माणूस कधी ही तृप्त होत नाही.कितीही मिळाले तरी माणसाची संतुष्टी होत नाही.काणकोणचे आमदार रमेश तवडकर सभापती पदावर समाधानी नव्हते. त्यांना मंत्रिपदाची हौस होती. मुख्यमंत्र्यांनी गोविंद गावडे यांना मंत्रिपदावरून काढून तवडकरांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ घातली. रमेश सरांना गोविंदाची सगळी खाती मिळालीच आणि ट्रायबल खातेही मिळाले. मात्र रमेशराव समाधानी नाहीत. आपल्याला मिळालेल्या खात्यात दम नसून आपण वेळ पडल्यास मंत्रिपद सोडू, असा इशारा म्हणे तवडकर यांनी पक्षाला दिला आहे. आपण सभापती म्हणून समाधानी आहे, आपल्याला मंत्रिपदाची हाव नाही, असे म्हणणारे तवडकर आता मंत्रिपदात दम नाही म्हणतात, याचा अर्थ काय? रमेश राव आपण एकदा पक्ष सोडून आपली ताकत अनुभवली आहे. आपणच काय पक्ष सोडलेल्या माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, इतरांचे झालेले राजकीय पतन आपण पाहिले नाही का, रमेशसर, असे आम्ही नव्हे जनता विचारीत आहे. ∙∙∙
कला अकादमीच्या ढिसाळ कारभारावर कधीकाळी ‘मीच जबाबदार’ असं छातीठोकपणे सांगणारे कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे आता मात्र अचानक ‘नरमले’ आहेत. आता ते म्हणतात की, ही जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्याची आहे. हे ‘शहाणपण’ आता कशासाठी सुचलं, यावर जोरदार चर्चा सुरू आहे. बहुधा त्यांना त्यांची खरी ‘पात्रता’ समजली असावी आणि त्यामुळेच हे असे बोलत असावेत, असं लोक उघडपणे बोलू लागले आहेत. ∙∙∙
विधानसभा संकुलात अनेक पदे भरावयाची आहेत. रमेश तवडकर विधानसभेचे अध्यक्ष असताना पदे भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. ती जवळजवळ पूर्ण होत असतानाच त्यांना मंत्रिपदी आणण्यात आले. परंतु अचानक असे काय घडले कोणास ठाऊक. तवडकरांच्या कारकिर्दीत निवड झालेल्या अनेक कर्मचाऱ्यांची नावेच नाहीशी झाली आहेत. नवा सभापती त्या पदावर येण्यापूर्वीच विधिमंडळातील रिक्त पदे भरण्याचे काम वेगाने सुरू आहे. सध्या प्रत्येकालाच सरकारी नोकरी हवी आहे. त्यामुळे सरकारवर नोकऱ्या निर्माण करण्यासाठी मोठा दबाव आहे. त्याचाच परिणाम म्हणून अनेक मंत्री एकमेकांवर कुरघोडी करीत आपली माणसे घुसवू लागली आहेत का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ∙∙∙
योग्य नियोजन न केल्यास हाती घेतलेले काम फसते, राज्यात सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी सुरू केली आहे. शालेय स्तरावर तिसरी, सहावी, नववी व दहावी इयत्तेपर्यंत ‘एनईपी’ अंमलात आणली आहे. मात्र, अजून ‘एनईपी’चा गोंधळ संपलेला नाही. दहावी इयत्तेसाठी
क्रीडा , कला, व्यावसायिक अभ्यासक्रम व आयडीए या विषयांच्या प्रश्न पत्रिका शालांत मंडळ काढणार? मंडळाने सुरू केलेल्या नव्या उत्तीर्ण पद्धतीचा फायदा होणार का? यावरुन संभ्रम आहे. गोवा शालांत मंडळ व ‘एनईपी’शी संबंधित समितीचा ताळमेळ पहायला मिळत नाही.त्यात भर म्हणून शिक्षक कार्यशाळेत शिक्षकांना वेगळीच माहिती देण्यात येते. शिक्षणातील या गोंधळाला लगाम बसणार का? ∙∙∙
पावसाळी अधिवेशनात उत्तम कामगिरी केलेले विरोधी पक्षनेते सध्या चर्चेत आहेत. राज्यातील लोकांकडून त्यांची स्तुती होत असतानाच, काँग्रेस पक्षातील नेतेही त्यांची प्रशंसा करताना दिसत आहेत. काँग्रेसमध्ये हे चित्र दुर्मीळ असल्याने लोकांचे लक्ष त्याकडे जात आहे. ‘व्होट चोर-गद्दी छोड’ चे नारे दिल्लीत देऊन आलेले खासदार विरियातो फर्नांडिस सध्या युरीबाब यांची प्रशंसा करताना ते २०२७ विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री होणार, असे ठामपणे सांगत आहेत. त्यांचा हा आत्मविश्वास सोमवारी महिला काँग्रेसच्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रमातही दिसून आला. लोकसभेच्या निवडणुकीत युरीबाब त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले, आता विरियातोही आपली जबाबदारी पाळत असल्याचेच बोलले जात आहे. ∙∙∙
सासष्टीतील काही पोलिस ठाण्यात आता नवे पीआय बदली होऊन येणार आहेत, अशी चर्चा सुरू आहे. काही साहेब या तालुक्यात बदलीसाठी देव पाण्यात बुडवून बसलेत. आपल्या राजकीय ‘गॉडफादर’च्या घरचे उंबरठे झिजवणे सुरू झाले आहे. या तालुक्यात अपवादात्मक पोलिस ठाणी वगळता तशी वरच्या कमाईची पोलिस ठाणे कमीच आहेत. जे बदली होऊन या तालुक्यात येऊ बघतात. त्यात हल्लीच बदली होऊन गेलेल्या एका सायबाचाही समावेश आहे. त्याला पुन्हा आपल्या पूर्वीच्या जागेवर यायचे आहे. त्यासाठी त्यांनी आता सत्ताधारी पक्षाकडील ‘कॉन्टॅक्ट’ वापरण्यास सुरुवात केली आहे. बघुया त्याचे प्रयत्न फळास लागतात का ते! ∙∙∙
पक्षाकडून प्रस्ताव आल्यास भाजपात प्रवेश करण्यास मी तयार असल्याचा पुनरुच्चार माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सोमवारी केला. गेल्या निवडणुकीवेळी भाजपापासून फारकत घेतली असली तरी आपला मूळ पिंड भाजपचाच असल्याचे त्यांनी मध्यंतरी म्हटले होते. सध्या पार्सेकर कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाहीत. मात्र, शापोरा नदीच्या पुलाखालून या मध्यंतरीच्या काळात बरेच पाणी वाहून गेले आहे. मांद्रेतून २०२७ मध्ये भाजपचे तिकिट मिळावे यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. त्यात पार्सेकर सरांचे नावही समोर येत आहे. आता पार्सेकरांनी भाजपात पुन्हा येण्याची इच्छा बोलून दाखवली तरी, पक्ष त्यांना पुन्हा पक्षात सामावून घेतात की नाही, हे आज ना उद्या समजेल. सध्या मूळ भाजपवाल्यांनी एकेकळीच्या कट्टर काँग्रेसवाल्यांना आपलेसे करून घेतले आहे. त्यामुळे पार्सेकर यांची ‘घरवापसी’ राजकीयदृष्ट्या कठीण नसावी, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे... ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.