Goa Assembly Elections Dainik Gomantak
गोवा

दिवंगतांच्या नावांवर मतांसाठी जोगवा! खरी कुजबुज

विरोधकांकडून टीका

दैनिक गोमन्तक

दिवंगतांच्या नावांवर मतांसाठी जोगवा!

म्हापशाचे आमदार ज्योशुआ डिसोझा हे स्वत:च्या कर्तबगाराची आधारावर नव्हे, तर वडिलांच्या फ्रांसिस डिसोझा व माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची लोकप्रियता यांचा आधार घेत पुण्यपुण्याईच्या आधारे सध्या मतांचा जोगवा मागत आहेत, अशी टीका सध्या विरोधकांकडून केली जात आहे. त्याबाबत बरेच तथ्यही जाणवते. म्हापसा भाजपच्या जाहीरनाम्यात त्या दोन्ही दिवंगत नेत्यांची मोठ्या आकाराची छायाचित्रे प्रसिद्ध करून मतदारांना भावनिक आवाहन करण्याचा प्रयत्न दिसून येतो. पोटनिवडणुकीनंतर गेल्या सुमारे तीन वर्षांत आमदाराला म्हापशात एकही महत्त्वाचा प्रकल्प राज्य सरकारमार्फत पूर्ण करता आला नाही व त्यामुळेच भाजपवर अशी नामुष्की आलीय, असा मुद्दा सध्या काँग्रेसचे उमेदवार सुधीर कांदोळकर मतदारांसमोर मांडत आहेत.

अलका लांबा अन् ‘कोकणी’

राज्यात सध्या राजकीय पक्षांच्या राष्ट्रीय नेत्यांनी प्रचाराचा नेट धरला आहे. अनेक दिल्लीतील नेते गेल्या काही दिवसांपासून ठाण मांडून आहेत. विरोधकांवर तोंडसुख घेत तसेच आरोप करून स्वतःच्या पक्षाची पाठ थोपटून घेत आहेत. हिंदीतून पत्रकार परिषदेत बोलताना काही कोकणी शब्दांचा वापर करून ‘हम भी किसीसे कम नहीं’ असे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेसच्या सोशल मिडियाच्या प्रमुख व राष्ट्रीय प्रवक्त्या अलका लांबा यांनी पत्रकार परिषदेत बोलताना काही कोकणी ओळी वाचण्याचा प्रयत्न केला. त्यांचा उच्चार जरी कोकणी भाषिकांसारखा नसला तरी त्यांनी प्रयत्न केला. हिंदीतून धडाधड बोलणाऱ्या लांबा यांना मात्र कोकणी शब्द उच्चारताना कठीण जात होते. गोव्यात येऊन किमान तोडकी मोडकी कोकणी भाषा जरी त्यांनी अवगत केली असली, तरी त्यांना गोमंतकियांजवळ पोहचण्यास वेळ लागेल. कोकणी भाषा बोलून यापूर्वीही अनेक नेत्यांना गोमंतकियांना खुश करण्याचे प्रयत्न केले आहेत. लांबा यांनीही तो प्रयत्न केला, मात्र लोक तेवढ्यापुरते खुश होतात व विसरूनही जातात. ∙∙∙

जानी दोस्त, कधी दुश्मन...

राजकारणात दोन पक्के वैरी कधी व कसे एकमेकांचे जिवलग दोस्त होतील, हे जसे सांगता येत नाही, तसे एकमेकांचे जानी दोस्त कधी कट्टर दुश्मन होतील, याचाही भरवसा नाही. म्हापशातील राजकारणातही ‘दोस्त, दोस्त ना रहा...’ अशीच स्थिती सध्या निर्माण झाली आहे. म्हापशातील तृणमूल काँग्रेसचे (Goa TMC) उमेदवार तारक आरोलकर सुमारे वीस दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये होते व त्या वेळी ते कांदोळकर यांचे गुणगान करून काँग्रेसचा प्रचारही करीत होते. परंतु, काँग्रेसने हळदोणेत ऐन वेळी स्वत:ला उमेदवारी दिली नसल्याने आरोलकर भलतेच चिडलेले असून, तृणमूल काँग्रेसमध्ये उडी घेऊन त्यांनी म्हापशातून उमेदवारीही दाखल केली आहे. एरवी त्या दोघांमधील एक समान सूत्र म्हणजे ते दोघेही भंडारी समाज, बांधकाम व्यवसाय, सामाजिक क्षेत्र अशा माध्यमांतून अगदी खांद्याला खांदा लावून कार्यरत असायचे. परंतु, राजकारणामुळे सध्या त्या दोघांच्या एकीत आता उभी फूट पडलेली आहे.(Political discussion about Mhapsha MLA Joshua D Souza for goa assembly election)

भाजपचे ‘महानंद’ अज्ञातवासात?

