खरी कुजबुज: मुख्‍यमंत्र्यांना प्रेमाचे भरते?

Khari Kujbuj Political Satire: गोवा राज्याचा तिसरा जिल्ह्याच्या निर्मितीची प्रक्रिया अखेर सुरू करण्यात आली आहे
Khari Kujbuj Political Satire: गोवा राज्याचा तिसरा जिल्ह्याच्या निर्मितीची प्रक्रिया अखेर सुरू करण्यात आली आहे
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

मुख्‍यमंत्र्यांना प्रेमाचे भरते?

काही वर्षांपूर्वी कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांचे मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांच्‍याशी घनिष्‍ठ संबंध असल्‍याचे जाणवत नव्‍हते. कुडचडेच्‍या कार्यक्रमांनाही मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत फारसे दिसत नव्‍हते. या दोन्‍ही नेत्‍यांमध्‍ये वातावरण काहीसे हमरीतुमरीचे असल्‍याचे त्‍यावेळी सांगण्‍यात येत होते, पण मागच्‍या पाच-सहा महिन्‍यांत हे चित्र पूर्णतः बदलल्‍याचे दिसते. मागच्‍या अडीच वर्षांत मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत जेवढे कुडचडेला आले नव्‍हते, त्‍याहीपेक्षा अधिक वेळा मागच्‍या पाच-सहा महिन्‍यांत मुख्‍यमंत्री कुडचडेत येत असून कुडचडेतील प्रत्‍येक कार्यक्रमांना काब्राल मुख्‍यमंत्र्यांना आवर्जून आमंत्रण देत असल्‍याचे दिसून आले आहे. एवढेच नव्‍हे, तर सध्‍या चालू असलेल्‍या विधानसभा अधिवेशनात विधानसभेचे कामकाज पाहण्‍यासाठी कुडचडेतील विद्यार्थी आणि भाजपचे पदाधिकारी येतात, त्‍यावेळी काब्राल मुख्‍यमंत्र्यांना बरोबर घेऊन आवर्जून त्‍यांच्‍याबरोबर फोटो काढताना दिसतात. काब्राल यांना मुख्‍यमंत्री प्रेमाचे हे भरते मागच्‍या पाच-सहा महिन्‍यांत का बरे आले असावे? यामागे आणखी काही लपले आहे का? ∙∙∙

तिसऱ्या जिल्ह्याचे श्रेय रवींनाच....

गोवा राज्याचा तिसरा जिल्ह्याच्या निर्मितीची प्रक्रिया अखेर सुरू करण्यात आली आहे. एका अर्थाने हा फोंड्याचे आमदार तथा राज्याचे कृषिमंत्री रवी नाईक यांच्या विचारांचा विजय असल्याच्या प्रतिक्रिया फोंडा तसेच लगतच्या भागात व्यक्त करण्यात येत आहे. कारण गेली अनेक वर्षे रवी नाईक यांनी हा विषय लावून धरला होता. गेल्या निवडणुकीत तर रवी नाईक यांनी हाच मुद्दा उपस्थित करून लोकांना होणाऱ्या अडचणींवर तिसरा जिल्हा आणि त्याचे मुख्यालय अर्थातच फोंडा शहरात असावे असा आग्रह धरला होता. मागच्या विधानसभेत या विषयावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी भाष्य केले नव्हते, पण आता रवींच्या आग्रहामुळे अखेर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या विषयाला चालना दिल्याने अखेर फोंडा तसेच लगतच्या धारबांदोडा व इतर भागातील लोकांना ‘अच्छे दिन’ निश्‍चितच येतील. कारण पणजी किंवा मडगावला जाण्याचे हेलपाटे थांबतील आणि त्यात वाया जाणारा पैसा आणि वेळही वाचेल अशाच प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. अखेर सरकारची गाडी रुळावर आली म्हणायची. ∙∙∙

युरी समर्थकांत रस्सीखेच!

कुंकळ्ळी नगरपालिकेच्या निवडणुकीला दीड वर्षाचा अवधी राहिला असला, तरी काही इच्छुक आत्तापासूनच तयारीला लागले आहेत. आमदार युरी आलेमाव यांच्या आशीर्वादाने व समर्थनावर निवडणुकीत उतरण्यास अनेक युरी समर्थक सज्ज झाले आहेत. युरी गटातील विद्यमान नगरसेवक निष्क्रिय असल्याचा आरोप युरीचेच कार्यकर्ते समाज माध्यमांवर करायला लागले आहेत. आमदाराच्या बळावर निवडून आलेले विद्यमान नगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष व काही नगरसेवक जनतेची कामे करण्यास असमर्थ ठरल्याचा आरोप विरोधक नव्हे, तर युरी समर्थकच करायला लागले आहेत. पुढील पालिका निवडणुकीत युरींना बरीच कसरत करावी लागणार आहे हे निश्चित.

दिगंबर कामत यांचा काहींना ‘फोबिया’?

काहींना दिगंबर कामत यांचा फोबिया झालेला आहे. सकाळी उठल्याबरोबर त्यांना दिगंबर कामत दिसतात. त्यामुळे ते काही ना काही कुरापती काढत असतात, त्यातच त्यांचा आनंद असतो. गोव्यातील इतर भागातील रस्त्यांची दुर्दशा झालेली असताना मडगावमधील रस्ते मात्र चांगले आहेत. यंदा पाऊस एवढा मोठा पडलेला आहे, त्याने रस्त्यावर बारीक सारीक खड्डे पडणे स्वाभाविक आहे. तरीसुद्धा या खड्ड्यांचे फोटो काढून समाज माध्यमांवर हे लोक घालतात व नंतर कामत यांना दोष देतात. हे स्वतःच दिगंबर कामत सांगतात. पण दिगंबर कामत एकदा शब्द दिला की तो पाळतात हे त्यांना माहीत नसावे असेही ते सांगतात. पण खरोखरच मडगावमध्ये कामतांचा फोबिया झालेले लोक आहेत का? मग त्यांचा मडगावकरांवर परिणाम का होत नाही, कामत तर ९ वेळा याच मतदारसंघातून निवडून आले आहेत.

अखेर पांढरा हत्ती हटवला!

मिरामार येथील श्रीमंतांच्या शाळेशेजारील पदपूल अखेर महानगरपालिकेने हटविण्यास शुक्रवारपासून सुरवात केली आहे. महानगरपालिकेला हा दीड कोटींचा हत्ती पाडण्यासाठी स्वतःचे पैसे खर्च करावे लागले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या पदपुलाला विरोध केला होता. तरीही त्यावेळी बाबूश मोन्सेरात यांनी तो पूल महानगरपालिकेच्या तिजोरीतून खर्च करून २०१२ मध्ये उभारला. या पुलाचा वापर ज्या उद्देशासाठी व्हायला हवा होता, तो उद्देश बाजूलाच राहिला. गोवा वाहतूक पोलिस विभागाने महानगरपालिकेला २०१६ मध्ये तो पूल हटविण्याची विनंती केली होती. परंतु त्यानंतर बराच कालावधी गेला. महानगरपालिकेने फर्मागुढीच्या गोवा इंजिनिअरिंग महाविद्यालयाकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतले, त्यासाठीही महानगरपालिकेला पैसे मोजावे लागले. खऱ्या अर्थाने हा पूल महानगरपालिकेसाठी पांढरा हत्ती ठरला. विशेष बाब म्हणजे या पुलाचा रंगही आत्तापर्यंत पांढराच राहिला..! कोणताही विचार न करता महानगरपालिकेच्या तिजोरीवर भार टाकून उभारलेला हा निर्जीव हत्ती अखेर हटला.

...आणि ब्रॉडबँडवाले जागे झाले!

नाक दाबले की तोंड उघडते असे म्हणतात ते खरे. विधानसभा अधिवेशनात माहिती तंत्रज्ञान खात्याच्या चर्चेवेळी ब्रॉडबँड विषय बराच गाजला. विजय सरदेसाई यांनी ब्रॉडबँडने कसे ब्रॉड (विस्तृत) बँड वाजविले त्याची इत्थंभूत माहिती दिली. ब्रॉडबँडमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही झाला. राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांत व स्थानिक स्वराज्य संस्थांत ब्रॉडबँड सेवा बहाल केली होती. मात्र, एका वर्षानंतर ही सेवा ठप्प झाली होती. काल अचानक माहिती तंत्रज्ञान खात्याचे कर्मचारी शैक्षणिक संस्थांत भेट देऊन जीर्ण झालेल्या ब्रॉडबँडची चौकशी करायला आल्याचे पाहून शाळा प्रमुख चकीत झाले. शाळांनी स्वतःची खासगी केबल इंटरनेट सुविधा घेतली असून आयटीने शाळेत टांगलेले ते खोके घेऊन जावे असा सल्ला म्हणे शाळा प्रमुखांनी आयटीवाल्याना दिला. ब्रॉडबँड सेवा पुन्हा मात्र सुरू करू नका असा सल्लाही शाळा प्रमुखांनी दिला आहे.

वीस कलमीच्या नावाने वाट्टेल ते...

