मध्ये ‘जायका’ योजनेखाली असाच खर्च केला गेला होता व त्यावेळीही चोवीस तास पाणीपुरवठ्याच्या वल्गना झाल्या होत्या त्यामुळे तो खर्च केला गेलेला असतानाच आता सहाशे कोटीवर खर्च नेमका कोणत्या पध्दतीने होणार व त्या नंतर तरी मुबलक पाणीपुरवठा होणार का असे प्रश्न केले जात आहेत. ∙∙∙

५०० मीटर जाण्याचे भाडे २ हजार रुपये?

राज्यातील टॅक्सी चालक पर्यटकांना फसवतात अशी एक प्रतिमा गोव्यातील टॅक्सी चालकांची सोशल माध्यमांवर तर होतच असते. पण आता तर असा एक अनुभव चक्क मंत्र्यांसमोर हॉटेल मालकाने मांडला. मंगळवारी पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्या अध्यक्षतेखाली पर्यटन क्षेत्रातील विविध भागधारकांची बैठक झाली. बैठकीत एका हॉटेल मालकाने सांगितले की माझ्या हॉटेलमधून चक्क ५०० मीटर अंतरावर जाण्यासाठी टॅक्सीचालकाने २ हजार रुपये पर्यटकाकडे मागितले. त्यानंतर पर्यटकाने वाईट अनुभव असल्याचे आम्हाला सांगितले. आता हे ऐकून बैठकीतील काहींना धक्का बसला खरा. पण करणार काय, अशी परिस्थिती अधिकाऱ्यांची झाली. ∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT