
मराठीप्रेमी सध्या जोमात आहेत. राज्यात मराठीप्रेमींकडून निर्धार मेळावे घेण्याचे सत्र सुरू असून या मेळाव्यांना मिळणारी उपस्थिती लक्षणीय असल्याने पुढील काळात मराठीबाबतीत निश्चितच काही तरी चांगले घडेल, अशी अपेक्षा मराठीप्रेमी बाळगून आहेत. फोंड्यात दहा बारा दिवसांत मराठीचा निर्धार मेळावा होणार आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. फोंडा हा खरे म्हणजे मराठीचा बालेकिल्ला. फोंडा अर्थातच अंत्रुज महालात मराठीविषयक जेवढे उपक्रम, कार्यक्रम होतात, तेवढे इतर कोणत्याच भाषेतून होत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे फोंड्यातील निर्धार मेळाव्याला एक वेगळेच वलय प्राप्त झाले आहे, त्यातूनच मराठी राजभाषेचा घोष फोंड्यातून होणार असल्याने नक्कीच काही तरी चांगले घडेल, अशीच चर्चा सध्या सुरू आहे. ∙∙∙
मांडवीत म्हणे आता एक महाकाय सात मजली कॅसिनो जहाज दाखल होणार असून भविष्यात जर मांडवीत खनिजवाहू बार्जवाहतूक सुरू झाली तर तिला या बोटीचा अडथळा होऊ शकतो. एवढेच नव्हे तर अन्य कॅसिनो बोटींच्या व्यवस्थापनांनी याच धर्तीवर मोठ्या बोटी आणल्या तर भविष्यांत पणजीतून बेती -पर्वरी दिसणेही शक्य होणार नसल्याचे बोलले जाऊ लागले आहे. आताच मांडवीत इतक्या कॅसिनो बोटी तरंगत आहेत, की गोव्यात कॅसिनोचा बाजार फुलल्याचे चित्र आहे. एकेकाळी सत्ताधारी भाजप विरोधी पक्षात होता व त्यावेळी त्याच्या नेत्यांनी कॅसिनोविरोधात तीव्र आंदोलन छेडले होते. पण आता हाच भाजप कॅसिनोंचे समर्थन करत आहे. प्रत्यक्षात कॅसिनोची ही किड आणली ती त्यावेळी सत्तेत असलेल्या कॉंग्रेसने पण आता तो पक्ष त्याला विरोध करत आहे, तर त्यावेळी विरोधात असलेला भाजप त्याला परवाने देत सुटला आहे. यावरून सर्व राजकीय पक्ष व त्यांचे नेते हे एकाच माळेचे मणी असल्याचे मात्र लोकांना वाटू लागलेय. ∙∙∙
केंद्रीय उर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी गाेव्यात अणुऊर्जा प्रकल्प स्थापन करण्याची घोषणा केल्यानंतर सध्या ताे चर्चेचा विषय बनला आहे. गोवा ही भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी स्वत:चे प्रयोग करण्यासाठी एक प्रयाेगशाळा असल्याचे समजू नये, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी लगेच दिला. आता खट्टर यांनी घोषणा केली म्हणून गोव्यात अणूउर्जा प्रकल्प होणारच असल्यातली बाब नाही. पण खट्टर यांच्या या घाेषणेने काँग्रेस पक्षाला मात्र एकप्रकारे ऊर्जा दिली, असे म्हणायला काहीच हरकत नाही. ∙∙∙
मेरशी व पर्वरी येथील वाहतूक सिग्नल बसवले आहेत. या ठिकाणी फक्त लाल व हिरवा सिग्नलच चालतो, लाल व हिरवा सिग्नल यामधील सावधानतेचा इशारा देणाऱ्या पिवळ्या सिग्नलचा अभाव असल्याने अपघाताचा धोका या सिग्नलच्या ठिकाणी निर्माण झाला आहे. अधिक तर हे सिग्नल बंदच असतात व तेथे असलेले पोलिस हे एका ठिकाणी उभे राहून वाहनांवर नियंण ठेवण्याऐवजी बघ्याची भूमिका घेताना दिसतात. धारगळ येथे वाहने एकामेकाला मागोमाग धडकण्याचा जो प्रकार झाला, त्याचे कारण हेच असण्याची शक्यता नाकारता येत नाही. लाल व हिरवा सिग्नल यांच्यामधील पिवळा सिग्नल सुरू नसल्याने अचानक लाल सिग्नल पडल्यावर चालक करकचून ब्रेक मारतो व त्यामागून येणारी वाहने एकमेकाला धडकतात. पर्वरी येथेही पिवळा सिग्नल सुरूच नसल्याने लाल किंवा हिरवा सिग्नल पडल्यावर वाहन चालकांची बरीच तारांबळ उडते. या मार्गावरून मंत्री, आमदार तसेच अधिकारी जात असतात मात्र कोणालाही, या त्रुटी दिसत नाहीत याचे आश्चर्य वाटते. रस्ता सुरक्षा सप्ताह पाळले जातात. मात्र, जिथे अपघाताचा धोका आहे, अशा या सिग्नलच्या ठिकाणच्या त्रुटी सुधारणार कोण?. ∙∙∙