रोहन खंवटे यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यांना पर्वरीतून उमेदवारी बहाल करण्यात आल्याने त्या उमेदवारीवर गेली सुमारे दीड-दोन दशके डोळा ठेवून असलेले उत्तर गोवा भाजप अध्यक्ष महानंद अस्नोडकर यांची आमदार होण्याची उरलीसुरली स्वप्ने धुळीस मिळाली आहेत. अध्यक्ष झाल्यापासून त्यांचा उत्साह भलताच द्विगुणित झाला होता व त्यामुळे ते पक्षकार्यात प्रमाणापेक्षाही जास्त तन-मन-धनपूर्वक क्रियाशील झाले होते. परंतु, भाजपने अचानक आणि अनपेक्षितपणे खंवटे यांना मानसन्मान दिल्यानंतर अस्नोडकर यांची बोलतीच आता बंद झाली आहे. इतर पक्षांत जाऊनही काहीच फायदा नाही, हे हेरून ‘आपलेच दात अन्‍ आपलेच ओठ’ अशा मानसिकतेतून पक्षाचा निर्णयाचा उघड निषेधही त्यांनी केला नाही. अस्नोडकर सध्या राजकीय अज्ञातवासात आहेत, असेच प्रकर्षाने जाणवते. कारण, कोणते तरी कारण पुढे करून पर्वरीतील तसेच उत्तर गोव्यातील बहुतांश कार्यक्रमांना ते अनुपस्थित असतात. ते पक्षाशी खरोखरच प्रामाणित असतील तर भाजपच्या पर्वरीतील प्रचारावेळी सुमारे नव्वद टक्के कार्यक्रमांना ते कसे काय अनुपस्थित असतात व याला ‘मूकनिषेध’ म्हणावा का असाही सवाल खंवटे यांच्या काही समर्थकांकडून केला जात आहे. ∙∙∙

खाण अवलंबीत जाम खूष

गेली दहा एक वर्षे गोव्यातील खाणी बंद आहेत. केंद्रात व राज्यात भाजप सत्तेत असूनही केवळ आश्वासनेच दिली जात असल्याने या लोकांत संताप आहे. प्रत्येक निवडणुकीवेळी सर्वच पक्षांकडून त्या सुरू करण्याची केवळ आश्वासने दिली जातात, पण प्रत्यक्षात काही त्या सुरू झालेल्या नाहीत. कारण मुद्दा कायदेशीर बाबींचा आहे, ते कोणीच लक्षात घेत नाही. यावेळी तर भाजप, काँग्रेस बरोबरच आप व तृणमूलनेही खाणींचे वचन दिले आहे व त्यामुळे ते खूष आहेत. त्यांच्या मते कोणी का सत्तेवर येईना, त्यांचा मतलब खाणीशी आहे. ∙∙∙

कारापूरचा जुगारी अड्डा कम् वसुली केंद्र

निवडणूक आयोगाच्या (Election Commission) हळणीला चकवून पैसे स्वीकारता यावेत, यासाठी एक नवीच शक्कल कारापूर येथील काही जुगाऱ्यानी लढवली आहे. येथून निवडणुकीतील उमेदवारांशी ''सेटिंग'' केले जाते. कुडप, कारापूर येथे असलेल्या एका जगारी अड्ड्याच्या परिसरात येत शनिवारी तिन्हीसांजेला मये मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराने काहींजणांशी चर्चा केली. ही चर्चा अर्थपूर्ण असल्याचे उपस्थितांना पाहिले. ''पेमेंट''साठी ओळखल्या जाणाऱ्या या उमेदवाराची येथली उपस्थिती जशी स्थानिकांना खटकली तसेच येथील जुगारी अड्ड्याकडे होणारे पोलिसांचे दुर्लक्षही. येथील हायस्कुलच्या जवळच असलेला हा अड्डा गेले. अनेक महिने विनाव्यत्यय चालतो आणि जुगाराचे व्यसन असलेल्यांची येथे नेहमीच वर्दळ असते. आता येथे निवडणुकीसाठीचे ''सेटिंग''ही केले जात असल्याचे दिसते. यदाकदाचित ते उमेदवार निवडून आल्यास जुगाराला सरकारी अभय तर मिळणार नाही ना? असा प्रश्न स्थानिकाना पडला आहे. निवडणूक आयोगाने येथील कारवायांची गंभीर दखल घेणे उचित ठरेल. ∙∙∙

आमदारांची कारकीर्द तपासा!

