Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; फोंड्यात वंदे-मातरमची मुले उपाशी...

Khari Kujbuj Political Satire: कुटबण जवळ साळ नदीच्या मुखाजवळील पात्रांत तेथे तयार झालेल्या वाळूच्या पट्ट्यावर एक मच्छिमारी नौका परवा अडकून पडली.

गोमन्तक डिजिटल टीम

फोंड्यात वंदे-मातरमची मुले उपाशी...!

फोंड्यात ‘वंदेमातरम’ पठणाचा कार्यक्रम झाला खरा, पण बहुतांश विद्यार्थ्यांना मात्र उपाशीपोटी घरी जावे लागले. येथील राजीव गांधी कलामंदिरात हा वंदेमातरमचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पण कार्यक्रम संपल्यावर काही विद्यालयांच्या विद्यार्थ्यांना खाऊची पाकिटेच मिळाली नाहीत. सकाळी कार्यक्रम असल्यामुळे विद्यालयातील ‘मिड डे मील’लाही या विद्यार्थ्यांना मुकावे लागले होते. नियोजन व्यवस्थित नसल्यामुळे हा प्रकार घडल्याची प्रतिक्रिया शिक्षकांनी दिली. बरेच विद्यार्थी काहीच न खाता घरी परतल्यामुळे मलूल झाले होते, त्यामुळे असे कार्यक्रम करताना त्यात योग्य नियोजन करा, असा सल्ला या शिक्षकांनी दिला आहे. ∙∙∙

साळ नदीतील अडथळा

कुटबण जवळ साळ नदीच्या मुखाजवळील पात्रांत तेथे तयार झालेल्या वाळूच्या पट्ट्यावर एक मच्छिमारी नौका परवा अडकून पडली. महिनाभरापूर्वी अशीच आणखी एक नौका अडकून पडली होती व मच्छिमारांचे नुकसान झाले होते. सदर वाळूचा पट्टा दरवर्षी असाच जलवाहतुकीस अटकाव करत असतो. तो हटवावा व त्यासाठी नदीपात्रांतील गाळ उपसावा, अशी मागणी सातत्त्याने होते आहे. सरकारने त्यासाठी निविदाही जारी केल्या व कंत्राटही बहाल केले. पण काही उपद्रवी लोक म्हणे विविध तांत्रिक बाबी उपस्थित करून त्याला सीआरझेड वा हरित लवादाकडे तक्रार करतात व हे काम अडते. पण सरकारी यंत्रणेवर ठपका ठेवणारे, असा अडथळा करणाऱ्यांना त्या बाबत जाब का विचारत नाहीत, अशी विचारणा आता मच्छिमार व्यावसायिक आता करू लागले आहेत. ∙∙∙

नेते झाले अभिनेते!

राजकारण हेही नाटक सिनेमा सारखेच असते, फरक एवढाच नाटक व सिनेमात तोंडाला रंग फासून व वेशभूषा करून अभिनय करावा लागतो. राजकारणात रंग न लावता ‘लाईव्ह’ अभिनय करावा लागतो. आमच्या राज्यातील अनेक राज नेते चांगले अभिनेते व कलाकार आहेत. माजी मंत्री व विद्यमान आमदार गोविंद गावडे यांचा अभिनय सगळ्यांना माहीतच असणार हल्लीच त्यांनी गोवा मुक्ती संग्रामातील एका स्वातंत्र्य सैनिकाच्या जीवनावर आधारित नाटकांत भूमिका करून वाहवा मिळविली होती. आता गोविंद अभिनय क्षेत्रांत नामना जोडतो म्हटल्यावर मंत्री रमेश तवडकर गप्प कसे बसणार. रमेश तवडकर यांनी ‘एसटी’ समाजाचे मोठे समाजप्रवर्तक बिरसा मुंडा यांच्या जीवनावर आधारित एका सिनेमात काम करण्यास सुरवात केली आहे. आता पाहूया रमेश ‘कॅमेरा’ कसे ‘फेस’ करतात ते. प्रत्यक्ष राजकारणात रमेश तवडकर हे गावडेंना मात देण्यात यशस्वी ठरलेत, आता अभिनयात कोण उजवा ठरतो तेही पाहूया!. ∙∙∙

युरीच्या ‘बर्थडे’ची तयारी...

आमदार युरी आलेमाव पुढच्या रविवारी वयाची चाळीशी गाठणार आहेत. यंदाचे ‘बर्थडे सेलिब्रेशन’ दणक्यात साजरे केले जाणार आहे. त्याची जय्यत तयारी एव्हाना सुरूही झाली आहे. १६ नोव्हेंबरला युरी यांचा वाढदिवस आहे. तो कुंकळ्ळीतील बस स्थानक मैदानावर साजरा होणार. सोशल मीडियावरून त्याची जाहिरातही होत आहे. बर्थडेचे औचित्य साधून कुंकळ्ळी मतदार संघात विविध विकास कामांचा शुभारंभही करणार आहे. या दिवशी ते काही राजकीय घोषणा करणार का, याचीही उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे. तूर्तास ‘वेट अँड वॉच!’ ∙∙∙

नोकऱ्यांचा लाभ झाला कुणाला ?

