Goa History Dainik Gomantak
गोवा

Goa History: गोव्याचे सुपुत्र 'रामचंद्रबाबांच्या' सूचनेवरून बाजीराव पेशव्यांनी मंदिरांना गावे इनाम दिली होती; अंत्रुजमहाल सनदीचा इतिहास

Goa Maratha Empire History: मराठा साम्राज्यातील राणोजी सिंधियाचे दिवाण व गोव्याचे सुपुत्र रामचंद्रबाबा हे पेशवेकालीन मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी म्हणून ओळखले जातात.

गोमन्तक डिजिटल टीम

सर्वेश बोरकर

मराठा साम्राज्यातील राणोजी सिंधियाचे दिवाण व गोव्याचे सुपुत्र रामचंद्रबाबा हे पेशवेकालीन मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी म्हणून ओळखले जातात. रामचंद्रबाबाचे संपूर्ण नाव रामचंद्र मल्हार सुखटणकर. या थोर मुत्सद्द्याचा जन्म गोव्यातील माशेल या गावात झाला. त्यांचे वडील व घराणे मूळचे कोकणातील आरवली गावचे कुळकर्णी.

कालमानानुसार नुसत्या कुळकर्णावर उदरनिर्वाह होईना म्हणून पुढे रामचंद्र मल्हार सुखटणकर कर्मभूमी सोडून साताऱ्यास आले जिथे त्यांना पुढे रामचंद्रबाबा ही पेशव्यांकडून आपुलकीची उपाधी मिळाली.

मराठा साम्राज्यातील त्यावेळेस बाळाजी विश्वनाथ हा त्यांचा पेशवा. साताऱ्यास कचेश्वरबाबा ओतुरकर हे पेशव्यांचे राजगुरू असल्याने फार प्रसिद्ध आसामी ज्यांनी रामचंद्रबाबास प्रथम आश्रय दिला.

रामचंद्रबाबा साताऱ्यास आल्यावर कचेश्वरबाबाने त्यास हाताशी धरून मुख्य प्रधान पेशवा बाळाजी विश्वनाथाने हळूहळू एकापेक्षा एक अधिक महत्त्वाची कामे सांगण्यास प्रारंभ केला. अनेक भरवशाची कामे व राज्यकारभाराचे महत्त्वाचे प्रश्न रामचंद्रबाबा कुशलतेने पार पाडू लागले. नानासाहेब पेशवा, सदाशिवराव पेशवा, रघुनाथराव पेशवा इत्यादी प्रसिद्ध पेशव्यांचे बालपणीचे शिक्षण रामचंद्रबाबाच्या देखरेखीखाली झाले.

पुढे बाळाजी बाजीरावाच्या पश्चात पेशवाईचा बोजा सहन करण्यास नानासाहेबांस जी हिंमत प्राप्त झाली होती, ती विशेषत: रामचंद्र बाबांच्या साहाय्यावर. शिंदे-होळकरांच्या पराक्रमाने मराठ्यांची सत्ता परमुलखात म्हणजे उत्तरेकडे हिंदुस्थानात दिवसेंदिवस वाढत चालली होती, त्यामुळे तिकडच्या प्रांताची व्यवस्था लावण्यास कोणातरी मुत्सद्याची जरुरी भासू लागली. यावेळी नानासाहेब पेशव्यांनी रामचंद्रबाबास राणोजी शिंद्याबरोबर पाठवले व राणोजी शिंद्याच्या अखेरीपर्यंत ते शिंद्यांकडे त्यांचे दिवाण व मुख्य कारभारी या नात्याने राहिले.

बाळाजी बाजीराव यांनी माळवा प्रांत काबीज केल्यावर पेशवा, शिंदे, होळकर आणि पवार या चौघांमध्ये माळव्याची समाधानकारक रीतीने वाटणी करण्याचे काम फार बिकट होते. ज्याच्या त्याच्या अधिकाराप्रमाणे व प्रांत हस्तगत करण्यात गाजविलेल्या पराक्रमाप्रमाणे त्या प्रांताची वाटणी होणे जरुरीचे होते. हे चौघेही फौजबंद सरदार असल्यामुळे एकानेही नाखूष होता कामा नये अशा प्रकारची वाटणी रामचंद्रबाबाने मोठ्या कुशलतेने केली व चौघेही सरदार खूष झाले.

ही वाटणी सन १७३४च्या सुमारास झाली. रामचंद्रबाबाने उत्तर हिंदुस्थानात कित्येक देवस्थाने व घाटही बांधले. शमसुद्दीन इल्तुतमिश हा दिल्ली सल्तनतमधील शम्सी घराण्याचा प्रमुख शासक होता. १२३४-३५ मध्ये इल्तुतमिशने उज्जैनवर चढाई करताना उज्जैनचा मंदिर परिसर नष्ट केला होता. ज्योतिर्लिंगाची नासधूस करण्यात आली होती. त्या ठिकाणी मशीद बांधण्यात आली होती, तिला वृद्ध किंवा जुना महाकाल असे म्हणतात.

