रिव्हॉल्यूशनरी गोवन्स (आरजी) पक्षाने माघार घेतल्याने फोंडा पोटनिवडणूक भाजपचे रितेश नाईक, काँग्रेसचे केतन भाटीकर आणि ‘आप’ गीतेश नाईक या तिघांतच रंगणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे. यात भाटीकर यांचीच अधिक चर्चा रंगलेली आहे. या निवडणुकीत ‘मगो’ उमेदवारी मिळवून देईल, असा विश्वास भाटीकरांना होता. परंतु, रवी नाईक यांच्या निधनादिवशीच ‘मगो’चे अध्यक्ष दीपक यांनी भाजपने रवींचे पूत्र रितेश यांनाच उमेदवारी देण्याची मागणी केल्याने निराश होत भाटीकरांनी ‘मगो’ सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करून उमेदवारीही मिळवली. काँग्रेसमध्ये जाऊनही भाटीकरांना ‘मगो’ कार्यकर्तांचा पाठिंबा असल्याचे चित्र दिसत आहे. अशात भाटीकर जिंकले, तर सुदिन यांचे मंत्रिपद आणि ‘मगो’शी युतीबाबत भाजप वेगळाच निर्णय घेऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे. ∙∙∙
फोंडा पोटनिवडणुकीत भाजपने रवी नाईक यांचे ज्येष्ठ सुपूत्र रितेश नाईक यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर माजी नगराध्यक्ष तथा फोंड्यातील भाजप नेते विश्वनाथ दळवी कमालीचे निराश झाले. प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी समजूत काढूनही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेऊ, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आणि रविवारी त्यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चाही केली. सद्यस्थितीत नाराजी विसरून रितेश नाईक यांच्यासाठी काम करण्याचे दळवींनी ठरवले आहे. परंतु, त्यांची नाराजी २०२७ मधील विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीबाबतच होती आणि त्याची हमी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडून घेतल्याचीही चर्चा रंगलीय! ∙∙∙
फोंडा पोटनिवडणुकीत ‘आप’सह ‘आरजी’ही उमेदवार देणार, असे सर्वांनाच वाटत होते. त्यादृष्टीने ‘आरजी’चे अध्यक्ष मनोज परब यांनी गेल्या काही दिवसांपासून फोंड्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकाही घेण्यास सुरुवात केलेली होती. अखेर, रविवारी तलवार ‘म्यान’ करत या निवडणुकीत ‘आरजी’चा उमेदवार नसेल तसेच ‘आरजी’ काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देईल, अशी घोषणा करतानाच युतीवरून परब यांनी काँग्रेसवर तोंडसुखही घेतले. पण, या सर्व घडामोडींत याआधी कायम आक्रमक पवित्र्यात दिसणारे परब यावेळी इतके ‘मऊ’ का पडले? असा प्रश्न ‘आरजी’च्या कार्यकर्त्यांनाही पडला आहे. ∙∙∙
माजी मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत शिवोलीतून आपण उमेदवारी दाखल करणार असे जाहीर केले. ते सध्या भाजपमध्ये आहेत. शिवोलीत कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या दिलायला लोबो या आमदार आहेत. त्यामुळे मांद्रेकर यांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली तर त्याचे काय परिणाम असतील याचा अंदाज आमदार मायकल लोबो यांनी घेणे सुरू केले आहे. भाजपचे मूळ पदाधिकारी व कार्यकर्ते हे दुरावू नयेत यासाठी खास उपाययोजना करण्याची त्यांनी सूचना आपल्या निकटवर्तीयांना दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिवोलीत काय घडेल याविषयी उत्सुकता आता वाढली आहे. ∙∙∙
राजकारणात उतरल्यानंतर सुरुवातीला आमदार आणि थेट विरोधी पक्षनेत्याची माळ गळ्यात पडल्यानंतर कदाचित युरी आलेमाव यांच्यावर त्याचा (विपरित) परिणाम झालेला दिसतो. काँग्रेसबरोबर युती करणाऱ्या गोवा फॉरवर्ड पक्षाच्या प्रमुखावर तथा आमदारांवर बोलताना त्यांनी जे काही शब्द वापरले त्यावरून सध्या राजकारणाला वेगळेच वळण मिळेल, असे संकेत दिसू लागले आहेत. गोवा फॉरवर्डचे नेते दुर्गादास कामत यांनी त्याविषयी स्पष्टीकरण मागितले आहे. अलिकडे आलेमाव हे एल्टन यांना घेऊन अनेक ठिकाणी कार्यक्रमांना उपस्थित असतात. आलेमाव अशा उपस्थितीच पक्षाच्या प्रमुखांना कल्पना देतात का हाही एक प्रश्न. परंतु आलेमाव यांनी सरदेसाई यांच्यावर टीका करून एकप्रकारे त्यांना डिवचले तर आहेच, पण काँग्रेसच्या इतर वरिष्ठ नेत्यांची डोकेदुखी वाढविली आहे, हे नक्की. राजकीय परिपक्वता नसली की, बेछुट विधाने मुखातून बाहेर पडतात आणि पुढे मग ती अडचणीची ठरतात. विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत आपण काँग्रेसबरोबर युतीत राहणार असल्याचे सरदेसाई यांनी अगोदरच जाहीर केले आहे, याची आठवण महत्त्वाची. ∙∙∙
‘आप’चे वेळ्ळीचे आमदार क्रुझ सिल्वा हे शांत स्वभावाचे. शांतपणे राहून मतदारसंघात विकासकामे कशी राबवावी हे कुणी त्यांच्याकडून शिकून घ्यावे. सरकारविरोधात ते आवाज काढतात पण पदरचे राखून. मुख्यमंत्र्यांवर ते सहसा टीका करीत नाहीत. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा अधिवेशनातही त्याचा प्रत्यय आला. क्रूझ बाबाने या अधिवेशनात सरकार विरोधात आवाज उठवला मात्र हातचे राखूनच. सीएम दोतोर सावंतही त्यांची कामे अडवूनही ठेवत नाहीत. पेशाने अभियंते असलेल्या सिल्वा बाबांकडून विरोधी पक्षात असूनही आपल्या मतदारसंघात विकास कसा साधावा हे विरोधी पक्षातील अन्य आमदारांनी शिकून घेण्याची गरज आहे. हुशार राजकारणी म्हणतात ते अशांनाच!. ∙∙∙
गोवा प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणून प्रतीक्षा खलप यांचे एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने त्यांनी सर्व नेत्यांचे आभार मानणारे पोस्टर आपल्या समाजमाध्यमातील अकाऊंटवरून व्हायरल केले. त्यात त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, अलका लांबा, सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, गोवा काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरे , सह-प्रभारी अंजली निंबाळकर, माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्यासह इतरांचेही आभार मानले आहेत. आभाराची औपचारिकता त्यांनी व्यवस्थितरित्या पार पाडली आहे. परंतु वर्षभरात महिला काँग्रेसच्या अध्यक्षांनी किती महिला संघटन मजबूत केले, किती आंदोलने केली, महिला मेळावे किती घेतले या सर्वांचा लेखाजोखा पक्षाकडे असेल, हा भाग वेगळा. यापुढेही त्यांचे हे कार्यक्रम सुरू राहिल. मात्र, त्याचा निश्चित उपयोग किती झाला हे, २०२७ मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत कळून येईलच. तोपर्यंत दुसऱ्या वर्षपूर्तीकडे त्यांचे पद येईल. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.