गोवा: भाजपने निवडणुकीवेळी प्रत्येक कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे मोठ्या संख्येने मते भाजपकडे वळली आणि तो पक्ष बहुमतापर्यंत पोचला, असाही तर्क आता व्यक्त केला जात आहे. पण सरकार स्थापनेनंतर त्यांनी थुंकी गिळण्याचा प्रयत्न करताना ते मोफत सिलिंडर केवळ ‘बीपीएल’वाल्यांसाठीच असल्याची सारवासारव केली आणि इतर गरजूंच्या तोंडाला पाने पुसली. आता तर घरगुती गॅस सिलिंडरचा दर हजारावर पोचल्याने ग्राहक, विशेषतः गृहिणी भाजपच्या नावाने बोटे म़ोडत आहेत. दुसरीकडे महिला मोर्चाच्या नेत्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीकडे बोट दाखवून नामानिराळे राहाण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्वसामान्य मात्र कपाळावर हात मारत आहेत. ∙∙∙
लूटमार शपथविधी
नव्या सरकारचा शपथविधी सोहळा सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याला कारणही तसेच आहे. राज्यातील लाभार्थ्यांना अर्थसाहाय्य वेळेवर मिळत नसताना शपथविधी सोहळ्यावर तब्बल साडेपाच कोटी रुपयांची उधळपट्टी करून जनतेच्या जखमेवर मीठ चोळल्याचा आरोप केला जात आहे. याप्रकरणी न्यायालयात याचिकाही दाखल झाली आहे. या सोहळ्याच्या आयोजनाची जंत्री आता बाहेर येऊ लागली आहे.
सोहळ्यासाठी जे भाडोत्री साहित्य आणले, त्याची बिले पाहता सर्व साहित्य विकत घेता आले असते. प्लास्टिक खुर्चीवर केवळ सफेद कपडा घालून व्हीआयपी दर आकारला गेला. जेवण-खाण आणि इतर खर्च पाहता अवघ्या अर्ध्या दिवसासाठी साडेपाच कोटी रुपये कसे खर्च केले, याचा सखोल अभ्यास केल्यास कोणालाही पी.एचडी पदवी मिळू शकते. लोक असेही म्हणतात, की साडेपाच कोटी काय अन साडेपाच लाख रुपये काय, शपथविधी झालाच असता ना? मग ऋण काढून सण साजरा का केला? हेच काय ते गरिबांचे सरकार? ∙∙∙
काँग्रेसचे कोरडे इशारे...
दिवसेंदिवस इंधन दरांत वाढ करणाऱ्या केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरमध्ये तब्बल ५० रुपयांची वाढ करून सर्वसामान्यांचे जीणे मुश्कील बनवले आहे. समाज माध्यमांतून यावर जोरदार टीका होत असताना बहुतांश विरोधी पक्ष केवळ शब्दांचे बाण सोडत आहेत. गोवा प्रदेश काँग्रेसने भाजप सरकारवर टीका करून रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. खरे तर केवळ देशातच नव्हे, तर गोव्यातही प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसच आहे. जनतेच्या रोजच्या गरजेशी निगडित अनेक प्रश्नांवर केवळ इशारे न देता प्रत्यक्ष कृती होणे अपेक्षित होते. पण तसे होताना दिसत नाही. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी दररोज ट्विट करून भाजपवर शरसंधान साधतात. पण प्रत्यक्षात काहीच नाही. हाच कित्ता राज्यातील काँग्रेस गिरवत आहे का, असा प्रश्न लोकांना पडला आहे. ∙∙∙
नगरसेवकांनी घेतला जेजुचाही आशीर्वाद
सध्या शिर्डी वारीवर गेलेल्या मडगावच्या नगरसेवकांचा दौरा शहरात चर्चेचा विषय बनलेला असतानाच या नगरसेवकांनी काल नाशिक येथे जाऊन मिनी जीजस चर्चलाही भेट दिली आणि जेजुचेही आशीर्वाद घेतले. सध्या मडगाव पालिकेत नगराध्यक्ष बदलण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या असतानाच ही शिर्डी वारी आयोजित केल्याने भलती-सलती चर्चा शहरात सुरू झाली आहे. त्यातच नवा नगराध्यक्ष बनण्यासाठी आतुर झालेले घन:श्याम शिरोडकर हेही या नगरसेवकांमध्ये सामील असल्याने या दौऱ्याकडे राजकीय चष्म्यातूनच पाहिले जात आहे.∙∙∙
वरातीमागून घोडे...
