चतुर्थी झाली तरी कुडचडेतील रस्त्यांची दुरुस्ती होत नाही आणि या खडबडीत रस्त्यावर वाहनचालकांना खड्डे चुकविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असल्याने कित्येकवेळा अपघातही घडतात. याच कुडचडेतील स्थितीचा फायदा उठवीत रविवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सावर्डेच्या रस्त्यावर ‘शेण भरो आंदोलन’ करून लोकांचे लक्ष वेधले. त्याच दिवशी रात्री कुडचडेच्या या रस्त्यावरील खड्डे चुकविताना झालेल्या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले. त्यानंतर अकस्मात जाग आलेल्या भाजप मंडळाने काल पत्रकार परिषद घेत या रस्त्यांची तात्पुरती दुरुस्ती करणार असे जाहीर करून टाकले. पाटकर इफेक्टमुळे कुडचडेच्या भाजपाला जाग आली असे म्हणायचे का? ∙∙∙
नुकताच एक प्रशिक्षणार्थी पोलिस कॉन्स्टेबल आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ज्या बेशिस्तपणाने वागला ते संपूर्ण गोमंतकीयांनी पाहिले. मुळात पोलिस दल हे आपल्या शिस्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करण्यासाठी ओळखले जातात. मात्र, अशाप्रकारच्या काही घटना आणि प्रकार पोलिस विभागाची प्रतिमा मलिन करत आहेत. आता प्रशिक्षणार्थी पोलिस, अधिकाऱ्याच्या अंगावर धावून जातो हे जरा अतिच झाले. मुळात पब्लिक फिगर असलेल्या या कर्मचाऱ्यांनी वागताना सार्वजनिक स्थळी भान ठेवले पाहिजे. कारण काही पोलिस कर्मचारी आपल्या शिस्तीपेक्षा बेशिस्तपणासाठी सध्या ओळखू लागलेत. काहीजणांनी तर हातावर व शरीरावर टॅटू काढलेले दृष्टीस पडतात. यात पुरुष अन् महिला पोलिसांचाही समावेश आहे, तर काहींच्या वर्दीचा ठावठिकाणाच नसतो. म्हणजे योग्यरीत्या वर्दी परिधान करत नसतात. मुळात पोलिसांना हे शोभत का? पोलिसांना आता पूर्वीसारखी ट्रेनिंगवेळी शिस्त शिकविली जात नाही की सगळेच आता राजकीय ओळखीच्या जिवावर आपले कुणीच काही वाकडे करू शकत नाही या गुर्मीत वागतात? नक्की काय प्रकार हा असा प्रश्न सर्वसामान्य विचारू लागले आहेत. ∙∙∙
स्मार्ट सिटी योजनेखाली सुरू असलेल्या कामामुळे अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजवण्याची हमी सरकारने दिली आहे. मात्र, त्याचे काम होत असलेले दिसत नाही. जे काही खड्डे बुजवण्यासाठी सिमेंट काँक्रीट वापरण्यात आले आहे ते धोकादायक बनले आहे. काही ठिकाणी त्याला उंचवटा व सखलपणा तसेच खडबडीतपणा असल्याने दुचाकीस्वारांना तर जीव मुठीत घेऊनच वाहने हाकावी लागत आहेत. पणजीचे आमदार व मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी तर यामधून लक्ष काढल्यातच जमा आहे. या कामासाठी स्मार्ट सिटीचे सीईओ असलेले संजीत रॉड्रिग्ज यांची गोव्याबाहेर बदली झाली आहे. त्यामुळे या कामासाठी कोणी वाली राहिलेला नाही. मोन्सेरात यांचे खंदे समर्थक असलेल्या काही समर्थकांनी तर खड्डेमय रस्त्यांविरुद्ध दंड थोपटले आहेत. या समर्थकांना रस्त्यावर उतरण्यामागे मोन्सेरात यांचीच फूस आहे अशी चर्चा सुरू आहे. हे काम पणजी महापालिकेचे नसून स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत करण्यात येत असल्याचे स्पष्टीकरण मोन्सेरात यांनी यापूर्वीच दिलेले आहे. त्यामुळे त्यांनीही याकडे दुर्लक्ष केले आहे. पणजी महापालिकेचे महापौर हे तर कधी त्यात लक्ष घालताना दिसत नाही. ∙∙∙
मुंबईतील लालबागचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेला गणपती अनेकांना पावला आहे. दरवर्षी या गणेशाच्या दर्शनासाठी लोक रात्रंदिवस रांगा लावून त्याचे दर्शन घेतात. हल्लीच काही दिवसांपूर्वी राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी या राजाचे दर्शन घेतले. हा लालबागचा राजा अनेकांची स्वप्ने पूर्ण करतो अशी आख्यायिका आहे. त्यामुळेच गरिबांपासून ते श्रीमंत या राजाचे दर्शन घेतल्याशिवाय राहत नाहीत. राणे हे राजाच्या चरणी नतमस्तक झाले. त्यांच्या पाठोपाठ मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनीही या राजाचे दर्शन घेण्यासाठी मुंबई गाठली. आपली राजकीय कारकीर्द यशस्वी ठरो व राजकारणात यश मिळो यासाठी तेसुद्धा नतमस्तक झाले. लालबागचा राजा बाप्पाचा आशीर्वाद हा लाखमोलाचा असल्याने मंत्री व आमदारांनी भेटी देऊन दर्शन घेतले. ∙∙∙
मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्या विरोधात काँग्रेसचे सावियो कुतिन्हो आणि मडगावचे युवा नेते प्रभव नायक यांच्याकडून सतत टीका होत असतानाच दोन दिवसांपूर्वी आणखी एका दिगंबरामुळे दिगंबर कामत अडचणीत आले. हा दुसरा दिगंबर म्हणजे, उपनगराध्यक्ष दीपाली सावळ यांचे यजमान दिगंबर सावळ. दिगंबर कामत हे एका कार्यक्रमासाठी चिंचाळ येथे उपस्थित असताना या दुसऱ्या दिगंबराने एकावर दगडाने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. त्यामुळे दिगंबर सावळ यांच्याबरोबर आता दिगंबर कामत यांच्यावरही विरोधकांनी टीका करण्यास सुरवात केली आहे. आधीच उपनगराध्यक्ष सावळ यांना पदावरून हटविले जात नाही म्हणून कित्येक नगरसेवक कामत यांच्यावर नाराज आहेत आणि आता त्यातच हा प्रकार घडल्याने दिगंबर कामत अधिकच अडचणीत येणार नाहीत तर काय? ∙∙∙
मडकई मतदारसंघातील पाटणतळी येथील नंदनवन हॉलमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात एका वक्त्याने सुदिन ढवळीकर अजूनही मुख्यमंत्री होऊ शकतात असा आशावाद व्यक्त केला. या त्याच्या वक्तव्याला उपस्थितांकडून भरपूर टाळ्याही मिळाल्या. आपल्याला मुख्यमंत्री होण्याची दोनदा संधी चालून आली होती, पण आपण पक्षांतर करण्यास नकार दिल्यामुळे ती संधी हुकली असे नंतर सुदिननी सांगितले. अर्थात ते खरेही आहे म्हणा. पंचवीस वर्षे राजकारणात असूनही पक्षांतर न करणारे ते सध्याच्या विधानसभेतील एकमेव आमदार. तरीही त्या वक्त्याचा ‘आशावाद’ त्यांच्या चेहऱ्यावर स्मित फुलवून गेला आणि याचीच चर्चा नंतर बराच वेळ सभागृहात सुरू होती.∙∙∙
कुटबण मासेमारी धक्क्यावरून सध्या एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. स्वतः मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात स्वतः पुढाकार घेऊन मच्छीमारी खात्याच्या संचालकांना बाजूला केले ही वस्तुस्थिती असताना मंत्री नीळकंठ हळर्णकर मात्र खात्याचा यात काहीही दोष नसल्याचे म्हणतात. यावरून त्यांना प्रसंगाचे गांभीर्य अजूनही कळलेले नाही की काय अशी विचारणा होऊ लागली आहे. तेथे तसेच अन्य भागांत साथीच्या आजाराने अनेक कामगार दगावतात. त्यानंतर सरकारी यंत्रणेने केलेल्या संयुक्त तपासणीत तेथील आरोग्य विषयक त्रुटी उघड होतात व त्यानंतर मुख्यमंत्री जातीने कुटबणला भेट देऊन कारवाई करतात, तरीही मंत्री महाशय खात्याची बाजू सावरतात. यावरून एकंदर कारभार उघड होतो. आता कुटबणमधील गैरव्यवस्था दूर करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी पर्यावरणमंत्र्यांकडे सोपवावी यावरून खरे तर हळर्णकर यांनी तोंड बंद ठेवणेच योग्य होते, पण ते न ठेवल्याने सत्ताधारी पक्षातील दुफळी मात्र उघड झाली आहे. खाते खरेच कार्यक्षम असते, तर निकामी स्थितींतील ट्रॉलर धक्क्यावर कसे आहेत तसेच तेथील बेकायदेशीर बांधकामे, अतिक्रमणे याचे उत्तर मात्र हळर्णकर यांनी दिलेले नाही. ∙∙∙
कळंगुट परिसराचा विकास केल्याचा दावा करण्यासाठी आजवर अनेकजण पुढे आले आहेत. समस्या निर्माण झाल्यावर मात्र हे सामाजिक कार्यकर्ते, विकासकामांचे पितामह गायब होतात. कळंगुटच्या सेंट आलेक्स चर्चसमोरील खड्ड्यावरून स्थानिक सामाजिक कार्यकर्ते व राजकारण्यांना सध्या लक्ष्य केले जात आहे. रस्त्याचे काम पंचायतीने करवून घ्यावे की सरकारी यंत्रणेने त्याची दखल घ्यावी यावरून एकमेकांकडे स्थानिक पातळीवर बोटे दाखवली जात आहेत. एका खड्ड्यावरून राजकारण कसे केले जाऊ शकते याचे उदाहरण सध्या कळंगुटमध्ये पाहायला मिळत आहे. कळंगुट हे जागतिक पर्यटन नकाशावरील महत्त्वाचे ठिकाण असताना तेथील रस्ता खड्डेमुक्त असावा अशी अपेक्षा कोणीही बाळगण्यात काही गैर नाही. मात्र यावरून होणारी चिखलफेक निवडणुकीचे वातावरण नसताना राजकारणाचा स्तर कुठे पोचला याचे दर्शन मात्र घडवत आहे. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.