शिरोडा मतदारसंघात सध्या उमेदवारांची मोठी चलती आहे. या मतदारसंघात माजी आमदारांना सध्या नागरिकांच्या अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते आणि ते साहजिक आहे. पण आपचे उमेदवार माजी आमदार महादेव नाईक भलतेच खमके. उमेदवारी दाखल केल्यानंतर त्यांनी आपली आणि मागच्या आमदारांची कारकिर्द तपासा असे आव्हानच दिले. आपण अमुक अमुक सरकारी नोकऱ्या दिल्या हे सांगायला ते विसरले नाहीत. पण आमदार मंत्री थेट सरकारी नोकऱ्या देऊ शकत नाही, हे महादेव नाईक विसरले. आता त्यांचेही खरेच की, सत्तरीचा बाबा जर दीड हजार नोकऱ्या दिल्याचे जाहीर सांगतो तर महादेव कुठे चुकले हो... नाही का! ∙∙∙

मंत्रिपदाची आमिषे?

उमेदवारांना मंत्रीपदाची आमिषे दाखविणे ठीक आहे, पण मुख्यमंत्री तर चक्क उमेदवारांऐवजी मतदारांनाच मंत्रीपदाचे आमिष दाखवित असल्याने एक चर्चेचा विषय ठरला आहे. दयानंद सोपटे, राजेश पाटणेकर यांच्या प्रचाराला फिरताना मुख्यमंत्री डॉ. सावंत हे आमदाराला नव्हे, तर चक्क मंत्र्यांना निवडून द्या, असे जाहीर आवाहन मतदारांना करीत आहेत. निवडून येण्यापूर्वीच मंत्री ठरविले? डिचोली व मांद्रे या दोन्हीही मतदारसंघात भाजप उमेदवारांना निवडून येण्याची खात्री नसल्याने निवडून आणण्यासाठी चक्क मतदारांनाच मंत्रिपदाचे आमिष तर दाखवले जात नाही ना? अशी शंका मतदारांना पडली आहे.∙∙∙

‘पिक्चर अभी बाकी है’

सध्या अमित पाटकर यांच्याबरोबर प्रचारात सक्रिय झालेले श्याम सातार्डेकर हे वीजमंत्री नीलेश काब्राल यांच्यावर सडकून टीका करू लागले आहेत. श्याम म्हणतात, काब्राल यांच्या भानगडींचे आपल्याकडे जे लिस्ट आहे, ते बरेच मोठे असून त्यावर एक पुस्तक होऊ शकेल. त्यांनी एका सभेत काब्रालच्या दुष्कृत्यांचा पाढा वाचलाही. पण ते म्हणतात, हा फक्त ट्रेलर आहे. ‘पिक्चर अभी बाकी है!’ ∙∙∙

‘हर बोले’ची खिल्ली!

प्रियोळ मतदारसंघात (Priol Constituency ) सध्या गोविंद गावडे यांच्या ''हर बोले'' ची खिल्ली उडवणारे बरेच व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यात न केलेल्या कामांचे श्रेय उपटणाऱ्या गावडे यांचा सोदाहरण पर्दाफाश केला जात आहे. एका व्हिडिओत तर लोकवावाद्यांच्या तालावर हर बोले फटींग बोले.... हे मार्मिक गीत चांगलीच करमणूक करते. कलाकारांना कोविड काळात कार्यक्रम नसल्याने त्यांचे जे हाल झाले आहेत, त्यावर दिलासा म्हणून कला संस्कृती खात्यातर्फे आर्थिक मदतीची योजना गावडे यांनी आखली होती. मात्र प्रत्यक्षात ती योजना कलाकारांपर्यंत पोचलीच नाही, त्यामुळे कलाकार बरेच नाराज झाले आहेत.∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

Paroda Murder Case: पारोड्यात महिलेचा अज्ञाताकडून खून! संशयित कामगाराचा शोध सुरू

एकाच दिवशी Cash For Job मधील ठकसेनांना जामीन! तक्रारदारांची मात्र चिंता संपेना

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

SCROLL FOR NEXT