वाहतुकीच्या सूचना देणारे फलक कुठे आणि कसे लावावेत, याचे तारतम्य असायला हवे म्हणतात ते खरे आहे. उगाच आहेत फलक ते लावले...असा प्रकार होता कामा नये. आता हेच पहा ना, पणजी ते फोंडा या राष्ट्रीय महामार्गावर कुंडई येथे चढाव लागतो आणि नंतर उतार. आता चढावाचे सोडा; पण उतार सुरू झाल्यावर वाहनचालकाला वाहनाचा वेग कमी करावा लागतो, हे जाहीर आहे.
विशेष म्हणजे वाहनाचे ब्रेकही ठीक असावे लागते. आता हे ब्रेक ठीक आहेत की नाही हे चालकाने ठरवायचे असते; पण या उतरणीवर असलेला एक सरकारी सूचना फलक आपले लक्ष वेधून घेतो. जवळपास सर्व उतरण संपल्यावर डाव्या बाजूला तो फलक दिसतो. तो म्हणजे, ‘ब्रेक तपासून घ्या’ असा लिहिलेला फलक. वास्तविक उतरण सुरू व्हायच्या आधी हा फलक लावायला हवा होता; पण चक्क उतरण संपल्यावर हा फलक आपल्याला दिसतो. त्यामुळे हा फलक कदाचित पुढील उतरणीसाठी असावा, असे मिश्किलीने बोलले जाते. ∙∙∙
सुंब जळला, तरी...
‘सुंब जळला, तरी पीळ काही जात नाही’, ही म्हण जुनी जरी असली तरी आताच्या काही मोजक्या राजकारण्यांना ती चपखल लागू होते. विशेषतः मिकी पाशेको हे त्यासाठी अगदी परफेक्ट सूट होतात. सलग दोन विधानसभा निवडणुकांमध्ये मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली असली तरी त्यांची गुर्मी काही अजून निवळलेली नाही. त्यांनी यापूर्वी चर्चिल आलेमाव यांचा बाणावलीत आणि नंतर आलेक्स सिक्वेरा यांचा नुवेत पराभव केलेला असला तरी त्यामागील कारणे वेगळी आहेत.
पण ते त्यांना कळले नाही. तो आपला व्यक्तिगत विजय असल्याचा समज त्यांनी करून घेतला आणि ते आपल्याच हवामहलात वावरू लागले. आमदारकी मिळताच त्यांनी इतरांना धडा शिकविण्याचे उपदव्याप सतत केले व त्यात स्वतःचेच हात पोळून घेतले. एक मात्र खरे, की इतके सगळे होऊनही सतत पत्रकार परिषदा घेण्याची त्यांची हौस काही कमी झालेली नाही. विशेष म्हणजे, त्यांच्याकडे नवा कोणताच मुद्दा नसतो, हेही तेवढेच खरे. पण येनकेन प्रकारेण प्रकाशझोतात राहण्यासाठी ते करत असलेल्या उठाठेवी लक्ष्यवेधी असतात. ∙∙∙
कदंब ‘अनफिट’
डिझेल संपल्यामुळे सावईवेरे येथे वाटेतच बस बंद पडल्याची घटना ताजी असतानाच बदामी-कर्नाटकहून पणजीला परतणाऱ्या कदंब महामंडळाच्या बसचा टायर धुळेर-म्हापसा येथे अचानक बाहेर आला. सुदैवाने बसचा वेग कमी असल्याने संभाव्य धोका टळला. हे कमी की काय, म्हणून सावईवेरे-फोंडा मार्गावरील आणखी एक बस रविवारी नादुरुस्त होऊन आपेव्हाळ येथे बंद पडली. यामुळे प्रवाशांचा खोळंबा होतोच, शिवाय कदंबचा प्रवास कितपत सुरक्षित, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
एका बाजूला कदंब धावेसारख्या ग्रामीण भागातील गावाला वातानुकुलीत इलेक्ट्रिक बसची सेवा देत असले, तरी दुसऱ्या बाजूला जर्जर, खिळखिळ्या झालेल्या आणि वाटेतच बंद पडणाऱ्या बसेसमुळे कदंबचा नावलौकिक रसातळाला चालला आहे. इलेक्ट्रिक, वातानुकुलीत बसेसप्रमाणे जुन्या, नादुरुस्त बसेसचा विषयही कदंबने तातडीने निकाली काढला पाहिजे. खरे तर कोणतीही दुर्घटना होण्यापूर्वीच कदंब महामंडळाने नादुरुस्त बसेसचा विषय धसास लावायला हवा. अन्यथा एखादी अप्रिय घटना घडून गेल्यावर पश्चात्ताप करण्यात काहीच अर्थ असणार नाही, असे प्रवासी बोलत आहेत.∙∙∙
