Bicholim Police Dainik Gomantak
गोवा

Subhash Velingkar: वेलिंगकरप्रकरणी 'लुकआऊट नोटीस' जारी! हिंदुत्ववादी संघटनांचे समर्थन; पोलिसांची पथके मागावर

Welingkar case lookout notice issued: सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने प्रा. वेलिंगकर यांच्या विरोधात राज्यभर रान पेटले आहे. त्यांना अटक करा, अशी मागणी वाढली असतानाच, हिंदुत्ववादी संघटना मात्र वेलिंगकर यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्या आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा नोंद झालेले प्रा. सुभाष वेलिंगकर यांना अटक होणे अटळ आहे. प्रा. वेलिंगकर सध्या बेपत्ता असून, त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांची पथके त्यांच्या मागावर असल्याची माहिती मिळाली आहे.

सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने प्रा. वेलिंगकर यांच्या विरोधात राज्यभर रान पेटले आहे. त्यांना अटक करा, अशी मागणी वाढली असतानाच, हिंदुत्ववादी संघटना मात्र वेलिंगकर यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्या आहेत. वेलिंगकर यांना समर्थन देण्यासाठी या संघटनांचे कार्यकर्ते शनिवारी सकाळी डिचोली पोलिस स्थानकाजवळ जमा झाले होते. यावेळी डिचोलीत कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. फाटकही बंद करण्यात आले होते.

प्रा. वेलिंगकर यांच्या समर्थनार्थ पर्वरी येथे सकाळी १० वा. जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. हिंदू रक्षा महाआघाडीतर्फे या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. वेलिंगकर यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी शनिवारी सकाळी डिचोली पोलिस स्थानकाजवळ जमले होते.

ख्रिश्चन बांधव आक्रमक

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी प्रा. सुभाष वेलिंगकर राज्यभर खळबळ माजली आहे. ख्रिश्चन बांधव आणि समाजातील नेत्यांकडून रस्त्यावर येत प्रा. सुभाष वेलिंगकरांना अटक करा, अशी राज्यभरातून मागणी वाढू लागताच अखेर शुक्रवारी सायंकाळी डिचोली पोलिसांनी सुभाष वेलिंगकर यांच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे. वेलिंगकर यांच्या विरोधात अटकेची कारवाई करावी, अशी मागणी करीत सासष्टीसह तिसवाडी आणि बार्देश तालुक्यातील ख्रिश्चन बांधव एकाबाजूने आक्रमक झाले आहेत.

सुभाष वेलिंगकर फरार, लुकआऊट नोटीस जारी

सुभाष वेलिंगकरप्रकरणी मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अजूनही कुठलीही सरकारची भूमिका स्‍पष्‍ट न केल्‍याच्‍या पार्श्वभूमीवर भाजप सरकारातील मंत्री असलेले आलेक्‍स सिक्‍वेरा यांनी प्रसारमाध्‍यमांशी बाेलताना, सुभाष वेलिंगकर हे सध्‍या फरार आहेत आणि त्‍यांना पकडण्‍यासाठी पोलिस जंग जंग पछाडत आहेत, असे वक्‍तव्‍य केले. वेलिंगकर यांच्‍या घराच्‍या दरवाजावर पोलिसांनी लुकआऊट नोटीसही चिकटवली आहे, अशी माहिती सिक्‍वेरा यांनी दिली.

‘गोमन्‍तक’ टीव्‍हीशी बोलताना सिक्‍वेरा म्‍हणाले, वेलिंगकर कुठे लपून बसले आहेत, ते पाहण्‍यासाठी संपूर्ण सर्व्हेलन्‍स सिस्‍टम सक्रिय केली आहे. सायबर विभागाच्‍या पोलिसांनाही त्‍यांचा ठावठिकाणा शोधून काढण्‍यासाठी प्रयत्‍न करण्‍यास सांगितले आहे. सीसीटीव्‍ही कॅमेऱ्यांची पडताळणी सुरू आहे. मी मुख्‍यमंत्र्यांशी बोललो आहे. वेलिंगकर यांना कुठल्‍याही परिस्‍थितीत अटक करणार हे मुख्‍यमंत्र्यांनी स्‍पष्‍ट केले आहे. त्‍यामुळे लोकांनी शांतता पाळावी, असे आवाहनही त्‍यांनी मी करतो.

सेंट झेवियर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान वेलिंगकर यांनी केले होते. यावर बोलताना सिक्‍वेरा म्‍हणाले, हे विधान दुर्दैवी आहे, असे मी कालच म्‍हटले आहे. कुठल्‍यातरी तणावाखाली येऊन वेलिंगकर यांनी हे वक्‍तव्‍य केले आहे. सेंट झेवियर यांना गोव्‍यातील सर्व धर्माचे लाेक मानतात.

आंदोलकांनी माघारी फिरावे; वेलिंगकरांनी माफी मागावी!

सुभाष वेलिंगकर यांच्या विरोधातील आंदोलन चुकीच्या दिशेने जात आहे. विद्यमान स्थिती पाहता हे आंदोलन हाताबाहेर जाईल, अशी भीती व्यक्त करत क्लॉड अल्वारिस आणि डॉ. ऑस्कर रिबेलो यांनी त्वरित आंदोलकांना माघार घेण्‍याचे आवाहन केले. तसेच त्यांनी वेलिंगकर यांनाही आपले विधान मागे घेऊन माफी मागण्याची विनंती केली आहे.

