फोंडा: बुधवारपेठ मार्केटमधील नवीन पालिका बाजाराच्या बांधकामासाठी सध्याच्या मार्केट शेडमधील भाजीपाला, फुले आणि फळविक्रेत्यांचे स्थलांतर मार्केटमागील ओरबिंदो एअरपोर्ट रोडवर करण्यात येणार आहे. त्यापूर्वी या ठिकाणी शेड उभारून व्यापाऱ्यांची सोय करण्याचा निर्णय फोंडा पालिकेच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
नवीन मार्केट संकुलात सुमारे पावणेदोनशे व्यापाऱ्यांना सामावून घेणे शक्य नसल्याने व्यापाऱ्यांनी शेड उभारण्याचा प्रस्ताव पालिकेसमोर ठेवला होता. पालिका प्रशासनाने हा प्रस्ताव मंजूर केला आहे. येत्या महिनाभरात शेडचे बांधकाम पूर्ण करून व्यापाऱ्यांचे स्थलांतर करण्यात येईल, अशी माहिती नगराध्यक्षांनी दिली.
दरम्यान, पालिका इमारतीजवळील रिव्हरफ्रंट प्रकल्प लवकरच पूर्ण करण्यासाठी पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. या प्रकल्पाला काहीजण जाणीवपूर्वक विरोध करीत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. मात्र, दिवंगत आमदार रवी नाईक यांनीच येथे जॉगर्स पार्क आणि अन्य सुविधांसाठी हा प्रकल्प पुढे नेला होता, असे नगराध्यक्षांनी सांगितले. तसेच क्रांती मैदानाचा लष्कराकडे असलेला करार रद्द करण्यासंबंधी ठराव घेण्यात आला. बैठकीत अन्य विषयांवरही चर्चा झाली. दिवंगत आमदार रवी नाईक यांचा पुतळा क्रांती मैदानाजवळ उभारावा आणि मैदानाचा उर्वरित भाग पालिकेकडे वर्ग करावा, अशी मागणी यावेळी नगरसेवकांनी केली.
पार्किंगचा प्रश्न जटील
फोंडा शहर परिसरात पार्किंगचा प्रश्न जटील बनला असून फुटपाथ विक्रेत्यांनी बळकावल्यामुळे लोकांना रस्त्यावरून चालत जावे लागते, त्यामुळे या विक्रेत्यांना हटविण्याबरोबरच त्यांचे योग्य स्थलांतर करण्यासंबधीही बैठकीत चर्चा झाली. पे-पार्किंगचा विषयही मार्गी लागणार असून नवीन बांधकामांना परवानगी देताना आधी पार्किंग, पाण्याची सोय तसेच इतर गोष्टींसंबंधी शहानिशा करूनच पालिकेने अशा बांधकामांना परवानगी द्यावी, असे सुचविण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.