‘आयकर’ने जागवला ‘तेजपाल’
राज्यात दहा वर्षांपूर्वी तरुण तेजपाल प्रकरण गाजले होते. आता त्याची निर्दोष मुक्तता झाली असली तरी त्याच्यामागील न्यायालयाचा ससेमिरा सुटलेला नाही आणि उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. हे प्रकरण सुरू असतानाच प्राप्तीकर खात्यातील तीन निरीक्षकांवर त्याच कार्यालयातील सहकारी महिला कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार व छळाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे या तीन आयकर अधिकाऱ्यांनी पुन्हा नव्याने ‘तेजपाल’ प्रकरण जागे केले आहे. या अधिकाऱ्यांनीही सहकारी महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत आहेत. पीडितेने या अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल करण्याचे दाखवलेले धाडस त्या तेजपाल प्रकरणाशी साधर्म्य साधणारे आहे. या तीन ‘तेजपाल’ना त्यांची जागा दाखवून देण्याची महिलांनी महाकालीचे रूप धारण करायला हवे. अन्याय सोसून न घेता त्याला वाचा फोडण्यासाठी पीडित महिलेने घेतल्या पावलामुळे अनेकांमध्ये धाडस निर्माण होईल. ∙∙∙
पंचायत निवडणुकीचे तळ्यात - मळ्यात
सध्या ग्रामपातळीवर एकच प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे पंचायत निवडणुका कधी? विधानसभा निवडणूक तर झाली. आता राजकीय क्षेत्रातील लोकांना वेध लागले आहेत ते पंचायत निवडणुकीचे. वास्तविक कायद्याप्रमाणे जूनच्या पहिल्या आठवड्यात पंचायतींची मुदत संपते. त्यामुळे नवीन निवडणूक घेणे क्रमप्राप्त आहे; पण अजून या निवडणुकीसाठी तळ्यात - मळ्यातसारखा प्रकार चालला आहे. कधी ही निवडणूक पुढे ढकलण्यात येते की काय, कधी जूनच्या पहिल्या पंधरवड्यात घेणार आहे, अशी आवई उठते, नेमके कुणालाच काही माहीत नाही आणि पंचायतमंत्री तर स्पष्ट काही बोलत नाहीत. सगळाच बेभरंवशाचा कारभार. .∙∙∙
बाबू - विश्वजीत भेट
नवे नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे यांनी 16 ब कलमाखालील जमिनींची रूपांतरण प्रक्रिया बंद केल्याच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री बाबू कवळेकर यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याची वदंता आहे. कवळेकर यांनी 1400 पेक्षा जमीन रूपांतरणाचे प्रस्ताव हाती घेतले होते. विजय सरदेसाई हे नगरनियोजन मंत्री असताना त्यांनी ही 16 ब कलमाची प्रक्रिया सुरू केली होती. पण बाबू मंत्री झाल्यावर त्यांनी हे प्रस्ताव रोखून धरले होते. त्यावेळेस विजय सरदेसाई बाबूंना भेटले. त्यानंतर जादूची कांडी फिरावी, तशी ही प्रक्रिया सुरू झाली होती. त्या पार्श्वभूमीवर बाबूंच्या विश्वजीत राणे यांच्या भेटीकडे संशयाने पाहिले जात आहे. बाबूंचे समर्थक त्यांच्या वाढदिवसाचे आमंत्रण देण्यासाठी वाळपईला गेले होते, अशीही चर्चा आहे. खरे - खोटे तेच जाणोत!∙∙∙
कर्मभूमी गोवा, विद्याभूमी सांगली
कोणत्या जातीत जन्माला यायचे ते आपल्या हातात नसते. मात्र, कर्मभूमी व विद्याभूमी निवडण्याचे आपल्याच हातात असते. सभापती रमेश तवडकर यांनी आपली कर्मभूमी काणकोण तथा पर्यायाने गोव्याची निवड केली. मात्र, क्रीडा शिक्षक होण्यासाठी विद्याभूमी म्हणून त्यांनी मिरज - सांगलीची निवड केली.
