पणजी : गोवा विधानसभेच्या सभापतीपदासाठी आज मंगळवारी निवडणूक झाली. यात भाजपच्या रमेश तवडकर यांची विधानसभा सभापतीपदी निवड झाली आहे. त्यांनी या निवडणुकीत काँग्रेसच्या आलेक्स सिक्वेरा यांचा 24 विरुद्ध 15 मतांनी पराभव केला आहे.
विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन आज मंगळवारपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात इतर कामकाज होणार नसले तरी सभापतींची निवड तसेच विश्वासदर्शक ठराव आणि अर्थसंकल्पाची मांडणी होणार आहे. सभापती पदासाठी काँग्रेसचे (Congress) आलेक्स सिक्वेरा आणि भाजपचे (BJP) रमेश तवडकर यांच्यात लढत झाली. भाजपकडे पुरेसे संख्याबळ असल्याने तवडकरांचे पारडे जड होते.
विधानसभेच्या पहिल्याच दिवशी 29 रोजी होत असलेल्या सभापती पदाच्या निवडणुकीसाठी भाजपने माजी मंत्री रमेश तवडकर यांना रिंगणात उतरवले होते. दुसरीकडे कॉंग्रेसनेही सभापतीपदाची निवडणूक लढवण्याचे ठरवत माजी मंत्री आलेक्स सिक्वेरा यांना उमेदवारी देऊ केली होती. त्यामुळे सभापती निवडणुकीत तवडकर विरुद्ध सिक्वेरा अशी थेट लढत पाहायला मिळाली.
सभापती पदासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि काणकोणचे आमदार रमेश तवडकर (Ramesh Tawadkar) यांचा उमेदवारी अर्ज भरला होता. त्यांच्या उमेदवारीसाठी अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी नाव सुचवले होते तर सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई यांनी त्यांना अनुमोदन दिले होते. त्यांच्याच नावाचा दुसरा अर्जही भरण्यात आला होता, ज्यात सुभाष शिरोडकर यांनी त्यांचे नाव सुचवले होतं, तर आलेक्स रेजिनाल्ड यांनी अनुमोदन दिले आहे. तवडकर यांचा तिसरा अर्ज भरण्यात आला होता ज्यात जेनिफर मोन्सेरात यांनी त्यांचे नाव सुचवले असून नीळकंठ हळर्णकर यांनी अनुमोदन दिले आहे. भाजपचे उमेदवार रमेश तवडकर हेच बहुमताने विजयी होतील, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.