Ponda By Election: दळवींच्या कार्यकर्त्यांपुढे प्रश्नचिन्ह! अन्‍याय झाल्‍याची भावना; रितेश नाईकांपुढे मोठे आव्हान

Vishwanath Dalvi Ponda: सलग तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले दळवी सध्या भाजपचे दक्षिण गोव्याचे सचिव आहेत. हल्लीच त्यांनी फोंड्याच्या मध्यवर्ती भागात कार्यालयही उघडले आहे.
Vishwanath Dalvi
Vishwanath DalviDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: दिवंगत रवी नाईक यांचे पुत्र रितेश यांना अपेक्षेप्रमाणे भाजपची फोंडा पोटनिवडणुकीची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे या उमेदवारीचे दुसरे इच्छुक विश्वनाथ दळवी यांच्या कार्यकर्त्यांसमोर प्रश्नचिन्ह उभे झाले आहे. वास्तविक रितेशची उमेदवारी साधारण दोन महिन्यांपूर्वीच निश्चित झाली होती; पण भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून गणले जाणारे विश्वनाथ दळवी हेही स्पर्धेत असल्यामुळे उमेदवारी जाहीर करण्यास विलंब होत होता.

दळवी हे ‘नीज भाजपवासी’ म्हणून ओळखले जात असून ते काही वर्षे भाजपचे फोंडा गटाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. सलग तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले दळवी सध्या भाजपचे दक्षिण गोव्याचे सचिव आहेत. गेली तीन वर्षे ते ‘प्रोग्रेसिव्ह फोंडा’तर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवत असून हल्लीच त्यांनी फोंड्याच्या मध्यवर्ती भागात कार्यालयही उघडले आहे. महत्त्वाचे म्हणजे, त्यांच्याकडे युवा फौज मोठ्या प्रमाणात आहे.

त्यातून ते मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे निकटवर्तीय म्हणून मानले जात असल्यामुळे अनेक कार्यकर्त्यांना दळवींना उमेदवारी मिळेल, असे वाटत होते. भाजपने उमेदवार म्हणून जी दोन नावे पाठविली होती, त्यातही दळवींचे नाव असल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. पण, आता त्यांना डावलल्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

२०१९ साली तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन झाल्यानंतर भाजपने लगेच झालेल्या पणजी पोटनिवडणुकीत त्यांचे पुत्र उत्पल यांना डावलून सिद्धार्थ कुंकळयेकर यांना जशी उमेदवारी दिली, तसे यावेळी फोंड्यात होईल, असे अनेकांना वाटत होते. पण तसे न झाल्यामुळे दळवींचे कार्यकर्ते निराश झालेले दिसून आले. मागील वेळी निवडणुकीच्या तोंडावर तेव्हा काँग्रेसचे आमदार असलेल्या रवी नाईकांना भाजपमध्ये आणून दिलेल्या उमेदवारीमुळे दळवींवर झालेला अन्याय आता रितेशला दिलेल्या उमेदवारीमुळे मागील पानावरून पुढे सुरू झाला आहे, असेही भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी बोलून दाखविले.

‘इनफ इज इनफ’ चळवळीतले सामाजिक कार्यकर्ते विराज सप्रे यांनीही अशाच प्रकारची भावना ‘गोमन्तक टीव्ही’च्या फोंडा पोटनिवडणुकीवरील कार्यक्रमात व्यक्त केली होती. पण, राजकीय विश्लेषकांना यामागे असलेल्या एका वेगळ्याच रणनीतीचा वास येत आहे. २०२७ सालची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून राज्यातील भंडारी समाजाला आपल्याकडे वळवण्याकरता भाजपने हा डाव खेळला असल्याचे मत अनेक विश्लेषकांनी व्यक्त केले.

काँग्रेसने उच्चवर्णीय डॉ. केतन भाटीकर यांना उमेदवारी दिल्यामुळे आपण बहुजन समाजाचे तारक असल्याचे दाखविण्याकरता भाजपने रितेशच्या खांद्यावर बंदूक ठेवली असल्याचेही काही राजकीय तज्ज्ञांनी बोलून दाखवले. आता भाजपची ही रणनीती किती फलदायी ठरते, दळवींचे कार्यकर्ते कसे रिॲक्ट होतात, याचे उत्तर येत्या काही दिवसांत मिळेल, एवढे मात्र निश्चित.

दळवींशी ‘पॅचअप’?

उमेदवारी डावललेल्या विश्वनाथ दळवी यांच्याशी भाजपने ‘पॅचअप’ करण्याचा प्रयत्न सुरू आहेत. या आमदारकीचा कार्यकाळ फक्त सहा महिन्यांचा असल्यामुळे २०१७ सालच्या निवडणुकीत उमेदवारीकरता दळवींच्या नावाचा विचार केला जाईल, असे भाजप श्रेष्ठींनी आश्वासन दिले असल्याचेही त्यांनी सांगितले. आता त्यात किती तथ्य आहे, याचे उत्तर मिळण्याकरता आणखी सहा महिने वाट पाहावी लागणार आहे.

Vishwanath Dalvi
Ponda By Election: फोंड्यात भाजपला 'गटबाजी'ची भीती! उमेदवारीचा पेच सुटेना; युती असूनही मगोचे काही कार्यकर्ते काँग्रेससोबत

रितेश पुढे मोठे आव्हान

भाजपने रितेशना उमेदवारी दिली असली तरी त्यांच्यापुढे मोठे आव्हान उभे असल्याचे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत रवींसारखा राजकारणातील अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिलेला धुरंधर नेता रिंगणात असूनही भाजप फक्त ७७ मतांनी जिंकला होता. त्यावेळी आप व आरजीने एकूण २,३९० मते प्राप्त करूनही भाजप काठावर जिंकला होता, हे विशेष. अर्थात त्यावेळी काँग्रेसमधून आयात केलेल्या रवींना उमेदवारी दिल्यामुळे नाराज झालेल्या काही जुन्या भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाविरोधात मतदान केले होते, हेही तितकेच खरे आहे. आता तशीच परिस्थिती यावेळी असल्यामुळे काय होईल हे सांगणे कठीण दिसते आहे.

Vishwanath Dalvi
Ponda Fort: शंभूराजांच्या शौर्याची देतो साक्ष, गोव्यातील स्वराज्य रक्षक 'फोंडा किल्ला'; 600 मावळ्यांनी पोर्तुगीजांना कसं रोखलं?

आप, आरजी रिंगणात?

फोंडा पोटनिवडणुकीत ‘आप’ने रिंगणात उतरण्याचे निश्चित केले असून सामाजिक कार्यकर्ते गीतेश नाईक यांना उमेदवारी दिली आहे. आरजीही उमेदवार रिंगणात उतरविणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. एवढेच नव्हे, तर माजी मंत्री मिकी पाशेको यांनीही या पोटनिवडणुकीत आपला उमेदवार असणार, असे जाहीर केले आहे. हा काँग्रेसला अपशकून करण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात असले तरी तो खराच ‘अपशकून’ ठरतो की काय, हे मात्र बघावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com