त्याचा सार्थ अभिमान त्यांना व सांगलीमधील त्यांच्या शिक्षक व संस्थाचालकांनाही आहे. त्याचसाठी यापूर्वी मंत्री झाल्यानंतर सांगली येथे त्यांच्या चाहत्यांनी त्यांचा गौरव केला होता. आता सभापती झाल्यानंतरही चाहत्यांनी त्यांचा गौरव केला. काही का असेना, सभापती विद्याभूमीच्या प्रेमात पडले आहेत, अशी चर्चा काणकोणमधील भाजप विजय संकल्पपूर्ती मेळाव्यावेळी सुरू होती. कारण खास या मेळाव्यासाठी सांगलीहून वीस - तीस चाहते आले होते. ∙∙∙
‘कदंब’ने साधले ‘टायमिंग’
सत्तरी तालुक्यातील धावे हा निसर्गसंपन्न गाव. ऐंशीच्या दशकात गोव्यात काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यानंतर प्रतापसिंह राणे हे मुख्यमंत्री झाले. त्यांनी कदंब परिवहन महामंडळाची स्थापना केली. सरकारी मालकीच्या या महामंडळाची पहिली बस धावली ती याच धावे गावातून. यामुळे धावे गावाचे नाव गोव्यात सर्वतोमुखी झाले. धावे ते आगशी मार्गावर कदंबच्या दिवसातून चार फेऱ्या होऊ लागल्या आणि कदंबची एक वेगळी ओळख गोवेकरांमध्ये निर्माण झाली. ‘जीडीएक्स - 0001’ या क्रमांकाची ही कदंबची पहिली बस धावेत सुरू झाली. महामंडळात या बसला विशेष महत्त्व आहे. वर्धापनदिनी ही बस सजवून तिची पूजाही केली जाते. रौप्य महोत्सवावेळी संपूर्ण गोवा राज्यात तिची मिरवणूक काढली होती. ‘कदंब’मध्ये या बसप्रमाणेच धावे गावालाही महत्त्व आहे. म्हणूनच ग्रामीण भागातील कदंबची पहिली इलेक्ट्रीक बस धावेतून पणजीपर्यंत धावू लागली. कदंबच्या या अनोख्या प्रयोगाचे सर्वत्र कौतुक होऊ लागले आहे.∙∙∙
ही कसली वकिली?
रशिया युक्रेन युद्धामुळे गॅस दरवाढ होत असल्याचा हास्यास्पद वकिलीवजा खुलासा भाजपच्या महिला आघाडीच्या नेत्या आता करू लागल्याने राज्यातील मेटाकुटीला आलेली जनता संतापली आहे. महागाईचे चटके फक्त गरीब जनतेला भोगावे लागत आहेत. बोल घेवडे नेतेमंडळी सरकारच्या खर्चातून स्वत:चा खर्च भागवतात. दोनशे रुपयांत महिनाभर मोबाईल वापरता येत असतानाही दर महिना टेलिफोन खर्च म्हणून पाच हजार लुटतात.
पाणी फुकट मिळत असतानाही पाणी बिल, वीज बिल, मोफत पेट्रोल डिझेल, आमदार- मंत्री बनताच दर महिन्याला कर्मचाऱ्यांवर खर्च करण्यासाठी लाखो रुपये सरकारी तिजोरीतून उकळले जातात. याविरुद्ध महिला आघाडीच्या नेत्या का बोलत नाही? आमदार - मंत्री म्हणून वेगळे भत्ते का दिले जातात, यावर थोडे बोला आणि मगच महागाईसंदर्भात थोडा धीर धरा म्हणून जनतेला सल्ला द्या, अशा शब्दांत त्यांच्यावर खरपूस टीका होऊ लागली आहे. ∙∙∙
पालिकेतील ‘पति’राजकारण!
पंचायतींप्रमाणेच आता पालिका मंडळातही पतिराजकारण फॉर्मात आहे. उत्तर गोव्यातील प्रमुख व्यापारपेठ म्हणून लौकीक असलेल्या आणि मसाल्याच्या पदार्थांसाठी देश-विदेशात प्रसिद्ध असलेल्या शहराच्या नगराध्यक्षांचे पती हे कित्येकदा नगराध्यक्षांच्या दालनात असतात, हे पाहून केवळ विरोधी गटातीलच नव्हे, तर सत्ताधारी गटातीलही नगरसेवक क्रोधित झालेत. परंतु, महिलांना राजकारणात पुरुषांनी सहकार्य करायलाच हवे, असाही एक मतप्रवाह काही नगरसेवकांत आहे.
असे असले तरी नगराध्यक्षा विवेकबुद्धीचा वापर न करता पतिराजांनाच ‘गुरू’ मानून ते सांगतील तसे निर्णय घेत राजकारण हाताळत आहेत. त्यांच्या पतिराजांचाच राजकारणावर वरचष्मा आहे, असा बोलबाला आहे. इतर नगरसेवकांबाबत असे अभावानेच घडत असले तरी, विरोधी गटातील एक नगरसेविका, ज्यांचे ‘कोरगाव’शी साधर्म्य आहे, त्यांचेही पतिराजही पालिका राजकारणात सक्रिय असल्याची चर्चा सध्या ऐकावयास मिळते आहे. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.