सरकारी नोकऱ्यांसाठी आपण आयएएस अधिकाऱ्यांबरोबरच एका मंत्र्यांकडे पैसे दिल्याचे ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणातील मुख्य संशयित पूजाने जाहीर केल्यामुळे सध्या खळबळ उडाली आहे. २०१९ मध्ये हा देवघेवीचा प्रकार झाल्याचे पूजाने म्हटल्यामुळे त्यावेळी असलेल्या सर्वच मंत्र्यांकडे संशयाची सुई फिरू लागली आहे. या काळात भाजपचे सरकार असल्यामुळे किती जणांना सरकारी नोकऱ्यांचा लाभ झाला, त्याचीही चौकशी होणे गरजेचे असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. आता पाहुया कोण कशी आणि किती चौकशी करतो ते...! ∙∙∙

‘ते’ पोलिस ‘बीट’वर आहेत की, ‘बीट’च्या बाहेर?

किनारी भागातील पोलिस स्थानकांमध्ये सध्या एक चर्चा जोर धरते आहे. ती म्हणजे बीट पोलिसांच्या ‘बीट’वर राहण्याच्या प्रामाणिकपणाची! अनेक पोलीस स्थानकांमध्ये जे बीट पोलीस वर्षानुवर्षे तेच आहेत, त्यांची आता अदलाबदल करावी अशी चर्चा आतल्या गोटातच रंगू लागली आहे. विशेष म्हणजे किनारी भागातील गुन्ह्यांची संख्या गेल्या काही महिन्यांत वाढीच्या मार्गावर आहे आणि अनेक प्रकरणांमध्ये बाहेरून आलेले संशयित सामील असल्याचे दिसते. अशावेळी बीट पोलिसांकडून या हालचालींची वेळेवर माहिती मिळणे अपेक्षित असते; मात्र वास्तव काहीसे वेगळेच दिसते आहे. स्थानकांमध्येच ‘आपले बीट पोलिस फक्त नावालाच बीटवर!’ अशी मिश्कील टिप्पणी ऐकू येते. ∙∙∙

रामा प्रकरणाची पुनरावृत्ती तर नव्हे?

रामा काणकोणवरील हल्ल्याचा तपास कुठवर पोचला यावर सध्या काहीच बोलले जात नाही. हल्ल्यानंतर बहुतेक राजकीय पक्षांनी या हल्ल्याबाबत हल्लाबोल करून सरकारला खिंडीत पकडले होते.अनेक भागात तर मेणबत्ती मोर्चांची स्पर्धाच लागली होती, पण नंतर स्वतः रामाने या प्रकरणात जी भूमिका घेतली त्यामुळे सगळ्यांचा आक्रमकपणा कुठल्या कुठे गेला. आज तर ही मंडळी रामाचे नाव घेतले की, तोंड फिरविताना दिसतात. रामाची आठवण होण्याचे कारण म्हणजे घटना घडल्यापासून प्रकाशांत आलेली पूजा नाईक. सरसकट सगळ्या विरोधी नेत्यांनी तर तिला पोलिस संरक्षण देण्याची मागणी लावून धरली आहे. वास्तविक ‘कॅश फॅार जॅाब’ प्रकरणातील ती प्रमुख संशयित आहे. त्यामुळे उद्या रामाप्रमाणे तिनेही पाठ फिरवली तर तिला पोलिस संरक्षण देण्याची मागणी करणाऱ्यांची परिस्थिती काय होईल हा, मुद्दा उपस्थित होतो, अशी चर्चा कानावर पडतेय. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India A vs SA: सिराज, कुलदीप, प्रसिध कृष्णा फेल! भारतीय गोलंदाजांचा 'फ्लॉप शो'; दक्षिण आफ्रिका संघाचा 417 धावांचा पाठलाग

Goa opinion: लडाखने जे करून दाखवले ते गोव्याला जमेल?

Ironman 70.3: मुख्यमंत्र्यांचे सचिव 'आयर्नमॅन', खडतर ट्रायथलॉनमध्ये मारली बाजी; संकेत आरसेकर यांनी पूर्ण केले तिहेरी आव्हान

'पर्यटकांना खोल्या, घरे भाड्याने देत असताना कागदपत्र तपासा'! द. गोवा जिल्‍हाधिकाऱ्यांच्या सूचना; चोरीच्‍या घटनांमुळे प्रशासन सावध

Akshay Patra Yojana: ..आणखी 3 हजार विद्यार्थ्यांना ‘अक्षयपात्र’! माध्यान्ह आहाराचा मुद्दा; वाढत्‍या मागणीनंतर शिक्षण खात्‍याचा निर्णय

SCROLL FOR NEXT