Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: सभापतींचे ‘डिनर’

गोमन्तक डिजिटल टीम

सभापतींचे ‘डिनर’

सभापती रमेश तवडकर यांनी परवा शुक्रवारी दोना पावला येथील एका पंचतारांकित हॅाटेलमध्ये मंत्री व आमदारांसाठी ‘डिनर’ ठेवले होते. विधानसभा अधिवेशन झाले की असे ‘डिनर’ म्हणे ठेवले जाते. पण काहींनी सोमवारपासून श्रावण महिना सुरू होत असल्याने त्यापूर्वीच हे ‘डिनर ठेवले ते श्रावणात ‘नॉन व्हेज’ न खाणाऱ्यांची सोय व्हावी म्हणून ही व्यवस्था केल्याचा शोध लावला. पण ते काही असो विजय व हळदोणेचे कार्लुस वगळता अन्य बहुतेक विरोधी आमदारांनी या ‘डिनर’कडे न फिरकता एक वेगळा संदेश दिला आहे. आरजीचे विरेशबाबही म्हणे तेथे फिरकले नाहीत. विधानसभा अधिवेशनानंतर गोवा मंत्रिमंडळाची फेररचना होणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. काहींना या फेररचनेत रमेशरावांना मंत्रिपदच नव्हे, तर वजनदार खाते मिळणार असेही वाटते व त्यामुळे काहीजण या ‘डिनर’चा संबंध भावी घडामोडींशीही लावतात. खरे खोटे काय ते रमेशबाबच जाणोत. ∙∙∙

राजेशरावांना घरचा अहेर

कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांनी मतदारसंघातील फेरी सेवेवरून नदी परिवहन खात्याचे अधीक्षक विक्रम राजे भोन्सले यांच्यावर निशाणा साधला होता. विधानसभेत पुन्हा एकदा राजेशरावांनी हा विषय मांडून नाव न घेता खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांवर टीका केली. कुंभारजुवेत सहा फेरी जलमार्ग असून दिल्या जाणाऱ्या सेवेवर ताशेरे ओढले. खासकरून जुने गोवे - दिवाडी फेरी जलमार्गावरील फेरीबोटींच्या संख्येवरून नाराजी व्यक्त केली. राजेशरावांना वरिष्ठ सरकारी अधिकारी गांभीर्याने घेत नाही की काय अशी चर्चा सध्या कुंभारजुवेत ऐकू येत आहे. कारण नाराजी व्यक्त करून जवळपास एक महिना उलटला तरी काही सुधार झालेला नाही. एरवी आपण स्वखर्चाने कार्य करणाऱ्या राजेशरावांनी आता फेरीबोट देखील स्वखर्चाने आणून सेवेत रुजू करावी अशी चर्चा रंगली आहे.∙∙∙

चर्चिलांचा रोख कोणावर?

वार्केचे पात्रांव चर्चिलबाब गेले कित्येक महिने म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीपासून प्रसिद्धीच्या झोतापासून दूर होते. एरव्ही दर चार दिवसांनी वेगवेगळ्या राजकीय किंवा क्रीडा विषयांवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करून प्रसिद्धीत राहणारे चर्चिलबाब सध्या प्रसिद्धीच्या झोतात नसल्याने कित्येकांना आश्र्चर्य वाटले होते. काहींनी वेगवेगळ्या शंका पण उपस्थित केल्या होत्या. आता जरी ते थेट राजकारणात नसले, तरी त्यांची प्रतिक्रिया महत्त्वाची मानली जाते. शनिवारी अकस्मात चर्चिल बाबांनी पत्रकार परिषद बोलावली व सर्वांनाच आश्र्चर्याचा धक्का बसला. सुरवातीलाच त्यांनी सांगितले की, मी काही बोललो, एखादी प्रसिद्धी मिळवली तर ‘कांय जाणांक माल पोडटा, थोड्यांक मुरे उस्तोरें वेता, ते पासोत हांव चड प्रेस घेना’. आता कळले ना इतके महिने चर्चिलबाब प्रेसपासून दूर का होते ते. मात्र, ज्यांना ‘माल पोडटा, उस्तोरें वेता’ ते नेमके कोण? हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही. हा रोख नेमका कुणाच्या दिशेने होता, याबद्दलही त्यांनी एक शब्दसुद्धा उच्चारला नाही. सध्या याचा शोध वार्का, बाणावलीकरांनी सुरू केला आहे. ∙∙∙

टॉयलेट एक प्रेमकथा...