खरे तर वीस कलमी हा काँग्रेस पक्षाचा व विशेष करून इंदिरा गांधी यांनी राबविलेला कार्यक्रम. राज्यकर्त्यांच्या कर्मामुळे नंतर तो बदनाम झाला ही गोष्ट वेगळी. आता या कलमाखाली दिलेल्या जमिनीत अनधिकृत बांधकामे झाल्यास ती नियमित करण्यासाठी कायदा दुरुस्ती करण्याचे पिल्लू सरकारने सोडले आहे. सरकारने यापूर्वी बेकायदा व अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी अनेकदा कार्यक्रम राबविले, त्यातून किती घरे अधिकृत झाली त्याची आकडेवारी दिली जात नाही. तर मुद्दा आहे वीस कलमीचा. अशा घरांची व्याख्यासुध्दा मजेशीर आहे. ही घरे प्रत्यक्षात एका खोलीची हवीत, पण प्रत्यक्षात त्यावर मजले चढविलेले आढळतात. त्यातील काहींना गरीबाघरी वीज योजनेतून फुकट वीजपुरवठा केलेला आहे. तेथेसुध्दा एकच बल्ब सक्तीचा आहे, पण प्रत्यक्षात तपासणी केल्यास भलतेच चित्र आढळते असे वीज अधिकारीच सांगतात. आता मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केली आहे, त्यातून अशा घरांच्या जागी बंगले उभे राहिले नाहीत म्हणजे मिळवले असे संबंधित अधिकारीच म्हणू लागले आहेत.

Khari Kujbuj Political Satire: गोवा राज्याचा तिसरा जिल्ह्याच्या निर्मितीची प्रक्रिया अखेर सुरू करण्यात आली आहे
खरी कुजबुज: मंत्री मोन्सेरात ‘क्लिन बोल्ड’!

चर्चिल लिहितात पुस्तक!

लुईझिन फालेरो हे लेखक झाल्याने व त्यांची पुस्तके प्रकाशित झाल्याने आता त्यांच्या पायावर पाय ठेवून चर्चिल आलेमाव हेसुद्धा पुस्तक लिहीत आहेत. म्हणजे आता गोव्याचे दोन राजकारणी साहित्यिक होणार आहेत. चर्चिल कोकणी आंदोलनाबद्दल माहिती देणारे रोमी कोकणीत व इंग्रजीत पुस्तक लिहीत आहेत. हे चर्चिल आलेमाव यांनी स्वतः सांगितले. आपले योगदान लोकांना समजले पाहिजे. आपण गोंय आणि गोंयकारांसाठी जे केले ते आपण जिवंत असतानाच सर्वांना कळले पाहिजे त्यासाठी हा खटाटोप चालू आहे. राजकारण आपली आवड कधीच नव्हती व नाही. आपण एक चांगला जलतरणपटू आहेच, शिवाय मासे पकडणे आपला छंद होता व नंतर त्याचे रूपांतर व्यवसायात केले असे चर्चिल सांगतात. आता आपण साहित्यिकही आहे हे दाखविण्याचा चर्चिल यांचा हा प्रयत्न तर नाही ना!

Khari Kujbuj Political Satire: गोवा राज्याचा तिसरा जिल्ह्याच्या निर्मितीची प्रक्रिया अखेर सुरू करण्यात आली आहे
खरी कुजबुज: ‘फोरकास्ट’ अन् ढवळीकरांची ‘पॉवर’

पंतप्रधानांच्‍या कार्याला कॅप्‍टनकडून दुजोरा

गोव्‍यात एसटींना राजकीय आरक्षण देण्‍याऐवजी भाजपने या समाजाला झुलवत ठेवले असा आरोप काँग्रेस आमदार एल्‍टन डिकॉस्‍ता यांनी केल्‍यानंतर गोव्‍यात मोठा गहजब माजला होता. त्‍यावेळी एसटी मोर्चाचे उपाध्‍यक्ष अँथनी बार्बोझा यांनी एसटींना राजकीय आरक्षण देण्‍यासाठी संसदेने यापूर्वीच ठराव घेतला आहे याकडे एल्‍टन यांचे लक्ष वेधल्‍यानंतर भाजपचे हे एसटी प्रेम डोळ्‍यांना पाणी लावण्‍यापुरते असा प्रतिआरोप एल्‍टननी केला होता. मात्र, दोन दिवसांपूर्वी लोकसभेत बोलताना दक्षिण गोव्‍याचे खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी गोव्‍यातील एसटींना राजकीय आरक्षण द्या अशी मागणी करताना संसदेत घेतलेला ठराव पुढे नेण्‍यासाठी पावले उचला अशी मागणी केली. एका अर्थाने यासंबंधीचा ठराव केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला होता. यावर कॅप्‍टननी शिक्‍कामोर्तब केले असे म्‍हटल्‍यास ते वावगे ठरणार नाही. अँथनी बार्बोझा हेही त्‍यावेळी हेच म्‍हणत होते, पण एल्‍टन यांना ते पटले नव्‍हते. आता त्‍यांच्‍याच कॅप्‍टनने दुजोरा दिल्‍यानंतर एल्‍टन ही गोष्‍ट मान्‍य करणार का? हा प्रश्न आम्‍ही करत नाही, स्‍वत: अँथनीच करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com