Goa News: व्यावसायिक वैमनस्यातून गेल्या आठवड्यात आगोंद येथे झालेल्या मारहाणीचे पडसाद रविवारी झालेल्या आगोंद ग्रामसभेत उमटले. यावेळी ग्रामसभेत आगोंद पंचायत क्षेत्रातील रहिवासी सोडून इतरांना आगोंद किनाऱ्यावर पर्यटन व्यवसाय करण्यास मज्जाव करण्याचा ठराव संमत करण्यात आला.
यासंदर्भात पंच नीलेश पागी यांनी घडलेल्या प्रकरणासंदर्भात आढावा घेत हा ठराव मांडला. स्थानिक संजू पागी व रमेश पागी यांनी त्या ठरावाला अनुमोदन दिले. आगोंद येथील जलसफरी व्यवसाय करणाऱ्या मत्स्य व्यावसायिकांनी वॉटर स्पोर्टस् ॲथॉरिटीकडून मान्यता घेऊन आगोंद येथे बोट असोसिएशनची स्थापना केली.
या असोसिएशनशी संलग्न असलेल्या बोटमालकांना आगोंद किनाऱ्यावर जलसफरी व अन्य पर्यटनाशी संबंधीत व्यवसाय करण्याची मुभा आहे. यासंदर्भात आगोंद पंचायतीने साळेरी येथील त्या पिता- पुत्रांना आगोंद किनाऱ्यावर आपला व्यवसाय बंद करण्यासंबंधी नोटीस पाठवली होती.
मात्र त्या नोटिसीला त्यांनी प्रतिसाद दिला नाही.आगोंदमधील सुमारे ऐंशी टक्के मत्स्यव्यवसाय, मत्स्यविक्री व जलसफरीचा व्यवसाय साळेरी- खोला येथील व्यावसायिक करत आहेत, असे यावेळी ग्रामसभेत सांगण्यात आले.
गेल्या आठवड्यात व्यावसायिक वैमनस्यातून आगोंद येथे साळेरी-खोला येथील पिता-पुत्राना मारहाण करण्याची घटना घडली. याबाबत पोलिसांत तक्रार करूनही पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले नसल्याने संतप्त झालेल्या साळेरीवासीयांनी आगोंद पोलिस आऊट पोस्टवर मोर्चा काढून संशयितांना अटक करण्याची मागणी केली.
साळेरी व आगोंदवासीयांत दरी
साळेरी येथील वासुदेव गणू धुरी व गणू धुरी यांना जलसफरी करण्याचा बंदर कप्तान व पर्यटन खात्याने दिलेला परवाना आहे. नेहमीप्रमाणे आगोंद किनाऱ्यावर व्यवसायानिमित्त आले असताना आगोंदमधील त्याच व्यवसायात असलेल्या काही व्यावसायिकांनी पिता-पुत्रांना मारहाण करण्याची घटना घडली होती.
मात्र या घटनेने साळेरी नदीच्या दुसऱ्या तटावर असलेल्या साळेरीवासीय व आगोंदवासियांमध्ये दरी निर्माण झाली आहे.
विकास कामे मार्गी लावणार
ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच फातिमा रोड्रीगीश होत्या. यावेळी पथदिवे, रस्त्याचे रुंदीकरण, त्याचप्रमाणे नदीच्या पात्रात अज्ञातांकडून टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यासंबंधी चर्चा करण्यात आली.
सरपंच रोड्रीगीश यांनी सभापती व काणकोणचे आमदार रमेश तवडकर यांच्या सहकार्याने पंचायत क्षेत्रातील विकास कामे मार्गी लावण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.