आझाद मैदानावर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हे आवाहन केले. यावेळी समाज कार्यकर्ते रामा काणकोणकर आणि शंकर पोळजी उपस्थित होते. क्लॉड अल्वारिस म्हणाले की, वेलिंगकर माझे मित्र आहेत; पण त्यांनी जे विधान केले आहे, ते एकूण माझ्याही डोळ्यांत पाणी आले. त्यांनी आपले विधान मागे घ्यावे. अन्यथा समाजात दुफळी निर्माण होईल. यावेळी सबिना मार्टिन्स यांनीही मनोगत व्यक्त केले.

वेलिंगकरांना अटक झालीच पाहिजे; लोबो

सेंट फ्रान्सिस झेवियर हे तमाम गोमंतकीयांचे श्रद्धास्थान तसेच सायब आहेत. दरवर्षी होत असलेल्या त्यांच्या नोव्हेना तसेच फेस्ताला ख्रिश्चन बांधवांबरोबरच हिंदू तसेच इतर धर्मीय मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात. अशा संताच्या बाबतीत अपमानास्पद टीप्पणी करणाऱ्या सुभाष वेलिंगकर यांना तत्काळ अटक झालीच पाहिजे. किंबहुना त्यांना अटक करण्याचे आश्वासन मला राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्याचे शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो यांनी सांगितले. शिवोली येथील आपल्या कार्यालयात शनिवारी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. दरम्यान, प्रत्येकाला आपल्या धर्माबद्दल आदर हा असलाच पाहिजे; परंतु इतर धर्माचा आदर करणेही तितकेच गरजेचे असल्याचे लोबो यांनी यावेळी सांगितले.

मडगावात दुचाकीचालकाला आंदोलकांकडून मारहाण

सुभाष वेलिंगकर यांना अटक करा, अशी मागणी करत मडगाव कदंब बसस्‍थानकाजवळ रस्‍ता अडविण्‍यात आला होता. त्‍यावेळी या आंदोलनाला काही प्रमाणात हिंसक वळणही लागले. एक युवक दुचाकी घेऊन या गर्दीतून वाट काढण्‍याचा प्रयत्‍न करत असताना आंदोलकांनी त्‍याला अडविले.

आम्‍ही येथे रस्‍त्‍यावर उन्‍हात उभे आहोत आणि तुला रस्‍त्‍यावरून जायला पाहिजे का, असे म्‍हणत काहीजणांनी त्‍याच्‍या गाडीची चावी काढून घेण्‍याचा प्रयत्‍न केला. यावेळी आंदोलक आणि दुचाकीचालक यांच्‍यात बाचाबाची सुरू झाली. त्‍यावेळी काही आंदोलकांनी त्‍या युवकाचे हेल्‍मेट त्‍याच्‍या डाेक्‍यावरून काढून घेऊन त्‍या हेल्‍मेटनेच युवकाला मारहाण करण्‍यास सुरवात केली.

यावेळी प्रतिमा कुतिन्‍हो या युवकाच्‍या मदतीला धावत येऊन त्‍यांनी आंदोलकांना बाजूला काढले. मात्र, नंतर प्रसारमाध्‍यमांशी बोलताना त्‍या युवकाने एका आंदोलकावर हात उगारण्‍याचा प्रयत्‍न केला त्‍यामुळे आंदोलक खवळले आणि हा प्रकार घडला, असे कुतिन्‍हो यांनी सांगितले.

हणजूण पोलिस स्थानकासमोर रास्ता रोको

सुभाष वेलिंगकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधवांनी शनिवारी सायंकाळी उशिरा हणजूण पोलिस स्थानकावर धडक दिली. मात्र, पोलिसांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याने संतप्त जमावाने नंतर पोलिस स्थानकासमोरील रस्ता अडविला. दरम्यान काणकोणातही वेलिंगकर यांना अटक करा, अशी मागणी करत ख्रिस्ती बांधवांनी पोलिस स्थानकावर धडक दिली.

वेलिंगकरांना अटक करा!

प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्यावर आक्षेपार्ह विधान करून धार्मिक भावना दुखावल्याने संतप्त जमावाने वाळपई पोलिस स्थनकावर धडक दिली. वेलिंगकरांविरुद्ध रितसर  तक्रार दाखल करून त्यांनी त्यांच्या अटकेची मागणी केली. यावेळी वाळपई अवर लेडी चर्चचे फादर रॉबर्ट  फर्नांडिस तसेच मोठ्या संख्येने ख्रिश्चन बांधवांची उपस्थिती होती.

सुभाष वेलिंगकर यांच्या ‘त्या’ विधानामुळे केवळ ख्रिस्तीच नाही, तर समस्त गोमंतकीयांच्या भावना दुखावल्या आहेत. सरकारमधील दलाल हिंदू-ख्रिस्ती भांडण करू पाहात आहेत. वेलिंगकर यांनी याप्रश्‍नी माफी मागावी.
ऑस्कर रिबेलो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

The Sabarmati Report: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्स फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Cash For Job Scam: गोमंतकीयांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या विषया आणि सोनियाला जामीन मंजूर; मडगाव कोर्टाचा निर्णय

Krittika Nakshatra: गोव्यात कृत्तिका पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्व आणि फायदे

युथ काँग्रेसची म्हार्दोळ पोलिस ठाण्यावर धडक, Cash For Job प्रकरणी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!

SCROLL FOR NEXT