म्हापसा शहरात अलीकडे कुणीही येते अन् पालिकेला टपली मारून जाते! अशी स्थिती झाली आहे. काही दिवसांपूर्वीच अन्साभाटमधील पालिकेच्या मालकीचे व वापरात नसलेले सार्वजनिक शौचालय मोडण्यात आले. मात्र, अद्याप पालिकेने याप्रकरणी तक्रार किंवा कारवाईची हालचाल केलेली दिसत नाही. अशातच रविवारी पुन्हा एकदा खोर्ली येथील जीर्ण, पण काही प्रमाणात वापरात असलेले सार्वजनिक शौचालय मोडण्याचा प्रयत्न झाला. या शौचालयाचा काही भाग पाडला. मात्र, हा छुपा डाव स्थानिक नगरसेवकाने वेळीच हाणून पाडला. आता म्हापसा पालिका या प्रकरणात कुठली भूमिका घेते हे पाहावे लागेल. कारण दोन्ही शौचालये पालिकेच्या मालकीची. या दोन्ही प्रकारात दोन वेगवेगळ्या माजी नगराध्यक्षांचा हात आहे, असे बोलले जात आहे. अशावेळी पालिका या ‘टॉयलेट एक प्रेमकथा’विषयी कारवाई करते की पुन्हा याकडे डोळेझाक करते हे पाहावे लागेल. कारण पालिकेने अशा बेकायदा प्रकाराकडे प्रत्येकवेळी दुर्लक्ष केल्यास अनधिकृत कृत्यांना हे पाठबळ दिल्यासारखेच होईल, असे म्हापसेकर बोलू लागलेत. ∙∙∙

कणसाच्या फेस्ताची फक्त भाजपलाच आठवण

राय येथे साजरे होणारे कणसाचे फेस्त संपूर्ण गोव्यात प्रसिद्ध असून गोव्यातील काही प्रमुख फेस्तामध्ये त्याचा समावेश होतो. एरव्ही अशा पर्वणीच्यावेळी उत्साहाचा माहोल तयार करण्यासाठीही ठिकठिकाणी बॅनर लावले जातात. त्यात राजकारणी आघाडीवर असतात. मात्र, रायच्या आणि कुडतरीच्या राजकारण्यांना त्याचा विसर पडला की काय असे वाटावे अशी या फेस्ताच्या कालच्या पूर्वसंध्येला वातावरण होते. कुणीच राजकारण्यांनी आपले शुभेच्छा बॅनर लावले नव्हते. अपवाद फक्त भाजपचा. भाजपच्या एसटी मोर्चाचे उपाध्यक्ष अँथनी बार्बोजा यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांचे फोटो असलेले शुभेच्छा बॅनर लावून आपल्यापरीने माहोल तयार केला होता. भाजप कुडतरी मतदारसंघाकडे भलतेच गांभीर्याने पाहात तर नाही ना? ∙∙∙

दक्षिण गोवा जिल्हाध्यक्षपदी कोण?

पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्याप्रमाणे दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर यांनी राजीनामा तर दिलाच आहे, पण आता पुढील एक वर्ष पाच महिन्यांच्या कार्यकाळासाठी अध्यक्षपदी कोण? अशी चर्चा जिल्हा पंचायतीच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष महिलांसाठी आरक्षित असल्याने महिलाच अध्यक्ष होणार हे नक्की, पण कोण? सध्या २५ सदस्यांच्या या जिल्हा पंचायतीत १४ भाजपचे, ३ मगोचे सदस्य आहेत. त्यामुळे भाजपमधीलच अध्यक्ष होतील हेसुद्धा नक्की. मॉविन गुदिन्हो हे पंचायतमंत्री आहेत. त्यामुळे ते आपल्या जवळच्या कार्यकर्त्याचीच वर्णी लावणार हेही नक्की आहे. निवडणूक झाल्याबरोबर त्यांना आपल्या या जवळच्या कार्यकर्त्याची अध्यक्षपदी वर्णी लावता आली नव्हती. आता ती संधी त्यांना चालून आली आहे. त्यामुळे अनिता थोरात यांचे नाव चर्चेत आहे. कदाचित आपल्या मर्जीतील व्यक्तीला अध्यक्षपदी आणण्यासाठी सुवर्णाबाईंना राजीनामा तर द्यायला लावला नसेल ना? अशीही चर्चा होऊ लागली आहे. ∙∙∙

