Gomantak Marathi Academy 
गोवा

Gomantak Marathi Academy: "मराठीला राजभाषेचा दर्जा मिळायलाच हवा", गोमन्तक मराठी अकादमी उभारणार लढा

Porvorim: राजभाषेचा दर्जा मिळावा यासाठी निर्णायक लढ्याची रूपरेषा ठरवण्यासाठी परवरी येथील मराठी अकादमीच्या कार्यालयात आज (३ मार्च) बैठक पार पडली.

Sameer Amunekar

पर्वरी: मराठीला राजभाषेचा दर्जा मिळावा यासाठी निर्णायक लढ्याची रूपरेषा ठरवण्यासाठी परवरी येथील गोमंतक मराठी अकादमीच्या कार्यालयात आज (३ मार्च) बैठक पार पडली. मराठीला राजभाषेचा दर्जा प्राप्त व्हावा, यासाठी गेली अनेक दशके प्रयत्नशील असलेले गो.रा.ढवळीकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

सामाजिक, शैक्षणिक तथा सांस्कृतिक क्षेत्रात गेली अनेक वर्षे कार्य करणारे कुशल संघटक प्राचार्य सुभाष वेलिंगकर यानी बोलावलेल्या या बैठकीस गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रदीप घाडी आमोणकर, 'मराठी असे आमुची मायबोली' चे निमंत्रक प्रकाश भगत व ज्येष्ठ पत्रकार गुरुदास सावळ हे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

गो.रा.ढवळीकर यानी मराठी राजभाषा व्हावी म्हणून गेली सुमारे चाळीस वर्षे चालू असलेल्या लढ्यातील महत्वाच्या घटना विषद केल्या.

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने मराठीची कास सोडल्याने आज मराठी राजभाषेसाठी याचना करण्याची पाळी आली असल्याचे त्यानी यावेळी बोलताना सांगितले. कै.विष्णू वाघ आणि नरेश सावळ यांच्यानंतर विधानसभेत मराठीसाठी आवाज उठवणारा एकही आमदार नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

बैठकीचे निमंत्रक प्राचार्य सुभाष वेलिंगकर यानी राजभाषा आंदोलनाच्या वेळी करण्यात आलेल्या संघर्षाची माहिती देऊन,त्यावेळी हिंदूंच्या मतांवर निवडून असलेल्या राजकारण्यांनी कशाप्रकारे कच खाल्ली या विषयी सविस्तर कथन केले.

कोंकणीला रोमी लिपी देणे अराष्ट्रीय असल्याचे सांगून, त्या मोबदल्यात मराठीला राजभाषेचा दर्जा देण्याचा सौदा ही मराठीशी केलेली प्रतारणा ठरेल, असेही ते पुढे म्हणाले. कोंकणीशी आमचे वैर नसून, राजभाषा दर्जा हा मराठीचा हक्क असल्याचे त्यानी सांगितले.

प्रदीप घाडी आमोणकर यानी स्वागत व प्रास्ताविक केले. मराठी राजभाषा आंदोलनासाठी गोमंतक मराठी अकादमी सर्वतोपरी मदत करील,अशी ग्वाही त्यानी यावेळी बोलताना दिली. या चळवळीचे राज्य-निमंत्रक म्हणून प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांची टाळ्यांच्या गजरात एकमताने निवड करण्यात आली.

गुरुदास सावळ यानी ऋणनिर्देश करताना कुशल संघटक प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू होणारा हा लढा निर्णायक लढा असून,मराठीला राजभाषेचा दर्जा मिळाल्यानंतरच थांबेल,असे सांगितले.

या विषयासंदर्भात पूर्ण राज्यात जागृती करण्याचा व मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्याचे यावेळी ठरविण्यात आले.

निवडक कार्यकर्त्यांच्या या बैठकीस अपेक्षितात, मराठीतील नामवंत कवयित्री डॉ.अनुजा जोशी, शिक्षणतज्ञ गोविंद देव, मराठी राजभाषा आंदोलनातील ज्येष्ठ कार्यकर्त्या अनुराधा मोघे, शिक्षण क्षेत्रातील महिला कार्यकर्त्या रोशन सामंत, साहित्यिक तथा निवृत्त प्राचार्य गजानन मांद्रेकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत गावस, नितीन फळदेसाई, परेश पणशीकर, प्रवीण नेसवणकर उपस्थित होते.

तसंच प्राचार्य संदीप पाळणी, विनय नाईक,संतोष धारगळकर, सत्तरीतील युवा कार्यकर्ते विजय नाईक, सामाजिक कार्यकर्ते ॲड. शिवाजी देसाई, गोमंतक मराठी परिषदेचे अध्यक्ष डाॅ.मधु घोडकिरेकर, म.रा.प्र.स्.चे युवा कार्यकर्ते मच्छिंद्र च्यारी, लेखक व सामाजिक कार्यकर्ते प्रा.नारायण महाले, लेखक प्रमोद कारापुरकर, रामदास सावईवेरेकर, माजी अकादमी अध्यक्ष नरेंद्र आजगावकर यांचा समावेश होता.

King Momo 2026: कार्निव्हल 2026 चे बिगुल वाजले! सेड्रिक डी कोस्टा यांची 'किंग मोमो' म्हणून घोषणा

IND vs NZ: विजेच्या वेगाने आला चेंडू अन्... श्रेयस अय्यरच्या 'रॉकेट थ्रो'ने उडवले स्टंप्स; ब्रेसवेलची डायव्हही ठरली अपयशी Watch Video

Viral Video: 'धूम' स्टाईल स्टंट अन् थेट जमिनीवर लोळण! दिल्ली पोलिसांचा रीलवाल्यांना दणका; स्टंटबाजांचं मीम बनवून केलं ट्रोल

IND vs NZ: किवी सलामीवीरांचा धमाका! 27 वर्षांनंतर भारतीय भूमीवर रचला ऐतिहासिक रेकॉर्ड; कॉन्वे आणि निकोल्स जोडीची कमाल

लग्नाला गेले कुटुंब अन् एकटी मुलगी, खिडकीचे ग्रिल कापताना चोरट्यांना रंगेहाथ पकडले; पर्रा येथे दरोड्याचा मोठा डाव फसला

SCROLL FOR NEXT