

पणजी: दिवाळीतील लक्ष्मीपूजनासाठी कागदी फुलांच्या हारांचे महत्त्व गोव्यात आजही कायम आहे. काळ बदलला, बाजारात प्लास्टिकच्या फुलांचे हार आले, तरी पारंपरिक कागदी हारांची परंपरा काही कुटुंबांनी जपली आहे. म्हापसा आणि धारगळ येथील दोन चुलत भावांची कुटुंबे गेल्या तीन पिढ्यांपासून हा व्यवसाय टिकवून आहेत.
गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या इमारतीच्या दक्षिणेला, कॅफे भोसलेकडे जाणाऱ्या टी. बी. कुन्हा मार्गावरील पोर्तुगीजकालीन इमारतीसमोरील जागेत अन्वर शेख यांनी गेल्या तीन दिवसांपासून कागदी फुलांच्या हारांची विक्री सुरू केली आहे. पोर्तुगीज काळापासून शेख कुटुंबातील सदस्य याच ठिकाणी हार विक्रीसाठी येत असल्याचे वैशिष्ट्य आहे. बदलत्या काळातही तीन पिढ्यांची परंपरा जपणाऱ्या या दोन कुटुंबांमुळे गोव्याच्या दिवाळीतील एक जुनी सांस्कृतिक ओळख आजही टिकून आहे.
अन्वर म्हणाले, त्यांचे आजोबा आणि पणजोबा याच ठिकाणी कागदी हार विक्री करीत होते. आपण वडिलांसोबत पणजीत हार विक्रीसाठी येत असताना येथे १५ ते १६ विक्रेते असायचे. मात्र, कालांतराने ही संख्या कमी होत गेली. सध्या चुलत बंधूही धारगळ येथून तयार केलेले हार विक्रीसाठी पणजीत आणतात.
फुलांचा रंगीबेरंगी साज!
विविध रंगांचे कागद, मारवाज आणि दोरा वापरून हे हार तयार केले जातात. लहान हार तयार करण्यासाठी सुमारे एक तास, तर मोठ्या हारासाठी तीन ते चार तास लागतात. हारांच्या आकारानुसार ५० रुपयांपासून ३०० ते ४०० रुपयांपर्यंत किंमत आहे. मोठ्या हारासाठी पाचशे रुपयांपर्यंत ऑर्डर घेतली जाते. दिवाळीच्या तीन महिने आधीपासूनच हारनिर्मिती सुरू होते. घरातील सर्व सदस्य या कामात मदत करतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.