रवी नाईक पुढील पाच वर्षे फोंड्याचे आमदार असणार, हे आम्ही नाही मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनीच रवीच्या वाढदिनी केलेल्या भाषणात सांगितले आहे. गेले तीन दिवस हा त्यांचा मुद्दा फोंडा शहरात चर्चेचा विषय बनला आहे. असे झाल्यास या उमेदवारीकरता देव पाण्यात ठेवून बसलेल्या फोंड्याचे नगरसेवक विश्वनाथ दळवी यांचे काय? असेही लोक बोलू लागले आहेत. काहींना हा ‘देखल्या देवा दंडवत’चा प्रकार वाटतो आहे. तरीही दळवी यांनी सावधान रहायला हवे, असा इशारा द्यायला लोकांनी सुरवात केली आहे एवढे मात्र खरे. ∙∙∙
दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिक पदांच्या भरतीमध्ये एका महिलेने पैसे घेतल्याचा आरोप आमदार विजय सरदेसाई यांनी केला. या भरतीतील आरोपावरून आमदार बाबूश मोन्सेरात हे भाजपच्या गाभा समितीत एकाकी पडले. त्यांचे समर्थन करण्यासाठी म्हणे कोणीही धावले नाहीत. समिती सदस्यांनी सावध भूमिका घेत गप्प राहण्याची घेतलेली भूमिका ही योग्यच मानावी लागेल. आमदार सरदेसाई यांनी बाबूश यांना उपरोधिक टोला लगावला आहे. साबांखातील घोटाळ्याप्रकरणी बाबूश यांच्याकडे काही पुरावे होते काय, हा सरदेसाई यांनी उपस्थित केलेला सवाल योग्यच आहे. त्यामुळे जर बाबूश सरदेसाईंच्या आरोपावर त्यांच्याकडे पुरावे मागत असतील, तर ताकाला जाऊन भांडे लपवण्यासारखा प्रकार आहे. आमदार बाबूश मोन्सेरात यांना आपल्या कार्यालयातील सदस्य काय करतात व कार्यालयात काय चालले आहे, त्याची तसूभरही कल्पना नसावी म्हणजे ‘सर्व करून सावरून नामानिराळे’ अशी त्यांची ही भूमिका दिसते. त्यामुळे पणजीत अनेकजण राजरोसपणे मिरामार कार्यालयात गजाली करीत असतात, त्या याच अनुषंगाने... त्यामुळे पुरावे मागणे किती योग्य आहे यावरून जनता आता पुरती ओळखून आहे. ∙∙∙
कोणतीही गोष्ट घडली की त्यासाठी सरकारकडे नजर लावली जाते. स्वयंस्फूर्तीने एखादे काम आपणही करू शकतो याचा जणू सर्वांनाच विसर पडला आहे. याला काही अपवादही आहेत. तांबोसे येथे राष्ट्रीय महामार्गावर पडलेली रेती दुचाकीस्वारांसाठी जीवघेणी ठरू शकत होती. त्यामुळे तेथील रहिवासी प्रसाद गवंडी यांनी आपल्या मुलासह तसेच एम. बी. गावकर यांना सोबत घेत ती रेती हटवली. केवळ सरकारकडे नजर लावून बसून काही होणार नाही, तर आपणही समाजासाठी काही करता आले तर ते केले पाहिजे याचा आदर्श गवंडी यांनी निर्माण केला आहे. असे असले तरी सरकार ही रेती हटवणारच नाही याची खात्री झाल्यानेच त्यांना ती हटवावी लागली अशी सरकारवर टीकाही यानिमित्ताने होऊ लागली आहे. ∙∙∙
सांकवाळ येथील भूतानी प्रकल्पासंदर्भात आता वेगवेगळ्या नवीन गोष्टी पुढे येत असून भूतानी प्रकल्पाला जी जमीन देण्यात आली आहे, ती जमीन पूर्वी खासगी वनक्षेत्र म्हणून नोंद झाली होती. नंतर ही जागा खासगी वन क्षेत्रातून वगळण्यात आली. कुठ्ठाळीच्या माजी आमदार एलिना साल्ढाणा यांच्या सांगण्यानुसार, सरकारी अहवालानुसार २०१८ पर्यंत ही जागा खासगी वनक्षेत्र म्हणून दाखविण्यात आलेली आहे. याचाच अर्थ त्यानंतर ती जमीन खासगी वन क्षेत्रातून वगळण्यात आली आहे. भूतानी प्रकल्पाला मान्यता देण्यात आपला कुठलाही हात नाही असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि नगरनियोजनमंत्री विश्वजीत राणे या दोघांनीही स्पष्ट केले आहे. जर २०१८ नंतर ही जमीन खासगी वन क्षेत्रातून वगळली, तर त्यावेळी वनमंत्री कोण होते? याचा कोण खुलासा करेल का? ∙∙∙
