Pop Idols seized in Goa: राज्यात प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) पासून बनवलेल्या गणेशमूर्तींवर कठोर बंदी असतानाही, अजूनही काही ठिकाणी या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे. फोंडा येथील एका गणेशमूर्ती कार्यशाळेत पीओपीच्या मूर्ती सापडल्यामुळे प्रशासनाने तातडीने कारवाई करत ही कार्यशाळा सील केली आहे.
ही कारवाई उपजिल्हाधिकारी, फोंडा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली, ज्यात मामलेदार स्टाफ प्रभारी नरेश कोमरपंत आणि प्रशांत कुंकळकर यांचा सहभाग होता. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या कार्यशाळेत तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात पीओपीच्या गणेशमूर्ती आढळून आल्या.
पीओपीपासून बनवलेल्या मूर्ती पर्यावरणासाठी हानिकारक असतात. या मूर्तींचे विसर्जन केल्यावर त्या पाण्यात लवकर विरघळत नाहीत, ज्यामुळे जलप्रदूषण होते आणि जलचरांच्या जीवनाला धोका निर्माण होतो. म्हणूनच, गोवा सरकारने पीओपीच्या मूर्तींवर बंदी घातली असून, नैसर्गिक मातीपासून बनवलेल्या मूर्ती वापरण्यास प्रोत्साहन दिले जाते.
चतुर्थीला अवघे काही दिवस बाकी असताना फोंड्यातील या कार्यशाळेत पीओपीच्या मूर्ती बनवल्या जात असल्याची माहिती प्रशासनाला मिळताच संबंधित अधिकाऱ्यांकडून याची खात्री करून घेण्यात आली आणि त्यांनतर तातडीने छापा टाकलागेला. या घटनेमुळे गणेश चतुर्थीच्या तोंडावर पीओपीच्या मूर्ती बनवणाऱ्या व्यावसायिकांवर प्रशासनाची नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या कारवाईमुळे इतर मूर्तीकारांनाही एक कडक संदेश मिळाला आहे की, नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल. या घटनेनंतर पर्यावरणाच्या नियमांचे पालन करण्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. प्रशासन आता इतर ठिकाणीही अशा कार्यशाळांवर लक्ष ठेवून असल्याचे सांगण्यात येत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.