सिद्धेशरावांची महत्त्वाकांक्षा

केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांचे पुत्र तथा कुंभारजुवेचे जिल्हा पंचायत सदस्य सिद्धेश नाईक यांनी उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर प्रश्नांना उत्तर देताना सिद्धेशरावांनी आमदार होण्याची महत्त्वाकांक्षा पुन्हा व्यक्त केली. बऱ्याच काळापासून सिद्धेशराव आमदारकीची स्वप्ने पहात आहेत, परंतु भाजपकडून त्यांना विधानसभा निवडणुकीत आत्तापर्यंत संधी दिलेली नाही. मुख्यमंत्री कोणीही असो प्रत्येकवेळी सिद्धेशरावांना तडजोड करावी लागती. २०१७ मध्ये पांडुरंग मडकईकर भाजपवासी झाले, २०२२ मध्ये त्यांची पत्नी जेनिता यांना उमेदवारी दिली. २०२२ मध्ये राजेश फळदेसाईंनी काँग्रेसमधून थेट भाजपात उडी घेतली. त्यामुळे २०२७ च्या निवडणुकीत देखील सिद्धेशरावांना भाजपची उमेदवारी मिळणार याची शक्यता कमीच असून ते आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचे प्रयत्न करणार की नाही, हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

जैवविविधता समिती नावापुरती

नेवरा येथे डोंगर कापणी करून जमीन रूपांतरण केल्याचा विषय ग्रामसभेत मांडला गेल्यानंतर लोकांना धक्का बसला. गावात एवढी मोठी बाब घडते आणि कोणाला थांगपत्ता नाही, परंतु याची नोंद गावाच्या जैवविविधता व्यवस्थापन समितीने ठेवण्याची गरज होती. ही समिती गठीत करण्यामागचा उद्देश जैवविविधतेचे संरक्षण करणे आहे. मात्र, समिती केवळ नावापुरती असल्याचे दिसते. कारण नेवरा येथे खाजन शेती पाण्याखाली बुडवली गेली, कोमुनिदाद जमिनींचा वाद सुरू आहे आणि आता जमीन रूपांतरणाचा विषय ग्रामसभेत आला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आमदार वीरेश बोरकर या समितीवर असून त्यांनी देखील याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते अशी चर्चा रंगली आहे.∙∙∙

‘चेल्या’साठी आमदाराचा हट्ट

सरकारातील काही कामगारवर्ग अकार्यक्षम करण्यात लोकप्रतिनिधी कारणीभूत आहेत, हे काही लपून राहिले नाही. राज्य लहान असल्याने कोणाचे तरी कोणा आमदार - मंत्र्यांबरोबर किंवा त्यांच्या जवळच्या नेत्यांबरोबर संबंध येतो. त्यांच्यामार्फत सरकारी नोकरीमध्ये असणारा वर्ग आपणास हव्या त्या ठिकाणी बदली करून घेण्यात माहीर असतो. तिसवाडीतील एका मतदारसंघातील कर्मचाऱ्याला सरकारी जावई करण्यासाठी सत्ताधारी आमदाराचा खटाटोप सुरू आहे. या आमदाराचा तो कर्मचारी म्हणे ‘चेला’ आहे. त्यासाठी त्याला काम न लावता हजेरीवर सही करावी आणि त्याला सुशेगादपणा द्यावा, असा व्होरा आमदाराचा आहे. परंतु ज्या अधिकाऱ्याकडे हा आमदार पाठपुरावा करीत आहे, तो काही ती मागणी मंजूर करीत नाही. त्यामुळे आमदार या अधिकाऱ्याला हटवा, अशी अधूनमधून हाकाटी मारीत असतो. अशा प्रकरणांतून काय तो अर्थ काढायचा तो तुम्हीच काढा..!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

Indian Super League: FC Goa च्या कामगिरीवर प्रशिक्षक मार्केझ भडकले; जमशेदपूर विरोधात पराभवाचे कारणही केले स्पष्ट

Eco Green Cement: 'इको ग्रीन सिमेंट' ठरणार बांधकाम क्षेत्रासाठी वरदान; विद्यार्थ्यांचा क्रांतिकारक प्रकल्प

SCROLL FOR NEXT