Goa Police: गोव्यात जी सोन्याची तस्करी होत आहे, तिचा थेट दुबई येथील दाऊद गँगशी संबंध असून भटकळच्या नबिल आणि हुसेन या दोन व्यक्ती त्यात कार्यरत आहेत. दुबईहून हे सोने वाहून आणण्यासाठी गोव्यातील निष्पाप युवकांचा वापर केला जातो आणि त्यांनी नकार दिल्यास त्यांना जिवंत मारण्याच्या धमक्या दिल्या जातात, अशा आशयाची बातमी काल ‘गोमन्तक टीव्ही’ने प्रसिद्ध केल्यानंतर सगळीकडे खळबळ माजली होती.
या वृत्ताची आता दक्षिण गोव्यातील पोलीस यंत्रणेने गंभीर दखल घेतली असून वास्कोतील पोलिसांना त्या संदर्भात सखोल चौकशी करण्याच्या सूचना खात्याअंतर्गत करण्यात आल्या आहेत.
वास्कोतील तीन युवकांचा हवाला देत ‘गोमन्तक टीव्ही’ने हे वृत्त उजेडात आणले होते. हे सोने दुबईहून आणले जाते आणि सोने घेऊन येणाऱ्या युवकांना प्रत्येक ट्रीपमागे २० ते २५ हजार रुपये मोबदला दिला जातो, अशी माहिती या युवकांनी दिली. या तस्करीत भटकळ येथील नबील आणि हुसेन या दोन व्यक्तींचा हात असल्याची माहिती त्यांनी दिली होती.
नुकतेच दाबोळी विमानतळावर जे पाच कोटींचे तस्करीचे सोने पकडले, ते सोनेही या भटकळ येथील तस्करासाठीच आणले गेले होते, अशी माहिती त्यांनी दिली होती. त्या दोघांची नावे पोलिसांना दिली आहेत, पण अजूनही त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप या युवकांनी केला होता.
यानंतर ही बातमी आज ‘गोमन्तक’वर प्रसिद्ध झाली. उपलब्ध माहितीप्रमाणे, या बातमीची दक्षिण गोव्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्वरित दखल घेताना याची चौकशी करून स्थानिक पोलिसांनी आपल्याला अहवाल सादर करावा अशा सूचना केल्या आहेत.
15 युवकांचा वापर!
शांतीनगर वास्को येथे राहणारा मिलिंद श्रीखंडे तसेच साहिल आणि गणेश या तीन युवकांनी गोमंतक टीव्हीशी संपर्क साधून ही माहिती दिली होती. वास्कोतील सुमारे 15 युवकांचा अशा तस्करीसाठी वापर करण्यात आलेला असून त्यात दोन युवतींचा समावेश असल्याचीही माहिती त्याने दिली होती. या युवकांना आता या तस्करांकडून धमक्या येत आहेत असेही त्यांनी सांगितले होते. या संबंधीची तक्रार वास्को पोलिसात दिली आहे, असेही त्यांनी सांगितले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.