गोव्यात हल्ली राष्ट्रीय पातळीवरील विविध कार्यक्रम होत असतात. त्यासाठी साहजिकच अनेक केंद्रीयमंत्री तसेच विविध नेते येत जात असतात. पण मुद्दा तो नाही, तर त्यासाठी आलेली ही मंडळी गोव्याला हे बनवू ते बनवू अशा घोषणा देत असतात. त्या देत असताना गोव्याला वा गोवेकरांना नेमके काय व्हायचे आहे, गोव्याला पुढे न्यावयाचे आहे त्याचा विचार मात्र कोणीच करत नाही असे सर्वसामान्य गोवेकर आता म्हणू लागला आहे. एक मंत्री येतो व गोव्याला आयटी हब करू असे सांगतो, तर दुसरा जागतिक पर्यटन हब बनविण्याची तयारी दर्शवतो. राज्य सरकारने यापूर्वीच आरोग्य पर्यटन केंद्र बनविण्यासाठी पावले उचलली आहेत. परवा तर राष्ट्रीय पशुसंवर्धन संमेलनासाठी आलेले मत्स्यपालन व पशुपालनमंत्री राजीव रंजन सिंह यांनी चक्क गोव्याला पशुधन राज्य बनविण्याची घोषणा केली. वास्तविक येथील हवामान पशुसंवर्धनासाठी अनुकूल आहे की काय येथील लोक त्या क्षेत्रात कितपत रस घेतील याचा विचार व्हायला हवा, पण त्याची दखल न घेता अशी भाषणे ठोकली जात आहेत. त्यामुळे राज्याला नेमके बनविले जाणार आहे तरी काय? असा प्रश्न लोकांना पडू लागला आहे. ∙∙∙
भंडारी समाज सध्या वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. नव्या राजकीय पक्षाच्या स्थापनेचे पिल्लू कोणीतरी सोडून दिले आहे. यामागे राहू केतू असावेत असे अनेकांना वाटते. हे राहू केतू कोण हे विचारू नका. दोन माजी आमदारांनी निवडणुकीवेळी या दोघांचा बऱ्यापैकी अनुभव घेतला आहे. एका माजी मंत्र्यालाही त्यापैकी एकाने हात दाखवला आहे. थोरा मोठ्यांच्या घरी गणेशोत्सवाच्या निमित्ताने जावे आणि छायाचित्रे टिपावी असा उद्योग या जोडगोळीने चालवला आहे. समाजासाठी काहीही योगदान न देता तापलेल्या तव्यावर आपली पोळी भाजण्यासाठी ते दोघे आता राजकीय पक्ष स्थापनेचा विचार काहीजणांच्या डोक्यात घालू लागले आहेत. त्यांच्या या कारवायांचा भांडाफोड समाजाच्या एका नेत्याने शनिवारी समाज माध्यमावर करताच कोण हे राहू केतू अशी विचारणा होऊ लागली होती. ∙∙∙
गोव्यात रस्त्यावर जे अपघाती मृत्यू होत आहेत, त्याला सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते जबाबदार असे परखड मत व्यक्त करून आडमार्गाने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर बाण सोडणारे पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी सांकवाळ येथे येणाऱ्या भूतानी प्रकल्पाच्या विरोधात मात्र काहीच वक्तव्य केलेले नाही. माविन गुदिन्हो हे एकेकाळी कुठ्ठाळी मतदारसंघाचे आमदार. अजूनही कुठ्ठाळी मतदारसंघात त्यांचा शब्द चालतो. संपूर्ण गोवा भूतानीच्या विरोधात आवाज उठवत असताना माविन गुदिन्हो यांचा आवाज या प्रकल्पाबद्दल बंद का? सांकवाळचे लोक हा प्रश्न करीत आहेत. याला माविन उत्तर देतील का? ∙∙∙
पणजीत स्मार्ट सिटी बसेस कदंबने सुरू केल्या असून त्यांना प्रवाशांकडून चांगला प्रतिसादही मिळताना दिसत आहे. या बसेसमुळे आपला धंदा बसणार अशी भीती खासगी बसवाल्यांसमोर होती व त्यासाठी त्यांच्या संघटनेने न्यायालयाचे दरवाजेही ठोठावले होते, पण त्यावर सरकारने स्मार्ट सिटी बसेसबरोबरच खासगी बसेसही चालतील असे स्पष्ट केल्याने खासगी बसवाल्यांचा जीव जरी भांड्यात पडला असला, तरी निश्चितच त्यांच्या समोर कदंबच्या ई बसेसबरोबर स्पर्धा करावी लागणार आहे व त्यासाठी त्यांना आपल्या ‘राव रे’, ‘वच रे’ या कार्यपध्दतीत तसेच प्रवाशांसाठी वेळ काढण्याच्या सवयीत बदल करावा लागणार आहे. प्रवाशांनी गच्च भरल्याशिवाय बस न सोडणे, प्रत्येक थांब्यावर प्रवाशांची प्रतीक्षा करणे हे दिवस आता मागे पडले आहेत. कारण स्मार्ट बसेस आरामदायी व हवेशीर असल्याने प्रवाशांसाठी आता पर्याय खुला राहणार आहे. खासगी बसवाल्यांनी आपल्या स्वभावात व कार्यपध्दतीत बदल न केला, तर सरकारने संधी देऊनही ते सिटी बसेस क्षेत्रांतून बाहेर फेकले जातील अशी प्रतिक्रिया प्रवासीच व्यक्त करताना दिसत आहेत. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.