आक्रमणादरम्यान चोरीला गेलेल्या ज्योतिर्लिंगाची जवळच्या ‘कोटितीर्थ कुंडा’मध्ये (मंदिराच्या शेजारी असलेला एक तलाव) टाकण्यात आल्याचे मानले जाते. नंतर पेशव्यांचा कारभारी रामचंद्रबाबा यांनी त्या जागेवर बांधलेली मशीद पाडून ज्योतिर्लिंगाचे व उज्जैनच्या मंदिराची पुनर्बांधणी आणि पुनरुज्जीवन केले. याशिवाय दानधर्मही अतोनात केला. कालांतराने सदाशिवरावांनी रामचंद्रबाबास आपला दिवाण नेमले. रामचंद्रबाबा यांनी काही तीर्थाटनेही केली. अशाच एका तीर्थाटने वेळी त्यांचे आगमन त्यांच्या जन्मगावी गोव्यात जाहले.

त्यावेळी मराठा साम्राज्यातील छत्रपतींच्या आदेशानुसार बाजीराव पेशव्यांनी १७३९मध्ये त्यांचे सरदार रामचंद्र मल्हार सुखटणकर, जे श्रीमंगेश यांचे अनुयायी होते, यांच्या सूचनेवरून मंगेशी गाव मंदिराला दान केले. मंगेशी येथे मंदिराची पुनर्बांधणी केल्यानंतर काही वर्षांनी, हे क्षेत्रदेखील १७६३मध्ये पोर्तुगिजांच्या ताब्यात गेले, परंतु आतापर्यंत, पोर्तुगिजांनी त्यांचा प्रारंभिक धार्मिक उत्साह गमावला होता आणि मराठ्यांकडून ते वारंवार पराभूत झाले होते. ते इतर धर्मांबद्दल खूप सहिष्णू बनले होते. त्यामुळे या मंदिराची रचना अस्पर्शित राहिली.

पुढीलप्रमाणे असलेल्या रामचंद्र मल्हार सुखटणकर यांच्या मोडी-मराठी सनदपत्रात त्यांनी गोवा येथील पोर्तुगीज राज्याचे सचिव लुईस अल्फोन्सो दंतास यांना कळवले आहे की अंत्रुज महालातील कवळे हे गाव शांतादुर्गा मंदिराला देण्यात आले आहे, तसेच म्हार्दोळ आणि मंगेशी ही गावे अनुक्रमे देवी म्हाळसा आणि देव श्रीमंगेश यांना इनाम म्हणून सनदा करून दिलेली आहेत. या पत्रात त्यांनी पोर्तुगीज राज्याचे सचिव लुईस अल्फोन्सो दंतास यांना विनंती केली आहे की त्यांनी व्हाईसरॉयला श्रीसप्तकोटेश्वर मंदिराला इनाम म्हणून देण्याची विनंती करावी. ही सनद पुढील प्रमाणे :

लुईस अफोंस दांतांस सेक्रेटरी, गोवा बंदर

शाहामत वजलादतपन्हा मुबाजस्त व येगानगत इंतीबाहा, बादज शौक मशहूद आंकी येतीमाद दौलत रामचंद्र मल्हार यांचे देवता अंतरुज येथे आहेत त्यास देवाची उदबत्ती व फुल वगैरे चालले पाहिजे सबब शाहामतपन्हा इकडील सदाशिव नाईक संस्थान सोंधे यांस सोगोन त॥ म ॥ र नीले पैकी इनाम

१ मौजे कवळे गाव बंरोबस्त शांतादुर्गा देवीस

२ मौजे पिरयोल पैकी वाडीया

१ वाडी म्हाडदल देव म्हालसा देवीस

१ वाडी मंगेश देव मांगिरीस

एकुण एक गाव दोन वाडया वगैरे नक्ष्त अडीचशे रुपये त॥ म ॥ र इनाम करून देवीले आहे व सरकाराहून सनदा सादर केल्या आहे त॥ म ॥ र नीलेच्यातर्फेने वाडीया व गावच्या कमावीसीस कमावीसदार जातील यांस उपसर्ग न करावा देवास उपद्रव न द्यावा तुमचा व सोंधेकरांचा कजीया आहे तुमचे लोक सोंधेकरांचे तालुकीयात धुमधाम करीतात तरी सदरहू गाव व वाडीया व देव व कमावीसदार यांस कोणे बाबे आशे बानदेत ते करावे श्री सप्तकोटेश्वर स्थल नार्वे हे देवस्थान कदीमुल आयामपासून आहे त्यास तुम्ही डिचोलीचे ठाणे घेतल्यापासून तव बेचिराख पडला देवालय मोडले देव तेथून निघाले सबब सरकाराहून नारवे गाव देवास इनाम दिल्हा असे तरीही तुम्ही अजम विजुरेयांस सांगोन सदरहू गावच्या सनदा देवाचे नाव इनाम करून इनाम पत्रे करून देऊन देवाची उर्जा चाले ते केले पाहिजे र॥ छ १८ शाबान ज्यादा काय लिहिणे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Deverakonda Accident: मोठी दुर्घटना टळली! विजय देवरकोंडाचा कार अपघात, अज्ञात वाहनाने मागून दिली जोरदार धडक VIDEO

IND vs WI: दुसऱ्या कसोटीत जडेजा रचणार इतिहास! कपिल देवच्या 'खास क्लब'मध्ये एंट्रीची नामी संधी; कराव्या लागणार फक्त 'इतक्या' धावा

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

SCROLL FOR NEXT