सांतआंद्रे मतदारसंघात सध्या एक वेगळ्याच विषय गाजत आहे. आजोशी – मंडूर आणि नेवरा या दोन्ही पंचायतीच्या अखत्यारीतील लोकांची व्यथा कोणाच्या कानावर पडत नाही, असे दिसते. आजोशी ते नेवरा दरम्यानच्या रस्ता अर्धा हॉटमिक्स केल्याने हा अपघातांसाठी कारणीभूत ठरत आहे. हा विषय नेवरा ग्रामसभेत आला, तेव्हा आमदार वीरेश बोरकर उपस्थित होते. हा रस्ता नवीन जलवाहिनी घातल्यानंतर पूर्ण केला जाईल, असे त्यांनी सांगितले. हल्लीच आजोशी-मंडूर ग्रामसभेतही हा प्रश्न पुन्हा एकदा आला. त्यावेळी सरपंच प्रशांत नाईक यांनी उत्तराची पुनरावृत्ती केली. त्याला जोडून प्रशांतबाबांनी आपण सार्वजनिक बांधकाम खात्याला रस्ता पूर्ण करण्याबद्दल पत्र लिहिल्याचे सांगितले. परंतु त्यावेळी त्यांची निराशा दिसली. आता मे महिना अर्धा होत आल्याने रस्ता पावसापूर्वी होईल याची शक्यता कमीच वाटते. जलवाहिनीचे काम होईल आणि नंतर रस्ता केला जाईल हे देखील लांबणीवर पडणार असल्याचे दिसते, कारण वर्षाच्या अखेरीस जिल्हा पंचायत निवडणूक आहे. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रस्ता केला जाईल. मात्र, तोपर्यंत लोक ‘भगवान भरोसे’ अशी चर्चा सांतआंद्रेतून ऐकू येते. ∙∙∙
राजधानी पणजीतील स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत कामे व रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची मुदत मे अखेरीपर्यंत आहे. त्यासाठी होत असलेली कामे घिसाडघाईने सुरू आहेत. रात्रीच्यावेळी ज्या ठिकाणी खोदकामांची कामे पूर्ण झाली आहेत तेथे रस्त्यांवर डांबरीकरणाचे जाड थर टाकण्यात येत आहेत. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसून येत आहे व त्यावर देखरेख ठेवण्यासाठी कंत्राटदाराच्या कामगारांव्यतिरिक्त कोणी अधिकारी नसतो. उच्च न्यायालयात नोडल अधिकाऱ्यांनी ही कामे मे अखेरीस पूर्ण करण्याचे हमीपत्र सादर केले आहे. न्यायालयाने यापुढे मुदतवाढ मिळणार नाही, असे ठणकावून सांगितले आहे. त्यामुळे ही कामे कोणत्याही परिस्थितीत दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्यावाचून पर्याय नाही. हे डांबरीकरण पहिल्या पावसातच वाहून जाईल की काय, तसेच पणजीत पूरस्थिती उद्भवणार तर नाही ना, असा संशय व्यक्त होत आहे. पदपथापेक्षा डांबरीकरणामुळे रस्त्यांची उंची अधिक आहे. या कामाबाबत स्थानिक आमदार व महापौरांनी तर दुर्लक्षच केले आहे. त्यामुळे या ‘स्मार्ट’ कामांवर देखरेख ठेवणार कोण?. ∙∙∙
केंद्रीयमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी सोमवारी मंत्रालयात पत्रकार परिषद का घेतली नाही, याविषयी चौकशी केली असता धक्कादायक माहिती हाती आली आहे. नगर विकास खात्यांतर्गत स्मार्ट सिटी प्रकल्पाचे काम येते. त्यावरून खट्टर यांना पत्रकारांच्या तिखट प्रश्नांना सामोरे जावे लागू शकले असते. त्यामुळे बैठकीत मांडण्यात आलेल्या चांगल्या चित्राचा बुरखा टराटरा फाडला गेला असता. त्याचा अंदाज आल्यानेच ऐनवेळी खट्टर हे पत्रकारांना मंत्रालयाच्या दारावरच संबोधित करतील आणि कोणत्याही प्रश्नाला उत्तर न देता निघून जातील, असे नियोजन करण्यात आले. खट्टर यांची पाठही ‘स्मार्ट सिटी’च्या बागुलबुवाने सोडली नाही म्हणायची. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.