पणजी: पर्वरी येथील उड्डाणपुलाचे काम दोन टप्प्यांत, तसेच दोन वर्षांत पूर्ण करण्याचे आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले. तीन बिल्डिंग आणि सांगोल्डा या उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंचे काम आता हाती घेण्यात आले आहे.
या उड्डाण पुलासाठी केवळ दोनच इमारती हलवाव्या लागणार आहेत, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी बैठकीनंतर दिली.
सार्वजनिक बांधकाम खात्याचे वरिष्ठ अधिकारी, उत्तर गोवा जिल्हाधिकारी डॉ. स्नेहा गीते, पर्वरीतील सरपंच, काही नागरिक यांच्या उपस्थितीत मंत्रालयात झालेल्या बैठकीत उड्डाण पुलाचे काम कसे केले जाणार, त्या बांधकाम काळात संभाव्य वाहतूक बदल कसा असेल, याचे सादरीकरण करण्यात आले.
कंत्राटदार कंपनीच्या प्रतिनिधींनीही या बैठकीत सादरीकरण केले. या बैठकीनंतर खंवटे यांनी सांगितले, की अहोरात्र काम केले, तर २ वर्षांत या उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईल. साडेपाच किलोमीटर लांबीच्या या उड्डाण पुलाच्या मधल्या टप्प्यांचे काम दुसऱ्या टप्प्यात हाती घेण्यात येणार आहे.
यासाठी आज ही बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली होती. त्या बैठकीत पर्वरीतील अंतर्गत रस्ते रुंद करणे, ते रस्ते पर्वरीतील वाहतुकीसाठी उपलब्ध करणे, सेवा रस्त्यांचा वापर महामार्गावरील वाहतुकीसाठी करणे आदी नियोजन करण्यात आले आहे.
उड्डाणपुलाचे काम जराही रेंगाळता कामा नये. ते वेळेत पूर्ण झाले तरच वाहतूकदारांना त्रास होणार नाही, याकडे लक्ष वेधण्यात आल्याचे सांगून मंत्री खंवटे म्हणाले की, अवजड वाहतूक इतर मार्गाने वळवावी लागणार आहे. त्याचेही नियोजन वाहतूक पोलिसांच्या पातळीवर केले जात आहे.
पर्वरीतील महामार्ग केवळ पर्वरीतील रहिवासी वापरतात, असे नाही. पूर्ण उत्तर गोव्यातील वाहतूक या रस्त्यावरून पणजीला जाते. त्याशिवाय आता पर्यटन हंगाम सुरू होणार आहे. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, पर्वरीतील कार्यालयात येणारे कर्मचारी यांच्या गरजा लक्षात घेतल्या पाहिजेत.रोहन खंवटे, पर्यटनमंत्री
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.